ऑस्ट्रेलियाच्या अवघड दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघासाठी मायदेशातून एक आनंदाची बातमी आली आहे. वास्तविक, वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी तब्बल एका वर्षानंतर क्रिकेटच्या मैदानावर परतला आहे. त्यानं रणजी ट्रॉफीद्वारे कमबॅक करताना मध्य प्रदेशविरुद्ध 54 धावांत 4 बळी घेतले. भारतीय संघासाठी ही खूप चांगली बातमी आहे. मात्र राष्ट्रीय निवड समिती शमी दुसऱ्या डावात कशी गोलंदाजी करतो, याकडे लक्ष ठेवणार आहे. तसेच सामन्याच्या शेवटी त्याला काही दुखणं किंवा सूज येते का हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल.
मोहम्मद शमीनं जर सर्व निकष पूर्ण केले तर तो दुसऱ्या कसोटीपूर्वी भारतीय संघात सामील होऊ शकतो. हा रणजी ट्रॉफी सामना 16 नोव्हेंबरला संपणार आहे. शमीच्या रणजी ट्रॉफीतील कामगिरीपेक्षा टीम मॅनेजमेंट आणि निवड समिती त्याच्या फिटनेसवर लक्ष ठेवून आहे. गेल्या वर्षी 19 नोव्हेंबर रोजी झालेल्या एकदिवसीय विश्वचषक फायनलनंतर शमीनं एकही स्पर्धात्मक सामना खेळलेला नाही. त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. न्यूझीलंडविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी तो संघात परतणार होता. मात्र एनसीएमध्ये रिहाबादरम्यान त्याच्या गुडघ्याला सूज आली, ज्यामुळे त्याच्या कमबॅकच्या आशांना धक्का बसला.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी 18 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा आधीच करण्यात आली आहे. अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समिती शमीचा संघात तेव्हाच समावेश करेल, जेव्हा बीसीसीआयच्या वैद्यकीय आणि क्रीडा विज्ञान संघाचे प्रमुख डॉ. नितीन पटेल त्याला तंदुरुस्त घोषित करतील.
क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगाल (सीएबी) मधील एका सूत्रानं ‘पीटीआय’ला सांगितलं की, राष्ट्रीय निवड समिती सदस्य अजय रात्रा आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमी वैद्यकीय संघाचे प्रमुख पटेल हे शमीची गोलंदाजी पाहण्यासाठी आले होते. अंतिम निर्णय घेण्यापूर्वी त्याच्याबाबतचा ‘फीडबॅक’ निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर, कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांना पाठवला जाईल.
बीसीसीआयच्या एका सूत्रानं सांगितलं की, “शमीला त्याचा खेळ खेळण्यास सांगितलं आहे. रणजी ट्रॉफीची पुढील फेरी कसोटी हंगाम संपल्यानंतर 23 जानेवारीलाच सुरू होणार आहे. त्यामुळे निवडकर्त्यांकडे त्याचा फिटनेस तपासण्यासाठी एकच सामना होता. त्यानं अनेक स्पेलमध्ये 19 षटकं टाकली आणि 57 पैकी सर्वाधिक षटके क्षेत्ररक्षण केलं. त्याने 90 ‘डॉट’ चेंडू टाकले. आता त्याला दुसऱ्या डावात पुन्हा गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करावं लागणार आहे. समजा त्यानं दुसऱ्या डावात आणखी 15 ते 18 षटकं टाकली तर ते चांगले संकेत असतील. मात्र चार दिवसांनंतर त्याला पुन्हा काही वेदना जाणवतात की नाही ही सर्वात मोठी टेस्ट असेल”, असं सूत्रानं सांगितलं. एनसीएच्या वैद्यकीय पथकानं त्याच्या फिटनेसला हिरवा कंदील दिल्यास तो दुसऱ्या कसोटीपूर्वी संघात सामील होईल.
हेही वाचा –
बॉर्डर-गावस्कर मालिकेपूर्वी भारताची चिंता वाढली! धडाकेबाज फलंदाज दुखापतग्रस्त
ऑस्ट्रेलियात कोहलीला पाहण्यासाठी चाहते चक्क झाडावर चढले! VIDEO व्हायरल
“गंभीर-रोहितचं विराटशी जमत नाही, भारत अवघ्या चार दिवसांत हरणार”; माजी खेळाडूचा खळबळजनक दावा!