राष्ट्रोन्नतीचा मार्ग दाखवणारी ग्रामगीता
esakal November 13, 2024 10:45 AM

सध्या निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने आपल्याला राज्याच्या विकासाच्या धोरणांबाबतच्या चर्चाही ऐकायला मिळत आहेत. त्याअनुषंगाने आज काहीशा विस्मरणात गेलेल्या, परंतु एका अप्रतिम ग्रंथाची ओळख आपण करून घेणार आहोत.

सुमारे ७० वर्षांपूर्वी एका राष्ट्रसंतानेदेखील संपूर्ण देशाच्या विकासाचे मूळ असलेल्या ग्रामसुधारणेचा आराखडा मांडला. तो इतका व्यापक आणि सर्वसमावेशक आहे, की त्याला गावाच्या आणि पर्यायाने देशाच्या विकासाची गीता संबोधले गेले.

तो अजोड ग्रंथ म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी लिहिलेली ग्रामगीता. साहित्य प्रकाशन समितीने हा ग्रंथ प्रकाशित केला असून, या ग्रंथाला आचार्य विनोबा भावे, श्री संत गाडगे महाराज, आचार्य दादा धर्माधिकारी अशा महाराष्ट्र घडवणाऱ्या अनेक ज्येष्ठ व्यक्तींनी प्रशस्ती लिहून गौरविले आहे.

या ग्रंथात वर्णन केल्याप्रमाणे तुकडोजी महाराज हे पंढरपूरला चंद्रभागेच्या काठावर बसले असताना त्यांना ग्रामोन्नतीबाबत ग्रंथ लेखनाची स्फूर्ती झाली आणि त्यातून हा महान ग्रंथ साकार झाला. हा ग्रंथ ओवी स्वरूपात लिहिला असला तरी या ग्रंथातील भाषा अत्यंत सोपी आहे.

आत्मरूपाची धारणा। सर्वांठाई समभावना ।

विश्वकुटुंब ऐशा आचरणा। धर्म म्हणावे निश्चये ।।

असे सांगत तुकडोजी महाराजांनी सद्धर्म म्हणजे काय, त्याचे पालन हे आधुनिक विज्ञानयुगात कसे करावे, याचे सुलभ विवेचन या ग्रंथात केले आहे.

अंधश्रद्धानिर्मूलन आणि जातिभेद निर्मूलनाचे फार मोठे काम करणाऱ्या तुकडोजी महाराजांनी या ग्रंथात वर्णव्यवस्थेबाबतही अभिनव विचार मांडले आहेत. धर्म, समाज, व्यक्तिगत सदाचरण यांबाबत सद्धर्मपंचक या विभागात पुरेसे मार्गदर्शन केल्यानंतर भारतीय संस्कृतीचा आणि समाजाचा महत्त्वाचा घटक असलेल्या ग्रामसंस्कृतीवर तुकडोजी महाराजांनी मोठे मार्मिक विवेचन केले आहे.

समाजसेवा कशा पद्धतीने करावी, त्यात भ्रष्टाचार माजू नये यासाठी कोणती काळजी घ्यावी, संघटन कशा पद्धतीने करावे, त्यासाठी कोणते गुण आत्मसात करावेत याबाबतही मार्गदर्शन आहे.

कशास काही नियम नुरला। कोण रोगी कुठे थुंकला।।

कोठे जेवला संसर्गी आला। गोंधळ झाला सर्वत्र।।

असे म्हणत ग्रामस्वच्छता, ग्रामनिर्माण, ग्रामआरोग्य या विषयांवर अत्यंत सखोल मार्गदर्शन या ग्रंथात करण्यात आले आहे. नावावरून हे पुस्तक ग्रामीण भागाच्या विकासासाठी आहे असे वाटले तरी शहर आणि महानगरे यांना देखील यातील तत्त्वे लागू होणारी आहेत. तुकडोजी महाराजांच्या समाजचिंतनाचे संपूर्ण सार या ग्रंथात समावले असल्याने ते समाजातील प्रत्येक घटकाला नक्कीच मार्गदर्शक आणि बोधप्रद होणारे आहे.

संकलन : रोहित वाळिंबे

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.