गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
निलेश बुधावले, एबीपी माझा November 14, 2024 09:43 PM

Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड वापरून आणि धमक्या देऊन निवडणुका जिंकता येत नाहीत, ही बाब देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावी, अशा शब्दात आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल  केला आहे. रोहित पवार यांनी तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणल्याची दबक्या आवाजात पोलीस यंत्रणेतच चर्चा असल्याचे म्हटले आहे. तसेच कर्जत मतदारसंघात मलिदा वाटण्यासाठी आणि लोकांना धमकावण्यासाठी गुंडांच्या टोळ्या फिरत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. 

तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणल्याची दबक्या आवाजात चर्चा

रोहित पवार यांनी ट्विट करत म्हटले आहे की, रोहित आबा पाटील यांच्या तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणल्याची दबक्या आवाजात पोलीस यंत्रणेतच चर्चा आहे. माझ्या मतदारसंघातही मलिदा वाटण्यासाठी आणि लोकांना धमकावण्यासाठी गुंडांच्या टोळ्या फिरतायेत. पण गुंड वापरून आणि धमक्या देऊन निवडणुका जिंकता येत नाहीत, ही बाब देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावी. हा स्वाभिमानी आणि खंबीर महाराष्ट्र आहे, इथं गुजरातची स्टाईल चालत नसते. म्हणूनच रोहित आबा पाटील यांच्यासोबत आम्ही सर्वजण आहोतच आणि राज्यभरातल्या आपल्या कार्यकर्त्यांनीही उभं राहावं, ही विनंती!

महाराष्ट्रात MVA ला किती जागा मिळतील?

दरम्यान,  रोहित पवार यांनीही महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला किती जागा मिळतील याचा उल्लेख केला आहे. ते म्हणाले की, “आमच्या समजुतीनुसार, सुमारे 167-170 जागा मिळतील. आम्ही लोकांमध्ये जाऊन त्यांच्याशी बोलत आहोत. सध्या येथील वातावरण लोकसभा निवडणुकीच्या वेळेसारखेच आहे.

महाराष्ट्रात फारसा विकास झाला नाही 

रोहित पवार म्हणाले की, “विकासाकडे पाहिले तर महाराष्ट्रात फारसा विकास झालेला नाही. जर तुम्ही गुजरात आणि महाराष्ट्राची तुलना केली तर महाराष्ट्र विकासाच्या बाबतीत नेहमीच पहिल्या क्रमांकावर राहिला आहे पण गेल्या 10 वर्षात आपण 10 व्या क्रमांकावर गेलो आहोत, जे चांगले नाही. भाजप हा महाराष्ट्राच्या विकासातील अडसर आहे. महाराष्ट्रातून बरीच गुंतवणूक गुजरातमध्ये गेली.

इतर महत्वाच्या बातम्या

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.