पाचशेच्या स्टॅम्प पेपरचा तुटवडा
esakal November 13, 2024 10:45 AM

पुणे,ता. १२ : प्रतिज्ञापत्र, हक्कसोडपत्र अथवा अन्य प्रकाराची कागदपत्रे करण्यासाठी पाचशे रुपयांचा स्टॅम्प पेपर वापरण्याचे बंधन राज्य सरकारने घातले आहे. परंतु, या स्टॅम्पचा बाजारात तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना तो जादा दराने विकत घ्यावा लागत आहे. दरम्यान पाचशे रुपयांचा स्टॅम्प पेपर मिळत नसेल, तर शंभर रुपयांचे पाच स्टॅम्प पेपर वापरून आपले काम करणे शक्य आहे, असे नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून सांगण्यात आले.
शासकीय कार्यालय सोडून अन्य कामांसाठी म्हणजे प्रतिज्ञापत्र, हक्कसोडपत्र आदी कामांसाठी शंभर ते दोनशे रुपयांच्या स्टॅम्प पेपरचा वापर केला जात होता. स्टॅम्प पेपरची किंमत आणि प्रत्यक्षात त्याच्या छपाईसाठी येणारा खर्च पाहता ही किंमत कमी असल्याचे नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचे म्हणणे होते. त्यामुळे या स्टॅम्प पेपरच्या किमतीमध्ये वाढ करावी, असा प्रस्ताव यापूर्वीच विभागाकडून राज्य सरकारकडे पाठविण्यात आला होता. त्यास राज्य सरकारने सप्टेंबर महिन्यात मान्यता देत महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमात बदल केला. या निर्णयामुळे आता सर्वसामान्य नागरिकांना शंभर अथवा दोनशे रुपयांच्या स्टॅम्प पेपरऐवजी प्रत्येक कामासाठी पाचशे रुपयांचा स्टॅम्प पेपर खरेदी करावा लागत आहे. त्यामुळे बाजारात गेल्या काही दिवसांपासून पाचशे रुपयांच्या स्टॅम्पचा पुरेशा प्रमाणात पुरवठा न झाल्याने तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी पाचशे रुपयांचा स्टॅम्प पेपर सातशे ते आठशे रुपयांना घ्यावा लागत आहे.
यासंदर्भात स्टॅम्प पेपर विक्रेत्यांशी संपर्क साधला असता नाव न देण्याच्या अटीवर ते म्हणाले, ‘‘पाचशे रुपयांचे स्टॅम्प पेपर आवश्यक त्या प्रमाणात उपलब्ध होत नाही. मागणी केल्यानंतर खात्याकडून शंभर रुपयांचे स्टॅम्प पेपर उपलब्ध करून दिले जातात. तसेच तेच घेण्यासाठी आग्रह धरला जात आहे. काही विक्रेत्यांकडून त्याचा गैरफायदा घेतला जात असण्याची शक्यता नाकारता येत नाही.’’

पुरवठ्यात अडचणी
यासंदर्भात नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचे अधिकारी म्हणाले, ‘‘पाचशे रुपयांच्या स्टॅम्प पेपरचा मागणीच्या प्रमाणात पुरवठा करण्यात अडचणी येत आहे, ही वस्तुस्थिती आहे. परंतु पाचशे रुपयांऐवजी पाच शंभर रुपयांचे स्टॅम्प पेपर वापरून नागरिक आपली कामे करू शकतात. नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी तशा सूचना देखील मुद्रांक विक्रेत्यांना दिल्या आहेत.

सद्यःस्थिती
-अपुरे मनुष्यबळ, तेही अडकले निवडणुकीच्या कामात
-राज्यातील स्टॅम्प पेपर विक्रेते ः साधारण ११००
-राज्यात ७ ते ८ आठ लाख वार्षिक स्टॅम्प विक्री, त्यातील २० टक्के विक्री पुण्यात
-५००चा स्टॅम्प ७०० ते ८०० विकला जातो.


पाचशे रुपयांच्या स्टॅम्पचा तुटवडा जाणवत असल्याने जादा दराने नागरिकांना खरेदी करावा लागत आहे. याबाबत आपले मत आम्हाला कळवा...

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.