IND vs SA: ऊन, वारा, पाऊस नाही, तर चक्क किड्यांमुळे थांबवावा लागला भारत - द. आफ्रिका सामना; जाणून घ्या नक्की काय झालं?
esakal November 14, 2024 02:45 PM

South Africa vs India T20I: सेंच्युरियनमधील सुपरस्पोर्ट पार्क स्टेडियममध्ये बुधवारी (१३ नोव्हेंबर) भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात टी२० मालिकेतील तिसरा सामना सुरु आहे. या सामन्यात भारताच्या तिलक वर्मा आणि अभिषेक शर्मा यांनी चौकार षटकारांची बरसात केली.

याबरोबरच या सामन्यात उडणाऱ्या किड्यांनीही हल्लाबोल केला होता, ज्यामुळे सामनाही काहीवेळ थांबवावा लागला. खरंतर क्रिकेटमध्ये बऱ्याचदा कमी-जास्त प्रकाशामुळे, पावसामुळे किंवा जोरदार वारा किंवा वादळामुळे सामना थांबवला जातो.

मात्र, किड्यांमुळे सामना थांबवण्याची घटना तशी दुर्मिळच. कधीकधी मधमाशांनी केलेल्या हल्ल्यामुळेही सामना थांबवावा लागला आहे. पण बुधवारी उडणाऱ्या किड्यांमुळे सामना थांबला.

झाले असे की भारताने या सामन्यात प्रथम फलंदाजी केली. भारताने २० षटकात ६ बाद २१९ धावा केल्या. त्यानंतर २२० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी दक्षिण आफ्रिकेकडून रायन रिकल्टन आणि रिझा हेन्ड्रिक्स सलामीला फलंदाजीसाठी उतरले.

पण पहिलेच षटक सुरू असताना मैदानात उडणाऱ्या किड्यांनी हल्ला केल्या दिसले. संपूर्ण मैदानभर हे किडे उडत होते. त्यामुळे खेळाडूंना खेळताना व्यत्यय येत होता. अखेर पहिल्या षटकानंतर पंचांनी खेळ थांबवण्याचा निर्णय घेतला.

यानंतर ग्राऊंड्समनने ड्रोनच्या सहाय्याने कीटकनाशक फवारले. तसेच नंतर सुपर सोपर्सने मैदानही साफ केले. यादरम्यान, साधारण अर्धातासाठी सामना थांबवला होता. त्यानंतर पुन्हा सामना सुरू झाला. या व्यत्ययामुळे एकाही चेंडूचा खेळ कमी करण्यात आला नाही.

या सामन्यात भारताकडून तिलक वर्माने शतकी खेळी केली, तर अभिषेक शर्माने अर्धशतक केले. या दोघांनी १०७ धावांची भागीदारी केली. पण अन्य भारतीय फलंदाजांना फार काही करता आले नाही. रमणदीप सिंगने मात्र त्याच्या पहिल्याच आंतरराष्ट्रीय सामन्यात छाप सोडली. त्याने पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला.

दरम्यान, तिलकने ५६ चेंडूत ८ चौकार आणि ७ षटकारांसह नाबाद १०७ धावा केल्या. अभिषेक शर्माने ३ चौकार आणि ५ षटकारांसह २५ चेंडूत ५० धावांची खेळी केली. रमणदीपने ६ चेंडूत १५ धावा केल्या, तर हार्दिक पांड्याने १६ चेंडूत १८ धावा केल्या.

दक्षिण आफ्रिकेकडून गोलंदाजी करताना अँडिल सिमेलन आणि केशव महाराज यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तसेच मार्को यान्सिनने १ विकेट घेतली.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.