सोहळा साहित्याचा
esakal November 16, 2024 01:45 PM

एनसीपीएमध्ये सध्या ‘द मुंबई लिटफेस्ट’ साहित्य महोत्सव रंगलाय. गुलजार यांच्याशी गप्पा अन् ऊर्दू शायर मीर तकी मीर यांच्यावरील कार्यक्रमानंतर आता जर्मन लेखक फ्रँझ काफ्का याच्या गाजलेल्या लघुकादंबरीतील निवडक भागांचे अभिवाचन, ग्रीक पौराणिक कथांत गाजलेल्या ‘ऑर्फियस’चा संगीतमय आविष्कार अशी चौफेर मेजवानी यानिमित्त अनुभवता येणार आहे.

मुंबईत दिवाळी संपल्यानंतर म्हणजे नोव्हेंबरच्या शेवटी, डिसेंबर आणि जानेवारी अशा तीन महिन्यांत साहित्य-कला वगैरे कार्यक्रमांची रेलचेल असते. त्यातील एक महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे ‘द मुंबई लिटफेस्ट’. या साहित्य महोत्सवाचं हे पंधरावं वर्ष. २०२४ च्या महोत्सवाचं उद्घाटन काल शुक्रवारी १५ नोव्हेंबरला एनसीपीएमध्ये झालं. ‘मुंबई लिटफेस्ट’मागे प्रेरणा होती कै. अनिल धारकर यांची. २०२१ मध्ये त्यांचं निधन झाल्यानंतर आता फेस्टिवलची धुरा अॅमी फर्नांडिस आणि क्वासार ठाकोर पदमसी यांच्याकडे आहे. अडीच दिवस चालणाऱ्या ‘मुंबई लिटफेस्ट’चे सर्व कार्यक्रम एनसीपीएच्या विस्तीर्ण परिसरात होत आहेत.

आजकाल भारतातील अनेक शहरांत असे सांस्कृतिक फेस्टिवल आयोजित केले जातात. जयपूर लिटरेचर फेस्टिवल, बंगळूर लिटरेचर फेस्टिवल, नागपूरचा ऑरेंज सिटी लिटरेचर फेस्टिवल, पुणे इंटरनॅशनल लिटररी फेस्टिवल वगैरे चटकन आठवणारी काही नावं... या वर्षीच्या ‘मुंबई लिटफेस्ट’चं उद्घाटन शुक्रवारी दुपारी प्रसिद्ध कवी, गीतकार आणि पटकथाकार गुलजार यांच्याशी पवन कुमार वर्मा यांनी केलेल्या गप्पांनी झालं. उद्घाटन झाल्यानंतरची दुपार भरगच्च कार्यक्रमांनी भरली होती. त्यात सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते सुभाष घई यांच्या ‘कर्माज चाईल्ड’ (Karma’s Child) या पुस्तकाचं प्रकाशन आणि त्या निमित्ताने दिग्दर्शक इम्तियाझ अली यांच्याशी झालेल्या गप्पा यांचा समावेश होता.

शिवाय ‘अर्ज किया है’ हा मीर तकी मीर (१७२३-१८१०) या गाजलेल्या ऊर्दू शायरवरील कार्यक्रम होता. त्यात रणजीत होस्कोट यांच्याशी कौसार मुनिर यांनी गप्पा केल्या. हा फार वेगळा कार्यक्रम होता. मीर तकी मीर म्हणजे अठराव्या शतकातला मोठा शायर. ‘ऊर्दू भाषेला आणि शायरीला वेगळे वळण देणारा शायर’ ही त्याची ओळख. आणखी एक आणि चटकन समजेल अशी ओळख म्हणजे मीर तकी मीर मिर्झा गालिबचे (१७९७-१८६९) एका प्रकारे आध्यात्मिक गुरू. मीर तकी मीर जगला तो काळ म्हणजे दिल्लीवर मोगलांची सत्ता असल्याचा... मात्र तोपर्यंत मोगल साम्राज्याला उतरती कळा लागली होती.

१७४८ सालानंतर अहमदशहा अब्दालीच्या उत्तर भारतावरच्या स्वाऱ्या वाढल्या. अब्दालीने भारतावर एकूण आठ स्वाऱ्या केल्या होत्या. अशा अनिश्चित वातावरणाला कंटाळून मीर तकी मीर लखनौला गेला. त्याला लखनौच्या नवाबाने आमंत्रित केले होतं; पण मीरचं मन लखनौमध्ये आणि लखनौच्या वेगळ्या प्रकारची शायरी करणाऱ्या शायरांमध्ये रमलं नाही. त्याच्या मते लखनौचे शायर फक्त स्त्रीच्या शरीराभोवती फिरतात. नंतर तर तो नवाबांच्या मर्जीतूनच उतरला. अशा अनोख्या; पण काळाच्या पडद्याआड गेलेल्या महत्त्वाच्या शायरवर ‘मुंबई लिटफेस्ट’मध्ये कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल आयोजकांचं खास कौतुक.

शुक्रवारी संध्याकाळी आणखी एक वेगळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तो होता, जर्मन लेखक फ्रँझ काफ्का (१८८३-१९२४) याच्यावर आधारित. काफ्काच्या मृत्यूला या वर्षी शंभर वर्षे होत असल्यामुळे त्याच्या गाजलेल्या लघुकादंबरीतील म्हणजे ‘मेटॅमॉर्फोसिस’मधील निवडक भागांना अभिवाचन आणि नंतर त्यावर चर्चा, असा कार्यक्रम होता. त्याच दिवशी संध्याकाळी सुप्रसिद्ध कवी अरविंद कृष्ण मेहरोत्रा यांना ‘पोएट लॉरेट’चा सन्मान प्रदान करण्यात आला.

शनिवारी म्हणजे आज सकाळच्या सत्रात एल. सुब्रमण्यम या संगीतकार आणि व्हायोलिनवादकाशी गप्पा, शिवाय प्रवासलेखन करणारे पिको आयर (फ्रॉम जेरूसलेम टू जपान) यांच्याशी गिरीश शहाणे यांनी केलेल्या गप्पा, कुमार केतकर यांच्या हस्ते महेश एलकुंचवार यांच्या ‘The Necropolis Trilogy’चं प्रकाशन होणार आहे. या कार्यक्रमाला एलकुंचवार उपस्थित राहणार आहेत.

दुपारचं महत्त्वाचं सत्र म्हणजे, ग्रीक पौराणिक कथांत गाजलेल्या ‘ऑर्फियस’चा संगीतमय आविष्कार. (या शीर्षकाची जी. ए. कुलकर्णींची आणि दिलीप चित्रेंची कथा आहे, हे रसिकांना आठवत असेलच). संध्याकाळी विल्यम डॅलरिंपल या ब्रिटिश इतिहासकाराचं ‘Ancient India’s Expansive Influence’ या विषयावर व्याख्यान आहे. ‘मुंबई लिटफेस्ट’मध्ये अनेक ठिकाणी ‘गप्पांचे कार्यक्रम’ असताना विल्यम यांचं मात्र ‘व्याख्यान’ आहे, हे लक्षात घेण्यासारखं आहे. त्यांची इतिहासावरची गाजलेली पुस्तकं म्हणजे ‘Koh-I-Noor : The History of the World’s Most Infamous Diamond’ आणि ‘The Last Mughal’ इत्यादी. त्यांचं सध्या चर्चेत असलेलं पुस्तक म्हणजे ‘The Golden Road : How Ancient India Transformed the World’. हे भाषण म्हणजे उच्च दर्जाची बौद्धिक मेजवानी असेल. ]

संध्याकाळी साडेसात वाजता इला अरुण यांच्या ‘परदे के पिछे’ या पुस्तकाचं प्रकाशन आहे. या पुस्तकाच्या निमित्ताने विद्या बालन, इला अरुण आणि अंजुला बेदी यांच्याशी गौरव शर्मा गप्पा करणार आहेत. रविवारी दुपारी जयवंत दळवींच्या साहित्यावर ‘सलाम जयवंत दळवी’ हा कार्यक्रम आहे. शिवाय वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यशाळा आहेत. या सर्व कार्यक्रमांचे तपशील त्यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

मुंबईच्या जुहूमध्ये सुरू असलेल्या ‘पृथ्वी थिएटर फेस्टिवल’मध्ये एक जबरदस्त नाटक बघितलं. ते म्हणजे १९४६ साली आलेल्या ‘इटस् अ वंडरफूल लाईफ’ या हॉलीवूडच्या चित्रपटाचा रंगमंचीय आविष्कार. रंगमंचासाठी संहिता सिद्ध केली आहे, मेरी इलियट नेल्सन यांनी. अडीच तास चालणारे हे दोन अंकी इंग्रजी नाटक जीवनावर प्रेम करायला शिकवतं, सकारात्मक दृष्टिकोन देतं. या नाटकाचं दिग्दर्शन केलं होतं आकर्ष खुराना यांनी. चित्रपटाचं दिग्दर्शन फ्रँक काप्रा यांनी केलं होतं; तर नायकाची भूमिका जेम्स स्टुअर्टने साकार केली होती.

मुळात हा चित्रपट एका कथेवर आधारित आहे. ही कथा लिहिली होती, फिलिप व्हॅन डोरेन स्टर्न या अमेरिकन कथालेखकाने. त्या कथेचं नाव होतं ‘द ग्रेटेस्ट गिफ्ट.’ ही कथा १९४३ साली प्रसिद्ध झाली होती. फिलिप स्टर्न यांनी एकदा सांगितलं होतं, की ही कथा त्याला चार्ल्स डिकन्सच्या ‘ख्रिसमस कॅरोल’ या १८४३ मध्ये प्रकाशित झालेल्या लघुकादंबरीवरून सुचली.

फिलीप स्टर्नची चार हजार शब्दांची ही कथा कोणी प्रकाशित करायला तयार नव्हतं. कंटाळून त्याने स्वतः प्रकाशित केली, दोनशे प्रती काढल्या आणि डिसेंबर १९४३ च्या नाताळला त्या मित्रांना ‘नाताळची भेट’ म्हणून पाठवल्या. त्यातील एक मित्र म्हणजे सुप्रसिद्ध अभिनेता कॅरी ग्रँट.

त्याला ही कथा फार आवडली आणि ‘आर. के. ओ. पिक्चर्स’ या स्टुडिओने कथेचे अधिकार विकत घेतले. वेगवेगळी वळणं घेत या कथेवर १९४६ साली सिनेमा बनवला. अशी धमाल पार्श्वभूमी असलेल्या सिनेमावर आता इंग्रजी नाटक आलं आहे... ख्रिसमसच्या रात्री देव एका देवदूताला पृथ्वीवर पाठवतो. देवदूत आर्थिक संकटात सापडलेल्या छोट्या दुकानदाराला, जॉर्ज बॅलीला मदत करतो. जॉर्ज केवळ आर्थिक संकटात आहे, असं नव्हे तर एकूणच जीवनाबद्दल निराश झालेला आहे. त्याला वाटत असतं, की तो जीवनात मागे राहिला आहे... अपयशी झाला आहे. तरुणपणी प्रत्येक तरुणाला पडतात तशी त्यालासुद्धा स्वप्नं पडत होती. मात्र, या ना त्या कारणाने ती प्रत्यक्षात आली नाहीत.

आता जॉर्ज वैफल्यग्रस्त झाला आहे. एवढेच नव्हे; तर त्याच्या डोक्यात आत्महत्या करण्याचे विचार घोळत आहेत. यातील खलनायक म्हणजे गावातला सावकार श्रीयुत पॉटर. (१९४० चे दशक, तो काळ आठवा. आपल्याकडे १९२५ साली बाबूराव पेंटरांचा ‘सावकारी पाश’ प्रदर्शित झाला होता. या मूकपटात व्ही. शांताराम यांनी नायकाची भूमिका केली होती.) जॉर्जला देवदूताच्या मदतीने गावातल्या इतरांच्या जीवनात डोकावता येतं. तेव्हा त्याच्या लक्षात येतं, की तसं पाहिलं तर कोणीच सुखी नाही.

या कथेतील सकारात्मक आशय प्रेक्षकांना फार भावला आणि चित्रपट कमालीचा यशस्वी ठरला. चित्रपटातील सकारात्मक भाव नाटकातसुद्धा अनुभवता येतो. आकर्ष खुराना दिग्दर्शित नाटकाचे हे मोठे यश आहे.

(लेखक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कलासंस्कृतीच्या घडामोडींचे अभ्यासक आणि राज्यशास्त्राचे निवृत्त प्राध्यापक आहेत.)

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.