12 चौकार-3 षटकार, आयुष म्हात्रेचा तडाखा, टीम इंडियात निवड होताच रणजी ट्रॉफीत शतकी धमाका
GH News November 14, 2024 07:14 PM

बीसीसीआय निवड समितीने बुधवारी 13 नोव्हेंबरला अंडर 19 आशिया कप 2024 स्पर्धेसाठी 15 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली. निवड समितीने या 15 सदस्यीय संघात वसईकर आयुष म्हात्रे याचा समावेश केला. आयुष म्हात्रे याने मुंबईसाठी रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या या हंगामातून पदार्पण केलं आणि आपली छाप सोडली. आयुषने अवघ्या काही दिवसांपूर्वी द्विशतकी खेळी केली. त्यानंतर आता भारतीय संघात संधी मिळाल्यानंतर काही तासांतच पुन्हा एकदा धमाका केला आहे. आयुषने सर्व्हिस विरुद्ध शतक ठोकलं आहे. त्यामुळे मुंबई चांगल्या स्थितीत पोहचली आहे.

रणजी ट्रॉफी स्पर्धेत पालम ए स्टेडियम, दिल्ली येथे 13 नोव्हेंबर हा सामना खेळवण्यात येत आहे. मुंबईच्या गोलंदाजांनी सर्व्हिस टीमला 81 ओव्हरमध्ये 241 वर ऑलआऊट केलं. मोहित अहलावत याने सर्वाधिक 76 तर शुभम रोहिल्ला याने 56 धावा केल्या. तर इतरांना काही करता आलं नाही. मुंबईकडून शार्दूल ठाकुर याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर शम्स मुलाणी आणि मोहित अवस्थी या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. एम जुनेद खान आणि हिमांशु सिंह या दोघांनी 1-1 विकेट मिळवली.

मुंबईची बॅटिंग

त्यानंतर बॅटिंगसाठी आलेल्या मुंबईने 3 विके्टस ठराविक अंतराने गमावल्या. अंगकृष रघुवंशी 1, सिद्धेश लाड 10 आणि अजिंक्य रहाणे 19 धावांवर बाद झाले. त्यामुळे मुंबईची स्थिती 3 बाद 69 अशी स्थिती झाली. त्यानंतर आयुष म्हात्रे आणि श्रेयक अय्यर या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 109 धावांची भागीदारी केली. श्रेयसला चांगली सुरुवात मिळाली होती. मात्र त्याला मोठी खेळी करता आली नाही. श्रेयस 46 बॉलमध्ये 47 रन्स करुन आऊट झाला.

आयुषने त्यानंतर मैदानात आलेल्या आकाश आनंद याच्या सोबतीने फर्स्ट क्लास क्रिकेटमधील दुसरं शतक पूर्ण केलं. आयुषने 114 बॉलमध्ये 3 सिक्स आणि 12 फोर ठोकले. दरम्यान मुंबईने दुसऱ्या टी ब्रेकपर्यंत 39 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 188 धावा केल्या आहेत. सर्व्हिसची आघाडी तोडण्यापासून मुंबई 52 धावांनी पिछाडीवर आहे.

आयुषचं ‘फर्स्ट क्लास’ शतक

सर्व्हिस प्लेइंग इलेव्हन : रजत पालीवाल (कर्णधार), शुभम रोहिल्ला, अंशुल गुप्ता, रवी चौहान, वरुण चौधरी, मोहित अहलावत (विकेटकीपर), अर्जुन शर्मा, पुलकित नारंग, अमित शुक्ला, नितीन यादव आणि पूनम पुनिया.

मुंबई प्लेइंग इलेव्हन : अजिंक्य रहाणे (कर्णधार), अंगकृष्ण रघुवंशी, आयुष म्हात्रे, सिद्धेश लाड, श्रेयस अय्यर, आकाश आनंद (विकेटकीपर), शम्स मुलाणी, शार्दूल ठाकुर, एम जुनेद खान, मोहित अवस्थी आणि हिमांशू वीर सिंग.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.