Ranjit Patil Paranda Assembly News : आतापर्यंत त्यांनी आम्हाला खूप त्रास दिला आहे. आता मी नांग्या ठेवल्याशिवाय राहणार नाही, असे म्हणत परांड्यातील शिवसेना ठाकरे गटाचे नेते रणजित पाटील (Ranjit Patil) यांनी मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्यावर जोरदार टीका केली. आता अंगावर आला की मी शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही. हे माढ्याचे पार्सल आपल्याला परत पाठवायच आहे. 23 तारखेला या खेकड्याला बुक्का लावल्याशिवाय शांत बसू नका असे म्हणत रणजीत पाटील यांची तानाजी सावंत यांच्यावर खरमरीत टीका केलीय.
उध्दव ठाकरे यांनी उमेदवारी जाहीर केल्यानंतर राहुल भैया यांची उमेदवारी जाहीर झाली. त्यावर आम्ही उमेदवारीचा निर्णय पक्ष श्रेष्ठीकडे सोपवला होता. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. त्यानंतर मी जात असताना अनेकांनी उमेदवारी मागे घेऊ नये असं सांगितलं. पण माझ्या वडिलांनी भगवा खांद्यावर घेतला आहे. मी उमेदवारी मागे घेतली. पण प्रचार करणार की नाही असा संभ्रम निर्माण केला होता. पण राहुल मोटे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणार असल्याचे रणजीत पाटील म्हणाले.
रणजीत पाटील यांनी पक्षनिष्ठा काय असते हे दाखवून दिल्याचे मत राहुल मोटे यांनी व्यक्त केली. रणजीत दादा यांना त्याचं फळ मिळेल असेही ते म्हणाले. मतदारसंघातील सिंचन प्रकल्पाची सुरुवात पवार साहेबांच्या नेतृत्वात झाली. माझ्या वडिलांनी त्यासाठी काम केल्याचे मोटे म्हणाले. आता पाणी प्रश्नावर दिशाभूल करण्याचं काम सुरू आहे. आपण संवाद दौरा केला, म्हणून तानाजी सावंत यांनी दौरा सुरू केला. पण त्यांना शेतकरी रोषाला समोर जावं लागलं. त्यांनी शेतकऱ्याची औकात काढल्याचे मोटे म्हणाले. शेतकरी तानाजी सावंत यांना औकात दाखवल्या शिवाय राहणार नाहीत असेही मोटे म्हणाले.
एक तलाव सुरू केलेला दाखवा, एक इमारत दाखवा आणि एक लाख मिळवा. तानाजी सावंत साखर देऊ शकतो, पण आपल्याला पाणी देऊ शकत नाही असे राहुल मोटे म्हणाले. कोणाचीही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. आपण मतदार संघाची संस्कृती जोपासली, आता दादागिरी होतेय. गोळीबार व्हायला लागला. आपल्याला शांतता प्रिय मतदार संघ हवा आहे असे मोटे म्हणाले. महाराष्ट्राला भिकारी बनवेन म्हणणाऱ्या विरोधात आपली लढाई आहे. मनोज जरांगे पाटील यांना एकेरी बोलणाऱ्या विरोधात आपली लढाई आहे . आपली लढाई गद्दार खेकड्या विरोधात आहे असे म्हणत राहुल मोटे यांनी तानाजी सावंत यांच्यावर हल्लाबोल केला.