बाबा सिद्दीकींच्या मारेकऱ्यांच्या निशाण्यावर पुण्याचा नगरसेवक? चौकशीत खळबळजनक माहिती समोर
एबीपी माझा वेब टीम November 15, 2024 02:13 PM

Baba Siddique Murder Case: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी (Baba Siddique) यांच्या हत्या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू आहे. या हत्या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. या घटनेचे पुण्यात देखील कनेक्शन समोर आले आहे. त्यानंतर आता बाबा सिद्दीकींच्या (Baba Siddique) मारेकऱ्यांच्या निशाण्यावर पुण्याचे एक नगरसेवकही असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या हत्या प्रकरणातील आरोपी शिवाच्या चौकशीत धक्कादायक माहिती उघड झाली आहे. शुभम लोणकरच्या निशाण्यावर पुण्याचे एक नगरसेवक असल्याचा शिवाचा दावा आहे. आता तो नगरसेवक कोण आहे, अशा चर्चा देखील सुरू झाल्या आहेत. 

बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांच्यावर गोळीबार केलेल्या शूटर  शिवकुमार गौतम उर्फ शिवा याने चौकशीदरम्यान अनेक मोठे खुलासे केले आहेत. बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांच्यावर गोळीबार केल्यानंतर शूटर शिवकुमार गौतम याने पुन्हा एकदा त्यांच्यावर लक्ष ठेवले, गोळीबार केल्यानंतर तो पुन्हा एकदा त्या कपडे बदलून घटनास्थळी आला, त्यानंतर घटनास्थळाची स्थिती पाहत राहिला. त्यानंतर बाबा सिद्दीकींना (Baba Siddique) लिलावती रूग्णालयात दाखल केलं त्यावेळी तो त्यांच्यामागे हॉस्पिटलमध्ये गेला आणि रूग्णालयाच्या बाहेर तो जवळपास 30 मिनिटे थांबला. तो सिद्दीकी यांच्या तब्येतीची माहिती गोळा करत होता असंही त्याने चौकशी दरम्यान सांगितलं आहे. 

पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?

बाबा सिद्दीकींवर (Baba Siddique) हल्ला केल्यानंतर शूटर शिवकुमार गौतम उर्फ शिवा घटनास्थळावरून पळाला. त्यानंतर तो पुन्हा कपडे बदलून घटनास्थळवर आला आणि गर्दीत उभा राहिला. त्यावेळी पोलिसांनी घटनास्थळी उपस्थित असलेल्यांकडे पोलिसांनी चौकशी केली त्यावेळी, पोलिसांनी त्याच्याकडे शूटर्सना पाहिले का, अशी विचारणाही केल्याचंही चौकशीत समोर आलं आहे.   

शिवकुमार गौतम उर्फ शिवाच्या चौकशीवेळी त्याने अनेक धक्कादायक गोष्टी सांगितल्या आहेत. आरोपी शिवा गोळीबारानंतर घटनास्थळावरून पळून गेला. काही अंतरावर जाऊन त्याने बॅगेत आणलेले शर्ट बदलला, पिस्तूल, शर्ट बॅगेत भरून हल्ला केल्याच्या ठिकाणापासून 100 मीटर अंतरावर उभ्या असलेल्या कारजवळ फेकून दिली. त्यानंतर त्याने घटनास्थळाचा आढावा घेतला पुढे  शिवाने लीलावती रुग्णालय गाठलं. रुग्णालयाबाहेर सिद्दिकी यांच्या प्रकृतीबाबत चौकशी केली. तेव्हा त्यांच्या वाचण्याची शक्यता कमी असल्याचं समजताच तो तेथून परत घटनास्थळी गेला. तेथे पोलिसांनी धर्मराज कश्यप आणि गुरुमेल सिंग या दोन साथीदारांना पकडल्याचं देखील त्याने पाहिलं. घटनास्थळी जमलेल्या गर्दीत थांबून तो सगळ्या घडामोडींचा आढावा घेत होता. 

आपले साथीदार पकडल्याचं पाहून तो घटनास्थळावरून कुर्ल्याला गेला. तेथून त्याने ठाणे मार्गे पुणे गाठलं. शिवाने वाटेत आपला फोन फेकून दिला. पुण्याहून झाशी आणि लखनऊमार्गे बहराईचला पोहोचला. प्रवासावेळी त्याने अनोळखी व्यक्तीचे फोन वापरून सहकाऱ्यांशी आणि हँडलर्सशी संपर्क साधल्याचं त्याने चौकशीवेळी पोलिसांना सांगितलं आहे. 

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.