पुणे - 'मुस्लिम धर्मगुरु सज्जाद मेमाणी यांनी मुस्लिम आरक्षण, दंगलीतील खटले मागे घेणे व राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी अशा केलेल्या 17 मागण्या महाविकास आघाडीने मान्य केल्या आहेत. लोकसभा निवडणुकीवेळी जे केले, ते विधानसभा निवडणुकीत पुन्हा करू, येणारे सरकार आपल्या बोटांवर नाचवणार असे त्यांना वाटत आहे. पण ते "व्होट जिहाद' करणार असतील, तर आपल्याला मतांचे धर्मयुद्ध करावेच लागेल. हे मत तुमच्या पुढच्या पिढ्यांसाठी, देशासाठी महत्वाचे आहे.' अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर शुक्रवारी पुण्यात निशाणा साधला.
खडकवासला विधानसभेचे उमेदवार भीमराव तापकीर यांच्यासाठी धनकवडी येथे तर, कसबा मतदारसंघाचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारासाठी शनिपार चौकाजवळ उपमुख्यमंत्री फडणवीस यांची शुक्रवारी रात्री सभा झाली. यावेळी उमेदवार भीमराव तापकी, हेमंत रासने, भाजपचे प्रदेश महामंत्री राजेश पांडे, माजी आमदार जगदीश मुळीक, माजी महापौर दत्तात्रय धनकवडे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष दीपक मानकर, भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) पक्षाचे शहराध्यक्ष संजय सोनवणे, कुणाल टिळक, गौरव बापट आदी उपस्थित होते.
कसबा मतदारसंघातील सभेत फडणवीस यांनी नवीन नियमावलीमुळे जुन्या वाड्यांचा पुनर्विकास गतीने होईल, तसेच शनिवारवाड्याभोवतीच्या १०० मीटर परिसरात बांधकामाबाबत नवीन नियमावलीसाठी प्रयत्न करणार असल्याचे जाहीर केले. पुण्याच्या विकासावर भर देताना ते म्हणाले, 'दिल्लीत मेट्रोचे काम सुरु झाले, दुर्दैवाने त्यावेळी पुण्यातील मेट्रोचे काम झाले नाही. मोदी सरकार आल्यानंतर मेट्रो काम सुरु झाले.
देशात मेट्रोचे सर्वात वेगाने काम पुण्यता झाले आहे. स्वारगेट मेट्रो स्थानक 'मल्टिमॉडेल' स्थानक आहे, मेट्रोचे जाळे विस्तारत आहे. सर्वाधिक इलेक्ट्रिक बस पुण्यात आहेत. पुण्याच्या रिंगरोडचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न सुरु आहे. १०० किलोमीटरच्या रिंगरोडचे काम करून त्यावर 'मल्टिमॉडेल रॅपिड ट्रान्सपोर्ट सिस्टीम' सुरु करणार आहोत. त्यामुळे पुण्यातील वाहतुक कोंडी संपेल. नदीसुधार प्रकल्पामुळे प्रक्रिया केलेले शुद्ध पाणी नदीत सोडले जाईल. पुण्याला नवीन विमानतळ लवकर सुरू करू. ' रासने यांनी पराभवानंतर चांगले काम केल्याचा उल्लेख त्यांनी केला.
धनकवडी येथील सभेत बोलताना फडणवीस म्हणाले, 'पुण्यातून बाहेर जाणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर तिहेरी एलिव्हेटेड रस्ते करण्याचे नियोजन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. त्याचा पुण्याला फायदा होईल. पुण्याचा चेहरा बदलण्याचे काम महायुती सरकारने केले आहे.
पुण्याला देशातील एआय हब, तंत्रज्ञान हब बनवून रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळवल्याचा आरोप शरद पवार, सुप्रिया सुळे करतात. पण थेट परकीय गुंतवणुकीत तुम्ही महाराष्ट्राला चौथ्या क्रमांकाला पोचवले होते, आम्ही पुन्हा एकदा थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्राला अव्वल स्थान प्राप्त करुन दिले.'
धंगेकर तर 'ऍक्सिडेंटल आमदार'
रासने पोटनिवडणुकीतील पराभवानंतर खचले नाहीत, याऊलट त्यांनी दुसऱ्या दिवसापासुन काम सुरु केले. कसब्यातील प्रश्नांसंदर्भात पुणे, मुंबई, दिल्ली येथे चांगला पाठपुरावा केला. धंगेकर हे "ऍक्सिडेंटल आमदार' आहेत. त्यांचे काम कमी व दंगेच जास्त असतात. त्यांना रंगभुमीवर नेले, तर ते "तो मी नव्हेच' हे पात्र चांगले रंगवतील, असा टोला फडणवीस यांनी आमदार धंगेकर यांना लगावला.
फडणवीस म्हणाले,
- राहुल गांधी यांच्याकडील लाल पुस्तक संविधान नाही, ती तर कोरी पाने
- महायुती सरकारने महिला, मुली, तरुण, शेतकऱ्यांना योजनांद्वारे आधार दिला
- महाविकास आघाडीने लाडकी बहिण योजनेवर टिका करून महिलांचा अपमान केला
- संविधान, आरक्षणाच्या नावावर लोकसभा निवडणुकीत त्यांनी जुमलेबाजी केली
- राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी आणण्याची त्यांची औकात नाही
- त्यांचे स्थगितीचे सरकार, आमचे गती व प्रगतीचे सरकार
#ElectionWithSakal