तारुण्य कोणाला नको? शरीरात प्राणरस ओतप्रोत भरलेला असेल तर जीवन सुखमय होते. जीवन हे नेहमी वाहते असते व म्हणूनच जिवंतपणा वाहत्या रसाशी जोडलेला असतो. त्यामुळेच जीवनरस वाढविणारे ते ‘रसायन’. निसर्गात सुलभतेने व सहजपणे मिळणारे जीवनरसायन म्हणजे ‘आवळा’. तरुण होण्यासाठी आवळा उपयोगी असतो, तसेच तारुण्यात आवळे खाण्याची मजा काही और असते. जीवनाची अर्धी वाटचाल पुढे गेल्यावर ‘तारुण्याकडे पुन्हा वळा’ असे जणू काही सांगणारा ही स्वर्गीय आवळा.
च्यवनऋषींनी म्हातारपणी लग्न केले. त्यांची पाठ एवढी वाकलेली होती की त्यांचे डोके जमिनीला टेकलेले होते. अशा परिस्थितीत लग्न करून, संसार करून, मुले-बाळे व्हायची असल्यामुळे त्यांनी देवांच्या वैद्यांनी सुचविलेले रसायन म्हणजे च्यवनप्राश सेवन केले. च्यवनप्राशमधील मुख्य घटक असतो आवळा. च्यवनप्राश बनविताना आवळ्यावर अनेक वनस्पतींचे संस्कार केले जातात.
अगदी सुरुवातीला वनस्पतींचा काढा उकळत असताना त्यात आवळे बांधलेली पोटली सोडली जाते जेणेकरून आवळ्यांवर काढ्यातील वनस्पतींचा संस्कार होईल. आवळे शिजल्यावर आवळ्यातील बिया व धागे वेगळे काढून राहिलेल्या गर-माव्यापासून बऱ्याच प्रक्रियेनंतर च्यवनप्राश तयार होतो.
च्यवनप्राश बनविताना वापरलेल्या वनस्पतींचे चूर्ण सेवन करण्याने च्यवनप्राशचा गुण मिळणार नाही. आवळे शिजवून आवळ्याच्या गरात साखर व वनस्पतींची चूर्णे टाकून, शिजवून, घोटून तयार केलेल्या जॅमसारख्या पदार्थ बऱ्याचदा च्यवनप्राश म्हणून विकला जातो. अशा प्रकारे बनविलेला च्यवनप्राश सेवन केल्यास अपेक्षित गुण मिळणे अवघड वाटते.
कारण अशा च्यवनप्राशमध्ये विशिष्ट सर्व द्रव्ये एकत्रित असले तरी च्यवनप्राश बनविताना करण्यात येणारे विशिष्ट प्रकारचे संस्कार महत्त्वाचे असतात. म्हणून वनस्पतींचा काढा तयार केला जात असताना त्यात आवळे उकळवणे, नंतर अशा आवळ्यांच्या गरापासून रेषा व बिया वेगळ्या करून, गर-मावा तेला-तुपावर परतून त्याचा निक्षेप आटवलेला काढा व साखरेचा पाक या मिश्रणात टाकून शिजविणे, तयार होत आलेल्या अवलेहात चूर्णे मिसळणे व अवलेह अग्नीवरून खाली उतरवल्यानंतर कोमट असताना मध मिसळणे.
खरे पाहता ग्रंथोक्त आज्ञेनुसार वरील पद्धतीने बनविलेल्या च्यवनप्राशालाच आयुर्वेदिक म्हणता येईल. अशा प्रकारे बनविलेला च्यवनप्राश सेवन केल्यासच आपल्याला अपेक्षित गुण मिळू शकतो. अशा शास्त्रोक्त विधीनुसार बनविलेला च्यवनप्राश खाल्ल्यानंतर च्यवनऋषी तरुण झाले, त्यांचा सुखी संसार मुला-बाळांनी बहरून गेला.
च्यवनप्राश हे जरी श्र्वास-कास यासाठी उपयोगी असणारे रसायन आहे असे जरी म्हटलेले असले तरी ज्याअर्थी मेरुदंड वाकल्यामुळे पाठीला आलेला बाक सरळ झाला त्याअर्थी मेरुदंडासाठी व पुन्हा ताठ मानेने जगता येईल अशा तारुण्यासाठी उपयोगी पडणारे पण हे रसायन आहे. प्राणशक्तीचे आकर्षण हवेतून आलेल्या व फुप्फुसांमध्ये रक्तात मिसळलेल्या प्राणशक्तीमुळेच होते तेव्हा श्र्वास-कासावर च्यवनप्राशाचा उपयोग होत असेल पण तितकाच उपयोग तारुण्यासाठी व मेरुदंडाच्या तक्रारींसाठी व्हावा यात काही नवल नाही.
आवळ्याचे अनेक प्रकार असतात. डोंगरी आवळ्यात बी मोठी असते, गर त्यामानाने कमी असतो व गरात धागे अधिक असतात. हे आवळे चवीला अधिक तुरट असतात. काही प्रकारचे आवळे मोठे रसरसशीत, अधिक गर व अधिक रस असणारे असतात. अपरिपक्व म्हणजे नीट न वाढलेले आवळे व झाडावरून गळून खाली पडून वाळलेले आवळे औषधाच्या दृष्टीने एवढेसे उपयोगी नसतात.
असे आवळे वाळवून आवळकाठी वा आवळकाठीचे चूर्ण म्हणून विकले जाते किंवा त्यांना भिजत घालून च्यवनप्राशसारख्या रसायनात वापरलेले दिसते. असे कमी दर्जाचे आवळे वापरल्यामुळे अशा वस्तूंचे प्रभाव खूपच कमी झाले असल्याचे दिसते. त्यामुळे अशी उत्पादने स्वस्त वाटली तरी त्यांची उपयोगिता व गुण खूपच कमी असतात.
त्यामुळे, औषधांचे उत्पादन करतेवेळी आवळे रसरसशीत व ताजे हवेत. रसरसशीत ताज्या आवळ्यांचा रस साखरेबरोबर वा मधाबरोबर घेण्याने उपयोग होतो. मीठ लावून आवळे खाण्यात कसा आनंद होतो हे तरुण मुलींना विचारायला हरकत नाही. आवळ्याचे लोणचे हा एक पचनासाठी मदत करणारा अप्रतिम पदार्थ आहे.
त्याहीपेक्षा उपयोगी व महत्त्वाचा पदार्थ आहे मोरावळा. साखरेच्या पाकात मुरलेला आवळा म्हणजे मोरावळा. पूर्ण आवळे टोचे मारून गरम पाण्यात किचित वाफवून साखरेच्या पाकात टाकून किंवा किसून साखरेच्या पाकात टाकून मोरावळा केला जातो. मोरावळा करण्याची कृती कोणतीही असली तरी मोरावळा मुरू देणे म्हणजेच जुना होऊ देणे खूप महत्त्वाचे असते. म्हणून जुना मोरावळा गुणांमध्ये श्रेष्ठ असतो.
पित्तशामक म्हणून मोरावळ्याचा खूप उपयोग होतो. वाढलेले पित्त, मग ते उन्हाळ्यातील असो वा इतर ऋतूतील, नेहमीच त्रास देते व ते मेंदूचे व डोळ्यांचे अधिक नुकसान करते. अशा वेळी मोरावळ्याचा खूप उपयोग होतो. यकृत व्यवस्थित काम करत नसल्यास किंवा यकृताचा आकार वाढत असल्यास मोरावळ्याचा चांगला उपयोग होतो.
अशा वेळी दिवसातून दोनदा मोरावळा खाण्याने खूप उपयोग होताना दिसतो. गुलाबाची फुले साखरेत टाकून तयार झालेल्या गुलकंद सेवन केल्यासही शरीरात शीतता व शांतता उत्पन्न होते, परंतु ज्यांना गोड चव फारशी आवडत नाही, आंबटगोड चव आवडते व ज्यांना पित्तशमानाची अधिक गरज आहे त्यांनी मोरावळा सेवन करणे अधिक योग्य ठरते.
केवळ आवळ्याच्या फळातच रसायनाचे गुण आहेत असे नव्हे तर आवळ्याच्या झाडाच्या वातावरणातही हा गुण आलेला दिसतो. त्यामुळे आवळ्याच्या झाडाच्या सान्निध्यात राहिल्यानेही पित्तशमन, रक्तसंवर्धन, रक्ताभिसरण वाढून शरीराला ‘रसायनाचे’असे फायदे मिळतात.
म्हणूनच कार्तिक महिन्यात एकादशी ते पौर्णिमा या काळात आवळी भोजन, आवळीपूजन वगैरे करण्याची परंपरा असल्याचे दिसते. या दिवशी आवळ्याच्या झाडाखाली बसावे, विश्रांती घ्यावी, तेथे बसून काही खावे, जेणेकरून झाडाच्या आजूबाजूला असलेल्या प्राणशक्तीचा उपयोग होईल, अशी प्रथा असलेली दिसते.
भगवान विष्णूंना जशी तुळसी प्रिय आहे तसा त्यांना आवळाही प्रिय आहे. म्हणून आवळ्याच्या झाडाखाली बसून विष्णुपूजन केल्याने पुण्य मिळते असे म्हणतात.
‘आवळा देऊन कोहळा काढणे’ अशी एक म्हण आहे. याचा अर्थ असा की बारीकशी वस्तू देऊन त्याच्या मोबदल्यात मोठा मोबदला मिळविणे. कोहळा हे सुद्धा रसायनच आहे पण त्यात सर्व सहा रस नसतात तर पाच रस असतात. कोहळ्याचाही वीर्यवर्धनासाठी उपयोग होतो म्हणून आकाराने लहान असलेल्या आवळ्याची तुलना आकाराने मोठ्या असलेल्या कोहळ्याशी बरोबरी करून अशी म्हण व्यवहारात आली असावी.
असा हा बहुगुणी, रसायनी, तारुण्य देणारा, नवजीवन देणारा आवळा, आवळ्यापासून बनविलेला मोरावळा व पूर्ण रसायनात रूपांतर केलेले च्यवनप्राश, ‘अमरप्राश’, ‘आत्मप्राश’, ‘सुहृदप्राश’ असे अनेक प्रकारचे प्राश मनुष्याला आयुष्यवृद्धी व शांती देण्यासाठी खूपच उपयोगी पडताना दिसतात.
(श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांच्या लेखन, व्याख्यानांतून संतुलन आयुर्वेदद्वारा संकलित)