दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघ : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ची (Maharashtra Assembly Election 2024) रणधुमाळी सुरु झाली आहे. या निवडणुकांच्या अनुषंगाने जवळ जवळ सर्वच राजकीय नेते मैदानात उतरून आपल्या पक्षाचा आणि उमेदवारांचा प्रचार, प्रसार करत आहे. तर गल्लीपासून दिल्लीपर्यंत राजकीय मंडळी आपला अजेंडा मतदारराजाला पटवून देत मतांचा जोगवा मागत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, देशाच्या केंद्रस्थानी असलेल्या आणि राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर(Nagpur) जिल्ह्यात यंदा कोणाची हवा असणार आहे, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. कारण राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते यंदा नागपूरच्या 12 मतदारसंघातून रिंगणात उतरून एकमेकांविरुद्ध आव्हान देत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे नागपूरच्या 12 मतदारसंघात महायुती की मविआ, या पैकी कोण बाजी मारणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
नागपूरच्या 12 मतदारसंघापैकी दक्षिण नागपूर मतदारसंघात (South Nagpur Vidhan Sabha Constituency) यंदा ‘काटे की टक्कर’ बघायला मिळणार आहे. कारण गेल्या 2019 च्या निवडणुकीत फक्त चार हजारांवर निकाल लागलेल्या या मतदारसंघात पुन्हा एकदा दोन्ही प्रमुख पक्षांकडून जुनेच सरदार लढाईच्या मैदानात उतरले आहेत. भाजपचे विद्यमान आमदार मोहन मते (Mohan Mate) यांच्या विरोधात काँग्रेसने पुन्हा गिरीश पांडव (Girish Pandav) यांच्यावर विश्वास दाखविला आहे.
मोहन मते हे उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे अत्यंत जिवलग मित्र आहेत, तर गिरीश पांडव हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विदर्भातील उजवे हात समजले जाणारे किरण पांडव यांचे बंधू आहेत. त्यामुळे दक्षिणच्या राजकीय महाभारतात मते आणि पांडव यांच्यात काट्याची लढाई होण्याची चिन्हे आहेत. या मतदारसंघावर भाजपचा दबदबा राहिला आहे. मात्र 2014 मध्ये भाजपचे सुधाकर कोहळे जायंट किलर ठरले. त्यांनी काँग्रेसचे बडे नेते सतीश चतुर्वेदी यांना तब्बल 43 हजार 214 मतांनी मात दिली. पण 2019 मध्ये भाजपने कोहळे यांचे तिकीट कापले आणि मोहन मते यांच्यावर विश्वास दाखविला. तर दुसरीकडे काँग्रेसने गिरीश पांडव यांना मैदानात उतरविले. त्यांना नाराज कोहळे समर्थकांची पडद्यामागून साथ मिळाली. प्रमोद मानमोडे, किशोर कुमेरिया, सतीश होले या आघाडीच्या नेत्यांच्या बंडखोरीनंतरही ‘टफ’ फाईट झाली. त्यामुळे मते हे फक्त 4013 मतांनी विजयी झाले.
लोकसभा निवडणुकी 2024 च्या दक्षिण नागपुरात भाजप नेते नितीन गडकरी यांना 29 हजार 712 मतांची आघाडी मिळाली. आता अखेरच्या क्षणी भाजपने मास्टर कार्ड खेळत सुधाकर कोहळे यांना पश्चिम नागपुरात उमेदवारी दिली आणि कोहळे समर्थकांची नाराजी शमविण्याचा प्रयत्न केला. आघाडीत शिवसेनेच्या कोट्यात जात असलेली जागा कायम राखण्यसाठी काँग्रेस नेत्यांनीही मुंबई-दिल्लीत झुंज दिली. शेवटी पुन्हा एकदा गिरीश पांडव यांनाच गेल्या वेळची उरलेली लढाई पूर्ण करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. विशेष म्हणजे यावेळी काँग्रेससह मित्रपक्षातूनही कुणी बंडखोरी केलेली नाही. त्यामुळे महाविकास आघाडी एकसंधपणे लढत असल्याचे चित्र आहे.
दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघात यंदा तांडव होईल आणि पांडव विजयी होईल असा दावा दक्षिण नागपूरचे काँग्रेस उमेदवार गिरीश पांडव यांनी केला आहे. देवा भाऊ (देवेंद्र फडणवीस) जरी दक्षिण नागपूरच्या भाजप उमेदवार मोहन मते च्या पाठीशी उभे असले तरी माझ्या पाठीशी कृष्णरुपी जनता आहे, आणि कृष्णेच्या सहाय्याने पांडवांचा विजय होईल असा विश्वास गिरीश पांडव यांनी व्यक्त केला आहे.
माझे सख्खे बंधू किरण पांडव हे मुख्यमंत्र्यांचे खास विश्वासू आहे, तरी त्यांच माझ्याशी रक्ताचा नातं आहे. त्यामुळेच ते महायुतीच्या प्रचारात दिसत नसावे. ते (मुख्यमंत्र्यांचे विश्वासू किरण पांडव) प्रत्यक्षपणे माझ्या प्रचारात नसले, तरी त्यांचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे. दक्षिण नागपुरात आम्ही परिवर्तन घडवून दाखवू असा, दावाही गिरीश पांडव यांनी केला आहे.
मोहन मते – भाजप ८४.३३९
गिरीश पांडव – काँग्रेस ८०,३२६
शंकर थूल – बसपा ५६६८
रमेश पिसे – वंचित
सतीश होले- अपक्ष ४६३१
सुधाकर कोहळे- भाजप ८१,२२४
सतीश चतुर्वेदी काँग्रेस ३८,०१०
सत्यभामा लोखंडे – बसपा 23.156
शेखर सावरबांधे अपक्ष १५,१०७
हे ही वाचा
अधिक पाहा..