Maharashtra Election 2024 Marathi News : महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. पण निवडणूक काळात गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी निवडणूक आयोगानं काही नियम घालून दिले आहेत. यासाठी ठराविक निवडणूक आचारसंहिता घालून दिली आहे.
पण राजकीय नेत्यांना आणि त्यांच्या समर्थकांना मात्र याचं भान नाही. नियम हे मोडण्यासाठीच असतात की काय अशी त्यांची वृत्ती दिसते आहे. कारण गेल्या महिन्याभरात राज्यात तब्बल ६ हजारांहून अधिक आचारसंहिता भंगाच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत.
विधानसभा निवडणुकीसंदर्भात १५ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर यादरम्यान राज्यभरात एकूण सहा हजार ३८२ तक्रारी प्राप्त झाल्या. सी-व्हिजिल ॲपवर या तक्रारी आल्या आहेत. राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांनी १५ ऑक्टोबरपासून बेकायदा पैसे, दारू, अमली पदार्थ, मौल्यवान धातू आदींच्या विरोधात केलेल्या कारवाईत एकूण ५३६ कोटी ४५ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.
दरम्यान, ६,३८२ तक्रारी निवडणूक आयोगाकडं दाखल झाल्या आहेत. यापैकी ६,३८१ तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं दिली आहे. निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात मतदारांची दिशाभूल करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाचे अधिकारी गैरप्रकार रोखण्यासाठी सज्ज असल्याचंही आयोगानं सांगितलं आहे.