शतकी खेळी केल्यानंतर कोणाला फ्लाइंग किस दिली? तिलक वर्माने अखेर उघड केलं
GH News November 14, 2024 06:15 PM

दक्षिण अफ्रिकेविरुद्धचा तिसरा टी20 सामना भारताने 11 धावांनी जिंकला. या विजयात मोलाचा वाटा राहिला तो तिलक वर्माचा.. तिलक वर्माच्या शतकी खेळीच्या जोरावर भारताला 20 षटकात 6 गडी गमवून 219 धावांपर्यंत मजल मारता आली. तिलक वर्माने 56 चेंडूत 8 चौकार आणि 7 षटकारांच्या मदतीने नाबाद 107 धावा केल्या. त्यामुळे दक्षिण अफ्रिकेसमोर विजयासाठी 220 धावांचं आव्हान ठेवण्यात आलं. दक्षिण अफ्रिकेला 20 षटकात 7 गडी गमवून 208 धावा करता आल्या आणि 11 धावांनी पराभव झाला. चार सामन्यांच्या मालिकेत भारताने 2-1 ने आघाडी घेतली आहे. चौथा सामना भारताने जिंकला तर मालिका खिशात येईल. पण सूर्याच्या जागेवर तिलक वर्माला संधी मिळाली आणि त्याने संधीचं सोनं केलं. खरं तर तिसऱ्या स्थानावर सूर्यकुमार यादव फलंदाजीसाठी येतो. पण यावेळी ही संधी तिलक वर्माला मिळाली. ही संधी कशी मिळाली याबाबत तिलक वर्माने सांगितलं आहे.

‘सूर्यकुमार यादवने माझ्या रुमचा दरवाजा ठोठावला आणि मला सांगितलं की तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी कर. तेव्हा मी कृतज्ञ झालो. तो मला म्हणाला जा आणि व्यक्त हो. ही एक चांगली संधी आहे. मी त्याला वचन दिलं की मी तुला निराश करणार नाही.’ , असं तिलक वर्मा सामन्यानंतर म्हणाला. शतकी खेळी केल्यानंतर मला कर्णधार सूर्यकुमार यादवचे आभार मानायचे होते. त्यामुळे मी डगआऊटकडे पाहून फ्लाइंग किस दिली. माझ्यावर विश्वास टाकला आणि मला संधी दिली म्हणून मी आभार व्यक्त केले, असं तिलक वर्मा म्हणाला.

दरम्यान, मागच्या दोन मालिकांमध्ये खेळता न आल्याबद्दलही तिलक वर्माने खंत व्यक्त केली. ‘बोटाच्या दुखापतीमुळे मागच्या दोन मालिकांमध्ये खेळता आलं नाही. त्यामुळे अस्वस्थ होतो. पण मला माहिती होतं की माझी वेळ येईल. मी संयम ठेवला आणि प्रयत्न करत राहिलो. मी खूप मेहनत घेतली. त्या मेहनतीचं आज मला फळ मिळालं.’, असं तिलक वर्माने सांगितलं. ‘मी माझ्या गोलंदाजीवरही काम केलं आहे. माझी गोलंदाजीही व्यवस्थित होत आहे. त्यामुळे संघात अष्टपैलू म्हणून योगदान द्यायचं आहे.’, असंही तिलक वर्मा पुढे म्हणाला.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.