मुंबई : राज्यातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भरारी पथकाकडून आत्तापर्यंत मोठी रक्कम जप्त करण्यात आली आहे. अवैध मार्गाचा पैसा किंवा बेहिशोबी मालमत्ता निवडणूक स्थिर पथके, पोलीस यंत्रणा व भरारी पथकाने जप्त केली आहेत. त्यानुसार, गेल्या महिनाभरात 546 कोटी 84 लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. तर, विधानसभा (Vidhansabha) सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर 2024 दरम्यान राज्यभरात सी-व्हिजिल (C-Vigil) ॲपवर एकूण 7 हजार 400 तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी 7 हजार 360 तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे. दरम्यान, पुढील 4 दिवसांत निवडणूक प्रचारसभांची सांगता होईल, त्यानंतरीही आदर्श आचारसंहिता लागू असणार आहे.
राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांनी 15 ऑक्टोबरपासून बेकायदा पैसे, दारू, अमली पदार्थ, मौल्यवान धातू आदींच्या विरोधात केलेल्या कारवाईत एकूण 546 कोटी 84 लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. त्यामुळे, राज्यभर आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी सुरू असल्याचे पाहायला मिळते. आता निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात आला असून पुढील काही दिवसांत प्रचारांची सांगता होणार आहे. त्यानंतर, 20 नोव्हेंबर रोजी राज्यात महाराष्ट्रातील 288 मतदारसंघात मतदान होऊन 23 नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर केला जाईल. मात्र, निवडणूक निकालाच्या तारखेपर्यंत राज्यात आदर्श आचारसंहिता सुरूच राहणार आहे. त्यामुळे, 23 नोव्हेंबरपर्यंत आचारसंहिता भंग संदर्भात नागरिकांना, उमेदवारांना आणि इतरांनाही आचारसंहिता भंगबाबत तक्रार देता येईल.
दरम्यान, मुंबई, पुणे, भिवंडी, ठाणे यांसह मराठावाड्यातही पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात रोकड जप्त करण्यात आली आहे. तर, शुक्रवारीच अमरावतीत पोलिसांनी 5 कोटी रुपयाचं सोने-चांदी घेऊन जाणारं वाहन केलं जप्त होतं. त्याबाबत शहरातील नागपुरी गेट पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे. मात्र, सिक्वेल लॉजीस्टिक नागपूर यांच ते वाहन असल्याची प्राथमिक माहिती आहे. हे वाहन नागपूरवरुन सोने आणि चांदीचे दागिने घेऊन विविध जिल्ह्यात वितरण करत असते. विशेष म्हणजे हेच वाहन तिवसामध्ये सुद्धा काही दिवसांपूर्वी पकडले होते. त्यावेळी 64 किलो सोने आणि चांदीचे दागिने होते, पण तीन दिवसानंतर ते वाहन सोडून देण्यात आले होते.
सी-व्हिजिल ॲपद्वारे नागरिक आचारसंहितेच्या उल्लंघनाबाबत तक्रार दाखल करू शकतात. हे ॲप कोणत्याही ॲपस्टोअरमधून डाउनलोड करता येते. तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित पथकाद्वारे चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्यात येते.