सुहास राजदेरकर
‘शिक्षण तुम्हाला उडायला पंख देते’- ए.पी.जे. अब्दुल कलाम
आर्थिक नियोजनामध्ये मुलांच्या शिक्षणाला सर्वांत जास्त प्राधान्य दिले जाते. तरीही गुंतवणूक करताना, अनेकदा फार दूरवरचा विचार केला जात नाही. समजा, तुमच्या पाल्याने हार्वर्ड अथवा ऑक्सफर्ड विद्यापीठात शिकण्याचा हट्ट केला तर? आज त्याचा साधारण खर्च एक कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. १० टक्के चलनवाढीनुसार, १० ते १५ वर्षांनी तो अनुक्रमे २.६० कोटी रुपये आणि ४.१८ कोटी रुपये इतका येईल. यावर आपण एकच अपेक्षा ठेवू, की पुढील काळात अशी नावाजलेली विद्यापीठे आपल्या देशातच येतील आणि तेथील शिक्षण आपल्या पाल्यांना परवडेल. परंतु, देशातील उच्चशिक्षण तरी आपण मुलांना देऊ शकू का? या प्रश्नाचे उत्तर सकारात्मक देता येईल, जेव्हा आपण योग्य गुंतवणूक करून त्यासाठी भक्कम तरतूद करू.
काय काळजी घ्यावी
१ मुलांच्या प्रत्येक उद्दिष्टांकरिता किती खर्च येणार आहे, ते माहिती करून त्यानुसार केवळ पारंपरिक गुंतवणुकीत गुंतून न पडता, म्युच्युअल फंडांच्या इक्विटी योजनांचा विचार करा, कारण तुमच्याकडे गुंतवणूक काळ जास्त आहे. दीर्घकाळात शेअरने सर्वांत जास्त परतावा दिला आहे. तक्ता क्रमांक एकमध्ये याचे विश्लेषण आहे.
मुलाच्या किंवा मुलीच्या वयाच्या पहिल्या वर्षापासून दरमहा १००० रुपये ‘एसआयपी’ सुरू करून दरवर्षी ती वाढवत नेली, तर १८ वर्षांमध्ये तुमच्याकडे २२ लाख रुपये असतील, ज्याने तुम्ही त्यांना किमान इंजिनिअर बनवू शकता. पहिल्या वर्षी १०००, दुसऱ्या वर्षी २००० अशी वाढवत नेऊन १८ व्या वर्षी १८,००० रुपये ‘एसआयपी’ केल्यामुळे दरमहा १०,००० रुपये ‘एसआयपी’ करण्याचे ओझे होणार नाही.
२ गुंतवणूक लवकर सुरू करा
गुंतवणुकीची सुरुवात शक्यतो लवकर, मुलांच्या जन्मापासूनच करा. यासाठी तक्ता क्रमांक दोनमधील उदाहरणाचा विचार करा.
३ मुलांसाठी क्रॅश कोर्स
काळाप्रमाणे शिकविण्यात काय बदल केले पाहिजेत ते सोबतच्या तक्ता क्रमांक तीनमध्ये दिले आहे. शालेय अभ्यासक्रमात याचा समावेश नसेल, तर त्यांना एखाद्या क्लासमध्ये पाठविणे योग्य ठरेल.
४ स्टार्ट-अपसाठी पैसे
नोकरी न करता स्वतःचे स्टार्ट-अप सुरू करण्याकडे कल वाढतो आहे. नव्या पिढीला स्टार्ट-अप सुरू करण्यासाठी घरातून काही मदत, पैसे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिक्षण, लग्न याच्या बरोबरीने पालकांवर मुलांना स्टार्ट-अप सुरू करण्यासाठी लागणाऱ्या पैशांची तरतूद करण्याचीसुद्धा नवी जबाबदारी आहे.
५ इतर कारणासाठी वापर टाळा
मुलांच्या शिक्षणासाठी सुरू केलेल्या गुंतवणूक योजनांचे पैसे, इतर कोणत्याही कारणासाठी वापरू नका. बरेचदा असे दिसते, की मुलांना उपयोग होईल किंवा मुलांची आवड आहे, असा गोड गैरसमज करून घेऊन, स्वतःची नवी गाडी घेण्याची हौस भागविली जाते.
चला तर मग, वरील गोष्टींचा अभ्यास करून आणि तज्ज्ञांच्या मदतीने, येत्या गुरुवारी, १४ नोव्हेंबर, बालदिनानिमित्ताने, मुलांच्या शिक्षणाच्या तरतुदीचे योग्य आर्थिक नियोजन करू या, त्यांच्या स्वप्नांना पंख देऊ या आणि त्यांची स्वप्ने प्रत्यक्षात आणू या.