पुणे, ता. १२ : ‘‘२००८ मध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे आमची अवस्था बिकट झाली होती, त्यावेळी माजी आमदार चंद्रकांत मोकाटे देवासारखे आमच्या मदतीला धावून आले. त्यामुळे आमच्या सोसायटीवर व रहिवाशांवर आलेले संकट टळले,’’ असे कोथरूड येथील गणांजय, शिवतारा गार्डन सोसायटीतील रहिवासी व पदाधिकारी प्रवीण नवाळे, अनिल खामकर व संतोष गोरडे यांनी सांगितले.
संकटकाळात मोकाटे यांनी केलेल्या मदतीची आठवण रहिवाशांनी सांगितली. महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत मोकाटे यांनी प्रचारार्थ कोथरूड भागातील सोसायट्यांना भेटी दिल्या. यावेळी रहिवाशांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ‘‘रहिवाशांच्या गळ्यापर्यंत पावसाचे पाणी आले होते. सोसायटीसमोरील एका कंपनीची भिंत होती. मोकाटे यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना बोलावून घेत तातडीने भिंत पाडण्यास सांगितले. त्यासाठी ते स्वतः पुढे सरसावले. भिंतीला भगदाड पाडून पाण्याचा प्रवाह वळवला. त्यामुळे मोठी हानी टळली होती,’’ अशा भावना रहिवाशांनी व्यक्त केल्या.
दरम्यान, मोकाटे यांच्या समर्थनार्थ छत्रपती शिवाजी महाराज स्मारक चौक, डहाणूकर कॉलनी, गणांजय सोसायटी, परमहंसनगर, शिक्षकनगर, शिवतीर्थनगर रामबाग कॉलनी, बेडेकर गणपती, आयडियल कॉलनी, मयूर कॉलनी, मृत्युंजयेश्वर मंदिर आदी परिसरातून दुचाकी फेरी काढण्यात आली.