पुणे – विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अखेरचे सहा-सात दिवस राहिले आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी जाहीर सभांचा धुराळा उडवून दिला आहे. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यासोबत मनसे, वंचित हे देखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर रिपब्लिकन पक्ष महायुतीसोबत निवडणूक लढत आहे. महायुतीने आठवलेंच्या रिपाईला दोन जागा सोडल्या आहेत. रामदास आठवले महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मतदारसंघात दौरे करत आहेत. आज आठवले पुण्यात होते. येथे त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांची दिलखुलास उत्तरे दिली. राजे ठाकरे यांच्यावरही त्यांनी टीकेची झोड उठवली.
राज ठाकरे त्यांच्या बहुतेक सभांमधून शरद पवारांवर निशाणा साधत आहेत. पवारांनीच राज्यात जातियवादी राजकारण आणले, असा गंभीर आरोप राज ठाकरे यांनी केला आहे. या संबंधी रामदास आठवले यांना विचारण्यात आले तेव्हा त्यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला. रामदास आठवले हे महायुतीच्या गोटात असले तरी त्यांनी शरद पवारांची बाजू घेतली. ते म्हणाले की, शरद पवार जातीपातीचे राजकारण करत नाही. मी अनेक वर्षे त्यांच्यासोबत राहिलो आहे.
– Advertisement –
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आठवले म्हणाले की, “शरद पवार जातीपातीचे राजकारण करतात असं मला वाटत नाही. आम्ही त्यांच्यासोबत राहिलेलो आहे. प्रत्येक पक्ष उमेदवार देताना जातीचा विचार करतो. शरद पवारांवर करण्यात आलेला आरोप आम्हाला मान्य नाही. मात्र काँग्रेसने जातीवाद संपवलेला नाही. तो संपुष्टात यावा अशी आमची अपेक्षा आहे”,अशी पुष्टीही त्यांनी जोडली.
शरद पवार हे राज्यातील ज्येष्ठ नेते आहेत. ते विरोधी पक्षात असले तरी त्यांचा सन्मान राखला पाहिजे, अशीच भावना अनेकांची आहे. मात्र महायुतीतील सदाभाऊ खोत यांनी काही दिवसांपूर्वीच शरद पवारांवर टीका केली होती, तेव्हाही अनेकांनी पक्षीय राजकारण बाजूला ठेवून खोतांना सुनावले होते. शरद पवारांपासून वेगळे झालेले अजित पवार यांनीही सदाभाऊंना सुनावले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीत शरद पवारांवर जहरी टीका केली होती. त्यावेळीही अजित पवारांनी त्यांची भेट झाल्यावर त्यांना असे बोलू नका असे सांगणार असल्याचे म्हटले होते. पंतप्रधानांच्या पुण्यासर राज्यात विविध ठिकाणी पाच-सहा सभा झाल्या त्यात कुठेही त्यांनी शरद पवारांबद्दल एका अक्षराने टीका केलेली नाही.
– Advertisement –
हेही वाचा : NCP SP : शरद पवारांनी आकडाच सांगितला; 45-50 आम्हाला सोडून गेले, यंदा 55-60 आमदार निवडून येतील
Edited by – Unmesh Khandale