Latest Belapur News: बेलापूर विधानसभा मतदारसंघातील बंडखोर उमेदवार विजय नाहटा यांना मदत करणाऱ्या व भाजप महायुतीच्या अधिकृत उमेदवार मंदा म्हात्रे यांच्या विरोधात प्रचार करणाऱ्यांना शिंदे सेनेने चांगलाच दणका दिला आहे.
शिवसेना शिंदे पक्षातील सात प्रमुख पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्याचा निर्णय अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
नाहटा यांच्या बंडखोरीला साथ देऊ नका, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनीही वाशीतील मेळाव्यात तशी भूमिका मांडली होती. त्यामुळे विजय नाहटा यांना साथ देणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर शिंदे सेनेच्या वतीने कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शिवसेना शिस्तभंग समितीच्या शिफारशीनुसार सात जणांची हकालपट्टी करण्यात आली. नाहटा यांचे समर्थक नेरूळचे उपजिल्हाप्रमुख दिलीप घोडेकर, सानपाडा विभागाचे उपजिल्हाप्रमुख मिलिंद सूर्यराव, नेरूळचे उपजिल्हाप्रमुख संजय भोसले, तुर्भे विभागप्रमुख अतिश घरत, वाशी सहसंपर्क प्रमुख कृष्णा सावंत, सानपाडा उपविभागप्रमुख देवेंद्र चोरगे आणि सानपाडा विभागप्रमुख संजय वासकर यांची हकालपट्टी केली आहे.