हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे ते दिलीप वळसे, शरद पवारांचा दिग्गज मंत्र्यांना घेराव; आक्रमक होत पाडण्याचं आवाहन
जयदीप मेढे November 16, 2024 01:13 AM

Sharad Pawar, मुंबई : राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक होत आहे. यानिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार चांगलेच आक्रमक झाले आहेत. सोडून गेलेल्या दिग्गज नेत्यांच्या मतदारसंघात जात शरद पवार स्वत: या नेत्यांना पराभूत करण्याचं आवाहन करत आहेत. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या काळात नेत्यांच्या टेंशनमध्ये वाढ झाली आहे. शरद पवार फक्त टीकाच करत नाहीयेत तर भाजपसोबत गेले नसते तर तुरुंगात जावं लागेल, असं या नेत्यांनी सांगितल्याचंही ते बोलत आहेत. 

शरद पवार यांनी हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे ते दिलीप वळसे अशा दिग्गज मंत्र्यांना घेराव घातला आहे. शरद पवार सोडून गेलेल्या प्रत्येक नेत्यांच्या मतदारसंघात जात आहेत. त्यांना 100 टक्के पराभूत करा, असं आवाहन देखील करत आहेत. याशिवाय दिग्गज नेत्यांच्या मतदारसंघात शरद पवारांनी त्यांचे विरोधक गळाला लावून त्यांना पराभूत करण्याचे प्रयत्न केले होते. नव्याने संधी दिलेल्या उमेदवारांना विजय करण्यासाठी शरद पवार पायाला भिंगरी लावून महाराष्ट्रात फिरताना दिसत आहेत. 

धनंजय मुंडेंविरोधात काय बोलले शरद पवार? 

पक्ष म्हणून काही संकट आली. अनेक अडचणी आहेत. राजकीय पक्ष उभा केला, काही लोकांनी पक्ष फोडण्याचं काम केलं. त्याच्यामध्ये तीन लोक प्रामुख्याने होते. राष्ट्रवादीमध्ये अंतर वाढवणारे, सहकाऱ्यांमध्ये गैर विश्वास वाढवणारे दोन तीन लोक होते. त्या दोन तीन लोकांमध्ये कोण आहेत हे मी सांगण्याची आवश्यकता नाही. ज्यांनी पक्ष सोडला, ज्यांनी पक्ष फोडला. ज्यांनी समाजामध्ये अंतर वाढवण्याची भूमिका घेतली. ज्यांनी बीड जिल्ह्याचा आदर्श उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला, अशा व्यक्तीला उद्याच्या निवडणुकीत पराभूत करा. राजेसाहेबांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा, असं आवाहन शरद पवारांनी परळीत केलं.

दिलीप वळसेंविरोधात पवार काय म्हणाले?

माझी पत्नी वर्षातून एकदा भीमाशंकरला जाते, आत्ता अलीकडे ही ती भीमाशंकरला आली. मी विचारलं नेहमी सारखी व्यवस्था होती का? त्या म्हणाल्या यावेळी दिलीप वळसेंच्या घरी गेलीच नाही, थेट भीमाशंकर दर्शन घेऊन परतले.आता यांनी बोलायला काय ठेवलं आहे का? त्यांनी एकचं गोष्ट ठेवली, फक्त गद्दारी केली. ज्यांनी गद्दारी केली, त्यांना शिक्षा द्यायची असते. महाराजांसोबत ज्यांनी गद्दारी केली त्यांना कधी सोडलं का? त्यामुळं आपल्यासोबत गद्दारी केली, त्यांना सुट्टी नाही. या गद्दारांचा मोठ्या फरकाने पराभव करा आणि देवदत्त निकमांना आमदार बनवा, असं शरद पवार म्हणाले होते. 

हसन मुश्रीफांविरोधात शरद पवार काय म्हणाले?

लोकांनी निवडून दिलेल्याची बांधिलकी न जपता तुम्ही खुशाल निघून गेला. कशात तरी हात गुंतले असतील बरबटलेले असतील तरच अशी भीती वाटते. ईडीच्या भीतीने जे लोक आम्हाला सोडून गेले त्यांच्या फायली  भाजपने बाजूला ठेवले आहेत. लोकं निर्लज्जासारखं आम्हाला सोडून गेले.  काही लोक मोठ्या तोंडाने सांगत आहेत मी पवारांना सांगून गेलो. आपण झक मारायची आणि दुसऱ्याचं नाव घ्यायचं असा हा प्रकार आहे. हसन मुश्रीफ यांना पाडलंच पाहिजे... पाडलंच पाहिजे... पाडलंच पाहिजे, असं पवार कागलमध्ये म्हणाले. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप

 

 

 

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.