भविष्य वर्तवणारा इतिहास
esakal November 13, 2024 10:45 AM

इतिहास हा विषयदेखील भूगोलासारखाच शालेय स्तरावर दुर्लक्षित राहिलेला विषय आहे. इतिहास म्हणजे जणू काही सनावळ्या, घटना आणि व्यक्तींच्या वंशावळींचे पाठांतर! फारसे डोके न लावायला लागणारा व पाठ करून परीक्षेत उत्तरे लिहिण्याचा विषय अशीच अनेकांची समजूत असते.

या विषयाचे महत्त्वच न समजल्याने आपण भारतीयांनी आपलाच इतिहास लिहिला नाही. त्यामुळे बऱ्याचदा इंग्रजांनी अथवा पाश्चात्यांनी लिहिलेला इतिहास आपल्याला शिकावा-शिकवावा लागतो. देशा-देशांत आणि देशांतर्गत होणाऱ्या संघर्षांची मुळे इतिहासामध्ये असतात. त्यांच्यातली दरी वाढवायची, की कमी करायची, हे इतिहास लिहिणारा ठरवतो.

गरज

इतिहासाचा शास्त्रशुद्ध अभ्यास करावा लागतो. त्यासाठी जुने दस्तऐवज, बखरी, शिलालेख, वास्तू, उपलब्ध व उत्खनन करून मिळवलेल्या वस्तू यांच्या अभ्यासातून पुढे आलेल्या दुव्यांमधून मिळालेल्या माहितीचा मेळ घालावा लागतो. त्यामुळेच इतिहास संशोधन हे एक महाकठीण काम आहे. बुद्धिमान विद्यार्थ्यांनी या क्षेत्रात येण्याची गरज आहे.

संधी

इतिहासात पदवी व पदव्युत्तर पदवी प्राप्त केल्यानंतर पुरातत्त्व (आर्किओलॉजी) संशोधक, मानववंशशास्त्रज्ञ, दफ्तरपाल (क्युरेटर), संरक्षक (कॉनर्जव्हेटर) आदि पदांवर काम करता येते. शिक्षक, संशोधक, सल्लागार अशा विविध प्रकारच्या संधी उपलब्ध होतात.

पुरातत्त्व संशोधक जुने दस्तावेज, शिलालेख, नाणी, वस्तू, हस्तलिखिते यांच्या आधारे आणि उत्खननामुळे सापडणाऱ्या वस्तूंच्या ‘कार्बन डेटिंग’द्वारे नामशेष झालेल्या संस्कृतीचा, समाजाचा अभ्यास करतात. मानववंशशास्त्रात इतिहास, समाजशास्त्र, समाजसेवा, भूगोल, अर्थशास्त्र अथवा भाषा विषय घेऊन बीए केल्यावर पदव्युत्तर पदवी (एम.ए.) घेता येते.

आंतरराष्ट्रीय स्तरावरील संशोधन क्षेत्रातही या विषयाच्या अभ्यासातून संधी प्राप्त होते. दफ्तरपाल म्हणजे जुन्या संदर्भांचं जतन करणारी व्यक्ती. जुनी कागदपत्रे, पुस्तके, वर्तमानपत्रे, नकाशे, छायाचित्रे, चित्रपट इत्यादी गोळा करून त्यांचा नीट सांभाळ करणे, त्यांची सूची बनवणे आणि संशोधन करू इच्छिणाऱ्यांना ते उपलब्ध करून देणे व मार्गदर्शन करणं असं यांचं काम असतं.

आव्हानात्मक काम

पुरातन चित्रं, शस्त्रं, भांडी, वस्त्रं, फर्निचर, धातूच्या वस्तू इत्यादी ऐतिहासिक-सांस्कृतिक वारसा असणाऱ्या वस्तूंचे योग्य जतन होणं आवश्यक असते. संरक्षक या व्यक्तीला हे काम करावे लागते. वस्तूंचे मूळ रंग, रूप न बदलता, न फुटता-तुटता ती दीर्घकाळ टिकावी या दृष्टीने प्रयत्न करणे, त्यासाठी आवश्यक ते दुरुस्ती काम करणं, नोंदी ठेवणं, प्रदूषणापासून दूर ठेवणं, रंग-लेप लावणं इत्यादी कामं करावी लागतात.

यासाठी प्रयोगशाळांमध्ये किंवा छोट्या वर्कशॉपमध्ये व प्रत्यक्ष साइटवरही काम करावं लागतं. सरकारी यंत्रणा, महामंडळं, शैक्षणिक संस्था, रुग्णालयं, वस्तुसंग्रहालयं, ग्रंथालयं, संशोधन संस्था इत्यादी ठिकाणी दस्तऐवज जतन करण्याचं आव्हानात्मक काम करावं लागतं.

कौशल्ये

या क्षेत्रात काम करण्यांना इतिहास विषयातील आवड तर लागतेच, पण भाषांवरही प्रभुत्व मिळवावे लागते. पाली, संस्कृत, अर्धमागधी अशा भाषा आणि मोडी लिपीचेही ज्ञान लागते. कठोर परिश्रमांची तयारी, चिकाटी, जिज्ञासू वृत्ती, नेटकेपणा हे गुणही लागतात. अचूक व तीक्ष्ण निरीक्षणशक्ती आणि जबरदस्त स्मरणशक्तीही लागते.

अनेक वेळा प्रत्यक्ष उत्खननस्थळी जाऊन काम करावे लागते व राहावेही लागते. इतिहासाची एक विशेष शाखा म्हणजे नाणकशास्र. पूर्वीच्या साम्राज्याचे अथवा संस्कृतीचे वैशिष्ट्य म्हणजे विविध दगडांची अथवा धातूंची कोरीव अथवा पाडलेली नाणी. या नाण्यांच्या अभ्यासावर तात्कालीन राज्यव्यवस्था, समाजव्यवस्था इत्यादींचे आडाखे बांधणारी ही शाखा आहे.

पुनर्मांडणीची गरज

भारतात होत असलेल्या अनेक संघर्षांची कारणे परदेशी लोकांनी चुकीचा इतिहास लिहून मुद्दाम लावलेली भांडणे आहेत. त्यासाठी अचूक संशोधन करून इतिहासाची पुनर्मांडणी करण्याची गरज आहे. राष्ट्राची एकात्मता टिकवण्यासाठी बुद्धिमान विद्यार्थ्यांनी इतिहास संशोधन करण्याची गरज आहे! त्यामुळेच हा विषय केवळ पोटापाण्याचे साधन नसून देशाप्रती बांधिलकीही आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.