Health Tips- आजारानुसार घ्यावा फळांचा रस
Marathi November 13, 2024 03:24 AM

सर्दी, खोकला किंवा इतर आजारात जिभेची चव जाते. त्यामुळे रुग्णांना जेवण जात नाही. अशावेळी डॉक्टर पचण्यास हलके द्रव पदार्थ पिण्याचा सल्ला देतात. त्यातही जर रुग्णाला जेवणाची इच्छाच होत नसेल तर ज्यूस पिण्याचा सल्ला दिला जातो. पण तुम्हाला माहीत आहे का की ज्यूस नेहमी आजाराच्या स्वरुपानुसार प्यावे. कारण बऱ्याचवेळा ज्यूस प्यायल्यावर रुग्णाला आरामा ऐवजी त्रास होतो. याचे कारण हे रुग्णाच्या त्यावेळच्या प्रकृतीवर अवलंबून असते. म्हणूनच आज आपण कोणत्या आजारावर कोणत्या फळाचे ज्यूस आरोग्यदायी असते ते बघणार आहोत.

मायग्रेन

तुम्हाला वारंवार मायग्रेनचा त्रास होत असेल तर लिंब आल्याचा रस प्यावा.

१ चमचा लिंबाचा रस आणि १ चमचा आल्याचा रस एका ग्लास पाण्यात मिसळून प्यायल्याने मायग्रेनपासून लवकर आराम मिळतो.

ॲसिडिटी

ॲसिडिटी हा सर्वसामान्य आजार झाला आहे. मोठ्यांसोबतच आता लहान मुलांनाही याचा त्रास होत आहे.

ॲसिडिटीचा त्रास झाल्यास कोबी आणि गाजराचा रस मिसळून प्यावा .तसेच पित्त वाढल्यास काकडी, बटाटा, सफरचंद, मोसंबी आणि टरबूजाचा रस पिल्यासही आराम मिळतो.

खोकला

सध्या थंडीचे दिवस सुरू झालेत अशावेळी सर्दी, खोकला , पडसे होणे सामान्य आहे. यामुळे खोकला आणि हलके पडसे झाल्यास कोमट पाण्यात मध आणि लिंबाचा रस मिसळून सकाळी लवकर प्यायल्यास फायदा होईल.

तसेच एक ग्लास गाजर ज्यूसमध्ये 1 चमचे लसूण, कांदा आणि तुळशीचा रस मिसळून प्यायल्यानेही खोकला बरा होतो.

संधिवात

थंड वातावरणात बऱ्याचजणांना संधिवाताचा त्रास होतो. अशावेळी गरम पाण्यात लिंबाचा रस मध एकत्र पिल्यास आराम मिळतो.

तसेच लसूण आणि कांद्याचा रस प्रत्येकी १ चमचा गरम पाण्यात मिसळून पिल्यानेही सांधेदुखी थांबते. तसेच बटाट्याचा रस देखील संधिवातावर फायदेशीर आहे.

ताप

ताप आल्यावर काहीही खावेसे वाटत नाही. त्यामुळे अशक्तपणा येतो. अन्न नसतानाही शरीराची ताकद टिकवून ठेवण्यासाठी रस प्यावा.

तसेच सकाळी कोमट पाण्यासोबत मध आणि लिंबाचा रस प्यावा.

लसूण आणि कांद्याचा रसही गरम पाण्यासोबत पिल्याने आराम मिळतो.

याशिवाय कोबी, तुळस, डाळिंब, संत्री आणि मोसंबी यांचा रसही पिऊ शकता.

न्यूमोनिया

प्रामुख्याने लहान मुलांना न्यूमोनियाचा अधिक त्रास होतो.

औषधांसोबतच मुलांना आले, लिंबू आणि मध मिसळून कोमट पाणी द्यावे.

तुम्हालाही या आजाराने त्रास होत असेल तर गरम पाण्यात लसूण-कांद्याचा रस मिसळून प्यावा.

याशिवाय तुळस, मोसंबी, संत्री आणि गाजराचा रसही सेवन करू शकतो.

लघवीची समस्या

लघवीच्या समस्या असल्यास फळांचे सेवन वाढवावे. यामुळे आराम मिळतो.

फळांचा रस पिल्याने विशेष आराम मिळतो.

बीटरूट, गाजर, काकडी, टरबूज, द्राक्षे आणि अननस यांचा रस प्या.

नारळ पाण्याचे सेवन केल्यानेही आराम मिळेल.

जंत

पोटात जंत झाल्यास औषधांसोबत एक चमचा लसणाचा रस आणि एक चमचा कांद्याचा रस एक ग्लास कोमट पाण्यात मिसळून प्या.

याशिवाय मेथी-पुदिना आणि पपईचा रस मिश्रित रस देखील उपयुक्त आहे.

त्वचा विकार

– त्वचेशी संबंधित कोणतीही समस्या असल्यास गाजर-पालकाचा रस मिसळून प्या.

तुम्ही बटाटा, काकडी, हळद, टरबूज, पेरू, सफरचंद, पपईचाही रस पिऊ शकता.

पपई आणि बटाट्याचा रस लावल्यानेही फायदा होतो.

संसर्गजन्य रोग

एक ग्लास कोमट पाण्यात एक लिंबाचा रस आणि एक चमचा मध टाकून रिकाम्या पोटी प्यावा.

१ चमचा लसणाचा रस आणि १ चमचा कांद्याचा रस एका ग्लास पाण्यात मिसळून प्या.

विषमज्वर

१ ग्लास गरम पाण्यात एका लिंबाचा रस मिसळा आणि सकाळी लवकर प्यावा.

किंवा एक ग्लास गरम पाण्यात १ चमचा कांदा आणि लसणाचा रस टाकून पिल्यास आराम मिळतो.

गोड लिंबाचा रस आणि संत्रा आणि तुळशीचा रस मिसळूनही पाणी पिऊ शकता.

पिओरिया

दातांमध्ये पायोरिया झाल्यास गाजर, सफरचंद आणि पेरू चावून त्यांचा रस प्यावा.

व्हिटॅमिन सी च्या गुणधर्मांनी युक्त लिंबू आणि संत्र्याचा रस देखील फायदेशीर आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.