Raigad : विदारक चित्र! मेल्यानंतरही फरफट, रस्ता नसल्याने मृतदेह झोळीतून आणला, ४ किमी पायपीट!
Saam TV November 09, 2024 11:45 PM

सचिन कदम | रायगड: सध्या निवडणूकीमध्ये विकासाच्या गप्पा मारल्या जात असताना रायगडमध्ये आदिवासी वाड्या मुलभुत सुविधांपासून वंचित असल्याचे पाहायला मिळाले आहे. वाडीवर जाण्यासाठी रस्ता नसल्याने मृतदेह झोळीतुन नेला जात असल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत असून हा व्हिडीओ रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील खवसा आदिवासीवाडी वरील आहे. पेण शहरातील रुग्णालयात आदिवासी वाडीवरील एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. तिचा मृतदेह वाडीवर घेऊन जाण्यासाठी रस्ता नाही यामुळे या आदिवासी महिलेचा मृतदेह झोळीत टाकून नेण्याची वेळ येथील आदिवासी बांधवांवर आली.

खवसा आदिवासी वाडीवर जाण्यासाठी 60 लाख रुपये खर्च करून रस्ता बांधला जात आहे, परंतू आज प्रत्यक्षात रस्ताच नसल्याने झोळीतुन नेण्याची वेळ आदिवासी वाडीवरील ग्रामस्थांवर आली आहे. रस्ता बांधण्यासाठी ठेकेदाराला साडेसात कोटी दिले होते आता ते पैसे कोणाच्या खिशात गेले असा प्रश्न याठिकाणी उपस्थित होत आहे. या परिसरातील खवसावाडी, काजुचीवाडी, केळीचीवाडी, तांबडी आणि उंबरमाळवाडी ह्या पाचही वाड्यांना मूलभूत सुविधांची वनवा आहे. आदिवासी बांधव त्याच बरोबर सामाजिक संघटनांमार्फत पाठपुरावा सुरु असून देखील मुलभुत सुविधा मिळत नसल्याने या घटनेनंतर आता तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

पेण शहरात खवसा अशी एक छोटी आदिवासी वाडी आहे. या वाडीतील एक महिला खूप आजारी होती. या महिलेचे नाव आंबी कडू असे होते. या महिलेला उपचारासाठी अलिबाग जिल्ह्यात दाखल करण्यात आले होते. मात्र, या उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झाला. आंबी कडू या महिलेचा मृतदेह पेणपर्यंत आणण्यात आला. परंतू तिथून आदिवासी वाडीवर जाण्यासाठी पक्का रस्ताच नव्हता. त्यामुळे कोणतीही रुग्णवाहिका उपलब्ध झाले नाही. अखेरीस ग्रामस्थांनी मृतदेह झोळीत भरुन आदिवासी खवसावाडीत नेला. या वाड्यांच्या रस्त्यांसाठी १ जानेवारी रोजी पुन्हा सिद्धिविनायक या ठेकेदाराने दहा महिने उलटूनही या रस्त्याचे काम सुरू केलेले नाही.

Edited By: Dhanshri Shintre.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.