टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला 22 नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिका (बॉर्डर गावसकर ट्रॉफी) खेळणार आहे. टीम इंडियाची पहिली तुकडी या दौऱ्यासाठी रवाना झाली आहे. तर दुसरी तुकडी ही सोमवारी 11 नोव्हेंबरला रवाना होणार आहे. त्याआधी भारताचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी पत्रकार परिषदेद्वारे अनेक प्रश्नांची उत्तरं दिली. तसेच नियमित कर्णधार रोहित शर्मा याच्या अनुपस्थितीत भारताची कॅप्टन्सी कोण करणार? त्याबाबतही सांगितलं.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, रोहित शर्मा वैयक्तिक कारणामुळे पर्थ येथे होणाऱ्या सलामीच्या सामन्यात खेळणार नसल्याचं म्हटलसं जात आहे. मात्र याबाबत रोहितने कोणतीही माहिती दिली नाही. तसेच गंभीरनेही रोहित पहिला सामना खेळणार की नाही? याबाबत स्पष्ट काहीच सांगितलं नाही. मात्र गंभीरने रोहितच्या अनुपस्थितीत कॅप्टन कोण असणार? हे सांगितलं. तसेच रोहितच्या जागी कुणाला संधी देणार? हे देखील स्पष्ट केलं.
रोहितच्या अनुपस्थितीत भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह कर्णधार असेल, असं गंभीरने स्पष्ट केलं. तसेच रोहितच्या जागी केएल राहुल आणि अभिमन्यू इश्वरन या दोघांपैकी कुणा एकाची निवड केली जाईल, असंही गंभीरने सांगितलं. त्यामुळे ऑस्ट्रेलिया ए विरूद्धच्या दुसऱ्या अनऑफीशियल टेस्टमधील दोन्ही डावात अर्धशतकी खेळी करणाऱ्या ध्रुव जुरेलचा पत्ता कट झाल्याचं स्पष्ट झालं आहे.
दरम्यान ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने रविवारी 10 नोव्हेंबरला पहिल्या कसोटी सामन्यासाठी 13 सदस्सीय संघ जाहीर केला. पॅट कमिन्स ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व करणार आहे. तर या 13 जणांमध्ये 2 नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. जॉश इंग्लिस याचा समावेश करण्यात आला आहे. तर नॅथन मॅकस्विनी याला संधी दिली आहे. नॅथन मॅकस्विनी पर्थमध्ये पदार्पण करु शकतो. तसेच तो उस्मान ख्वाजासोबत ओपनिंगला येऊ शकतो, असं म्हटलं जात आहे.
पहिल्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलिया टीम : पॅट कमिन्स (कॅप्टन), मिचेल स्टार्क, ट्रेव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, स्टीव्हन स्मिथ, एलेक्स कॅरी, मार्नस लाबुशेन, स्कॉट बोलँड, नॅथन लायन, मिचेल मार्श, नॅथन मॅकस्विनी, जॉश इंग्लीश आणि जॉश हेझलवुड
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, अभिमन्यू ईश्वरन, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर.