राज्यात विधानसभा निवडणूक आचारसंहिता असल्यामुळे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणारी शासकीय महापूजा पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते संपन्न झाली. यावेळी निवडणुका शांततेत पार पडाव्यात तसेच राज्यातील जनतेला सुख समाधान लाभावे असे साकडे त्यांनी विठ्ठलाला घातले. आज कार्तिकी यात्रेच्या निमित्ताने अडीच वाजता विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली. पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत आणि सायली फुलकुंडवार यांच्या हस्ते महापूजा संपन्न झाली. वारकरी प्रतिनिधी म्हणून लातूर जिल्ह्यातील उदगीर येथील विठ्ठल भक्त बाबासाहेब सगर आणि त्यांच्या पत्नी सागरबाई सगर यांना महापूजेसाठी उपस्थित राहण्याचा मान मिळाला. उदगीर येथे गवंडी काम करून आपला उदरनिर्वाह करणारे सगर दापंत्य गेली 14 वर्ष झाले कार्तीकी वारी करत आहेत. दरम्यान, आज कार्तिक एकादशी असल्याने श्री विठ्ठल रुक्मिणीमातेच्या गर्भगृहात झेंडु , शेवंती ,कार्नेशियन ,गुलाब अशा विविध पंधरा प्रकारच्या पाना फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. या सजावटीसाठी वेगवेगळ्या पाच टन फुलांचा वापर करण्यात आलाय ही सजावट पुणे येथील विठ्ठल भक्त राम जामभुळकर यांनी केली आहे. श्री विठ्ठल आणि रुक्मिणीमातेचा गाभारा झेंडूच्या फुलासह विविध आकर्षक पाना फुलांनी सजवण्यात आला आहे. तसेच सोळखांबी, सभामंडप अशा मंदिराच्या विविध भागांना देखील देशी विदेशी फुलांची सजावट करण्यात आली आहे