बटेंगे तो कटेंगे!
esakal November 16, 2024 01:45 PM

महाराष्ट्राची सगळ्यात मुख्य समस्या काय आहे? बेरोजगारी. बाहेर जाणारे उद्योगधंदे. शेतीची बिकट अवस्था... त्याचं एक मुख्य कारण आहे वाटण्या. राज्याची निवडणूक राज्याच्या मुद्द्यावर लढली जात नाही. फोडाफोडी, धार्मिक गोष्टी, कौटुंबिक गोष्टी हे महत्त्वाचे विषय बनलेत. राज्याच्या समस्या मागे पडल्यात. हे सगळं का झालं? इथे आपण लक्षात ठेवलं पाहिजे, बटेंगे तो कटेंगे!

राजकीय पक्ष कधी कधी प्रचार करताना खूप महत्त्वाच्या गोष्टी सांगून जातात. सध्या महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ शैलीत प्रचार चालू आहे. बटेंगे तो कटेंगे! आपला मुद्दा वेगळा आहे. महाराष्ट्रीय माणसाने ही ओळ खूप वेगळ्या प्रकारे विचार करण्यासारखी आहे. महाराष्ट्राची सगळ्यात मुख्य समस्या काय आहे? बेरोजगारी. बाहेर जाणारे उद्योगधंदे. शेतीची बिकट अवस्था... शेतीची बिकट अवस्था यायला अनेक कारणं आहेत; पण एक मुख्य कारण आहे वाटण्या. वाटण्या होत होत उरलेले छोटे तुकडे. त्या तुकड्यांवर शेती फायद्यात येणं अवघड आहे.

प्रत्येकाला वेगवेगळी गडी माणसं परवडणं अवघड आहे. लोक एकत्र होते तेव्हा ही समस्या जाणवत नव्हती. फार कशाला इर्जिकसारखी पद्धत होती. एकमेकांच्या शेतीत लोक काम करायचे. त्या बदल्यात शेतकरी सगळ्यांना जेवू घालायचा. हसत-खेळत एकमेकांची कामं व्हायची. वाटण्या झाल्या. घरातले लोक वाटले गेले आणि आपण आपले सुखात जगू म्हणून विचार करणारे आणखी अस्वस्थेत अन् कष्टात लोटले गेले. सामूहिक शेतीसारखे प्रयोग अजूनही स्वीकारले जात नाहीत. हिंदू-मुस्लिमपेक्षा शेतीत ‘बटेंगे तो कटेंगे’ हा विचार महत्त्वाचा आहे. वाटले गेल्याने कापूस वेचला जात नाही, उस कारखान्यात नेणं खूपदा अवघड होतं. मजुरी, वाहतूक खर्च वाढतो.

शेतीसारखाच मुद्दा रोजगाराच्या बाबतीत आहे. गावातसुद्धा लोक एकमेकांवर विश्वास ठेवण्यापेक्षा परप्रांतातून मजूर आणण्यावर भर देतात. छोट्या छोट्या शहरात, तालुक्यात बाहेरच्या राज्यातून आलेले मजूर दिसतात. हॉटेल असो, ढाबे असोत, कंपन्या असोत... स्थानिक लोकांना रोजगार नाहीत आणि बाहेरून आलेले लोक वाढत चाललेत. यात एक गाऱ्हाणं आहे ते स्थानिक लोक काम करत नाहीत. तरीही बाहेरून आलेले लोक काय पद्धतीचं काम करतात याचा अनुभव काय? मुंबईसारख्या शहरात चालणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सीचा प्रवास करणाऱ्यांना त्याचा चांगला अनुभव आहे.

परवाने मराठी माणसांच्या नावावर आणि चालवणारे बाहेरचे अशी परिस्थिती होती. आता परवाने पण मराठी माणसाकडे नाहीत. बाहेरच्या माणसांनी येऊ नये, राहू नये, असा मुद्दा नाही; पण एकटा महाराष्ट्र असा आहे, ज्यात तीस-चाळीस विधानसभा मतदारसंघ असे आहेत, जिथे निवडून येणारा उमेदवार बाहेरून आलेल्या लोकांच्या मतावर ठरू शकतो. एकट्या मुंबईत कितीतरी परप्रांतीय उमेदवार आहेत. मुंबईतल्या सगळ्यात श्रीमंत लोकांच्या यादीत किती मराठी आहेत? मुंबईतल्या सगळ्यात श्रीमंत वस्त्यांमध्ये किती मराठी माणसांचे बंगले आहेत? हे सगळ्या राजकीय पक्षांचं अपयश आहे, पण त्याहीपेक्षा महाराष्ट्रीय माणूस विभागला गेला हे मुख्य कारण आहे.

वाटला गेला म्हणजे मतदानात नाही. स्वतंत्र राहायचं, वेगळं राहायचं म्हणून जुनी मुंबई सोडून लोक मुंबईबाहेर गेले. हळूहळू मराठी टक्का कमी होत गेला. किराणा दुकान, मेडिकल, स्टेशनरी हे व्यवसाय एवढ्या वेगात महाराष्ट्रीय माणसाच्या हातून निघून गेले, की आज फक्त पश्चातापच करू शकतो आपण. एक उत्तम साखळी यात बाहेरच्या लोकांनी निर्माण केलीय. पानाचा व्यवसाय, हॉटेलचा व्यवसाय, टीव्ही वाहिन्या ताब्यात घेण्यात बाहेरचे लोक कधीच यशस्वी झालेत. एकत्र आहेत, ही कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे. त्याबद्दल तक्रार करण्याचा मुद्दा नाही; पण महाराष्ट्रीय माणूस वाटला गेलाय, याची खंत आहे.

निवडणुकीचा मुद्दा विचारात घेतला तरी किती उत्तर प्रदेश, बिहारवाले आणि गुजराती उमेदवार आहेत याचा विचार केला पाहिजे. जर महाराष्ट्रीय उमेदवार सापडत नसेल, तो निवडून येईल याची खात्री वाटत नसेल, तर ही भयंकर परिस्थिती आहे. बटेंगे तो कटेंगे! हा विचार इथे केला पाहिजे. ही परिस्थिती का आली, याचा विचार केला पाहिजे.

आणखी एक भयंकर मुद्दा. खूप पक्षांची निवडणूक रणनीती ही परक्या राज्यातले लोक ठरवताना दिसताहेत. करोडो रुपये घेऊन परक्या राज्यातला माणूस महाराष्ट्रातल्या नेत्यांना निवडणूक कशी लढवायची हे शिकवतोय आणि हे नेते तीस-चाळीस वर्षे राजकारणात आहेत. हे चित्र किती गंभीर आहे. तुमच्या राज्यातली निवडणूक कशी लढायची? कपडे कसे घालायचे? सोशल मीडियावर काय लिहायचं? हे शिकवायला परराज्यातला माणूस लागत असेल, तर अवघड आहे.

राज्याची निवडणूक राज्याच्या मुद्द्यावर लढली जात नाही. फोडाफोडी, धार्मिक गोष्टी, कौटुंबिक गोष्टी हे महत्त्वाचे विषय बनलेत. राज्याच्या समस्या मागे पडल्यात. हे सगळं का झालं? इथे आपण लक्षात ठेवलं पाहिजे, बटेंगे तो कटेंगे! जेव्हा राज्य एक नसतं, तेव्हा अशा गोष्टी घडतात. निवडणूक नेत्यांनी नाही जनतेने ठरवायची असते. जनता मतदान करत असते; पण आता प्रचाराची दिशा नेते ठरवतात. सोशल मीडियावर कुठला तरी फालतू विषय चालवायचा, मग लोक तो चघळत बसतात आणि सामान्य माणसाचे प्रश्न बाजूला राहतात.

बरं हे कुटुंबाचे प्रश्न तरी हे लोक गंभीरपणे घेताहेत का? राजकारण्यांच्या कुटुंबाचा प्रश्न नसतो. त्यामुळे राज्यातल्या सगळ्या कुटुंबात एक दुरी निर्माण होते. कलह तयार होतो. गट पडतात. भाऊ भाऊ वेगळ्या वेगळ्या गटात असतात. त्यात जातीपातीत लावली जाणारी भांडणं. महाराष्ट्रापुढे शेती एवढाच भयंकर प्रश्न जातीपातीतल्या वादाचा असणार आहे. कदाचित हा प्रश्न जास्त उग्र रूप धारण करू शकतो. या प्रचाराच्या गोंधळात याकडे कुणीतरी लक्ष देतोय का? हे सगळ्यात विदारक बटेंगे तो कटेंगे!

निवडणूक जिंकायच्या निमित्ताने जाहीर होणाऱ्या लोकप्रिय; पण आर्थिक गणित बिघडवणाऱ्या योजना ही मोठी डोकेदुखी आहे. मोफत प्रवास, महिलांना महिन्याला पैसेवाटप अशा अनेक योजना सगळे पक्ष जाहीर करताहेत, पण हे सगळे पैसे राजकीय पक्षांना खिशातून वाटायचे आहेत का? एकतरी पक्ष कधी स्वतःच्या पक्षनिधीतून एखादी योजना जाहीर करतो का? ते योजना जाहीर करतात ते जनतेच्या पैशातून. जनतेकडून रस्त्याचा, गाडीचा, जमिनीचा जो कर घेतला जातो त्या पैशातून. फुकट पैसे वाटायच्या या योजनांमुळे सरकार आपल्या तिजोरीत पैसे नाहीत हे सांगत सुटतं. पैसे नाहीत या कारणाने नवीन नोकरभरती होत नाही.

म्हणजे बहिणीला दीड-दोन हजार देण्याच्या नावाने बाकी लाखो भाऊ-बहीण पंचवीस-तीस हजारांची पर्मनंट नोकरी मिळवू शकत नाहीत. कुठल्याही पक्षाच्या असोत, या रेवडीसारख्या योजना अप्रत्यक्षपणे बेरोजगारी वाढवतात. आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, मुफ्तमें बटेंगे तो टॅक्स के पैसे कटेंगे! सगळ्याच पक्षांनी हे सुरू केलंय. म्हणून आता चांगला पक्ष नाही, चांगला उमेदवार बघून मत द्यावं लागेल. तसंही ममतादीदी, नितीश कुमार, केजरीवाल यांच्यासारखं कुठल्या एका नेत्याला आपल्या राज्याने खूप वर्षांत पूर्ण बहुमत दिलेलं नाही. आपल्याकडे एका एका पक्षाचे दोन दोन तुकडे आहेत. हे खरं तर मतदारांनी नाही या राजकारण्यांनी समजून घ्यावं, बटेंगे तो कटेंगे!

(लेखक चित्रपट लेखक, गीतकार, दिग्दर्शक आणि ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमाचे पत्रलेखक आहेत.)
© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.