भोर मतदारसंघास प्रगतीच्या नवीन शिखरावर पोचवणार
esakal November 09, 2024 04:45 AM

मुळशी, ता. ८ : ‘‘विद्यमान आमदारांचा सर्वसामान्यांशी संपर्क नाही. गेली पंधरा वर्षे आमदारांनी केलेल्या दुर्लक्षामुळे मुळशी तालुक्यात रोजगार, शिक्षण आणि गावात मूलभूत सुविधांचा अभाव आहे. मूलभूत सुविधासुद्धा गावकऱ्यांना मिळत नाहीत, याची खंत आहे. गावातील रस्ते, आरोग्य सुविधा यांच्याकडे प्रामुख्याने लक्ष देऊन त्या चांगल्या दर्जाच्या करून देण्याचे आश्वासन देतो. सर्वसामान्य जनतेचा मी कार्यकर्ता आहे. माझा तळागाळातील लोकांपर्यंत संपर्क आहे. मतदारांनी संधी दिल्यास मतदारसंघाला प्रगतीच्या नव्या शिखरावर पोहोचवेल,’’ अशी ग्वाही महायुतीतील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे भोर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार शंकर मांडेकर यांनी आंधळे (ता. मुळशी) येथे आयोजित केलेल्या ‘भेटी-गाठी आपल्या माणसांच्या’ या दौऱ्यात केली.
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीसाठी सर्व उमेदवारांनी कंबर कसली आहे. भोर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर मांडेकर यांच्या प्रचारार्थ ‘भेटी- गाठी आपल्या माणसांच्या’ दौऱ्याचे आयोजन केले आहे. आंधळे, कातरखडक, खांबोली, पिंपळोली, जवळगाव, केमसेवाडी, पडळघरवाडी, रिहे, घोटावडे, मुलखेड, नांदे, लवळे, सुस, म्हाळुंगे या गावांना त्यांनी भेट दिली. या भेटीदरम्यान ग्रामस्थांनी व स्थानिक कार्यकर्त्यांनी मांडेकर यांचे जल्लोषात स्वागत केले. या दौऱ्याला प्रचंड गर्दी पाहिला मिळाली. गाव भेटीदरम्यान गावकऱ्यांनी त्यांना पाठिंबा जाहीर केला आहे. तसेच, तालुक्यातील रखडलेली विकासाची कामे ही मांडेकर यांच्या नेतृत्वामध्ये पूर्ण होतील, अशी आशा गावकऱ्यांनी व्यक्त केली. ‘बच्चा बच्चा जानता है- शंकर भाऊ सच्चा है’ अशी घोषणा देत गावातील लहान मुलांनीसुद्धा या प्रचारामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद दाखवला.
दरम्यान, या भेटीत मतदारसंघातील महिलांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. शंकर मांडेकर यांचे स्वागत त्यांनी औक्षण करून केले आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे त्यांना झालेल्या लाभाबद्दल महिलांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महायुतीचे आभार मानले.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.