नर्तक बेडूक आकाराने लहान असतात. रंग मातकट आणि त्यावर नक्षी अशी की समोर असले तरीही पटकन दिसणार नाहीत. नर्तक बेडकांचे आवाज सभोवतालच्या खळाळत्या पाण्याच्या आवाजात हरवून जातात. म्हणूनच त्यांच्यात नर्तन करण्याची उत्क्रांती झाली असावी, असे बेडूक तज्ज्ञ मानतात.
सप्टेंबर महिन्यात कामानिमित्त कर्नाटकातील कूर्गमध्ये जाण्याचा योग आला. कूर्गला याआधी गेलो होतो; पण तेव्हा तेथील घनदाट सदाहरित वनांत नर्तक बेडकांचे जग अनुभवायला जायचे होते म्हणून अधिक उत्साही होतो. नर्तक बेडकांना आंबोलीतील घनदाट जंगलांतील ओढ्यात शोधण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. तेव्हापासूनच जगभरात फक्त पश्चिम घाटातच आढळणाऱ्या या बेडकांना पाहण्याची व त्यांचे जग अनुभवण्याची उत्कंठा लागून राहिली होती. आतापर्यंत नर्तक बेडकांच्या २४ प्रजाती शास्त्रज्ञांना पश्चिम घाटात सापडल्या आहेत.
समुद्रसपाटीपासून २६० मीटर उंचीवर आढळणाऱ्या सदाहरित वनांमधील प्रदूषणमुक्त व खडकाळ ओढ्यामध्ये नर्तक बेडकांचा अधिवास असतो. त्यामुळेच पश्चिम घाटातही सर्वत्र नर्तक बेडूक आढळत नाहीत. म्हणूनच त्यांच्याविषयी अधिक अभ्यास सुरू आहे व त्यांच्या संवर्धनाबाबत अनेक अभ्यासक प्रयत्नशील आहेत. नर्तक बेडूक पाहण्यासाठी आमचा मुक्काम मडिकेरी (कूर्ग जिल्ह्याची राजधानी) शहरापासून ३० किमी अंतरावर ‘हनी व्हॅली’ नावाच्या कॉफी इस्टेटमध्ये होता. तेथील धबधब्यांच्या सभोवताली असलेल्या खडकांजवळ आणि गर्द वनराईतून वाहणाऱ्या ओढ्याच्या नितळ पाण्यात बेडकांना हुडकून काढायचे होते. नर्तक बेडकांचे सखोल अभ्यासक आणि तज्ज्ञ डॉ. मधुश्री मुडके आणि श्रीकांथ नायक हे आमच्यासोबत होते.
कूर्ग किंवा कोडागू जिल्हा अतिशय निसर्गसंपन्न असून हिरवेगार डोंगर, घनदाट जंगल परिसर आणि नद्या-नाल्यांनी नटलेला आहे. कावेरी नदीचे उगमस्थानही येथील गर्द जंगलांनी व्यापलेल्या डोंगररांगांमध्ये आढळते. हा संपूर्ण परिसर कर्नाटकातील ब्राह्मगिरी अभयारण्य, नागरहोळे व्याघ्र प्रकल्प आणि केरळातील वायनाड अभ्यारण्याशी जोडलेला आहे. पावसाळी हवामान असल्याने डोंगरमाथ्यावर ढगांचे आच्छादन पसरले होते. ढगांमधून मध्येच दिसणाऱ्या डोंगरमाथ्यावर हिरवीगार कुरणे आणि घनदाट जंगलांचा विलक्षण संयोग दिसत होता.
निसर्गातील ही विशिष्ट वनस्पती रचना ‘शोला फॉरेस्ट’ म्हणून ओळखली जाते. ‘शोला फॉरेस्ट’ परिसंस्था फक्त पश्चिम घाटातच आढळते व अनेक प्रदेशनिष्ठ प्रजातींना आपल्या अधिवासात सामावून घेते. रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या निरनिराळ्या रानफुलांभोवती मलबार रॅवन, कॉमन जे, सदर्न बर्डविंग फुलपाखरे उडत होती. या सगळ्याचा मनसोक्त आनंद घेत आमचा प्रवास सुरू होता; पण जसजसे मडिकेरी जवळ येऊ लागले, तसे रबर वृक्षांची मोठ्या प्रमाणात लागवड दिसू लागली. या लागवडींसाठी शेकडो वर्षांपासून अस्तित्वात असलेली घनदाट जंगले नष्ट करण्यात आली आहेत, ही वस्तुस्थिती मात्र मन खिन्न करणारी होती.
‘हनी व्हॅली’चा परिसर मोठा होता. स्थानिक वास्तुकलेचा वापर करून सर्व खोल्यांची रचना केली गेली होती. परिसर नैसर्गिक आणि सुशोभीकरणासाठी लावलेल्या फुलझाडांनी बहरून गेला होता. त्या फुलांभोवती लोटेनचा शिंजीर, छोटा शिंजीर, छोटा कोळीखाऊ आणि चष्मेवाला या पक्ष्यांची मधुरस खाण्याकरिता लगबग सुरू होती. मधमाशा, भुंगे, ढालकीटक, फुलपाखरे असे अनेक प्रकारचे कीटकही फुलांभोवती रुंजी घालत होते. खोलीत सामान ठेवून, लागेचच रेनकोट, जळवा चिकटू नयेत म्हणून तयार केलेले खास मोजे, दुर्बीण, कॅमेरा आणि डोक्याला बांधायची टॉर्च घेऊन आम्ही नर्तक बेडकांच्या शोधात बाहेर पडलो. पावसाची रिमझिम सुरूच होती.
जंगलातील एका पाऊलवाटेवरून एका धबधब्यापाशी पोहोचलो. पावसाळी हवामान असल्यामुळे सर्वत्र जळवांचे साम्राज्य पसरले होते. वाटेतील झाडांवर जगात फक्त पश्चिम घाटातच आढळणारी अतिशय देखणी ‘इंद्रेल्ला एमप्यूला’ नावाची गोगलगाय दिसली. एका झुडपावर टसर रेशीम पतंगाची मादी आपल्या सख्याची वाट पाहत होती. या पतंगांचे प्रौढावस्थेतील आयुष्य काही दिवासांचेच असते. त्या अल्पशा आयुष्यात ते हवेत फेरोमॉन (रासायनिक पदार्थ) सोडून नराला आपल्याकडे आकर्षित करायचा प्रयत्न करतात.
आश्चर्य म्हणजे चार-पाच किमी परिसरात असलेले नर पतंग हे फेरोमॉन ओळखतात आणि मिलनासाठी मादीपर्यंत पोहोचतात. या पतंगाचे सौंदर्य न्याहाळताना मलबारी पोपटांचा थवा उडत गेला. ही प्रजातीही पश्चिम घाटात प्रदेशनिष्ठ आहे, हे विशेष नमूद करावयास हवे.
वनवाट उतरून एका धबधब्यापाशी पोहोचलो. फारच सुंदर ठिकाण होते ते. फेसाळलेले पाणी उंचावरून डोहात पडत होते. सभोवताली घनदाट वनराई. निरनिराळ्या प्रकारचे नेचे (फर्न), तेरड्याच्या वेगवेगळ्या प्रजाती, खडकांवरील शेवाळ आणि सभोवतालचे उंच वृक्ष सारेच विलक्षण होते. अपेक्षेप्रमाणे स्वागताला मलबार शीळ कस्तुराची मंत्रमुग्ध करणारी शीळ आलीच. डॉ. मधुश्री यांनी बेडकांचा कानोसा घेण्यास सुरुवात केली.
अनेक वर्षांच्या अभ्यासामुळे त्यांचे कान आणि डोळे बेडकांना शोधण्यास सरावले होते. पाण्याजवळील मोठे दगड, वनराईतून वाहणारे ओढे अशा विशिष्ट ठिकाणीच नर्तक बेडूक आढळतात. आकाराने नर्तक बेडूक लहान असतात (तीन ते पाच सेमी), रंग मातकट आणि त्यावर नक्षी अशी की समोर असले तरीही पटकन दिसणार नाहीत. नर नर्तक बेडूकही इतर बेडकांप्रमाणे आपल्या गळ्याभोवती असलेली व्होकल सॅक फुगवून आवाज काढतात, पण नर्तक बेडकांचे आवाज सभोवतालच्या खळाळत्या पाण्याच्या आवाजात हरवून जातात व म्हणूनच त्यांच्यात नर्तन करण्याची उत्क्रांती झाली असावी, असे बेडूक तज्ज्ञ मानतात.
नर बेडूक आवाजाच्या मदतीने मादीला आकर्षित करण्यास असमर्थ असल्याने, आपले मागचे पाय विशिष्ट प्रकारे हालचाल करून ‘नर्तन’ करण्याची शक्कल लढवून मादीचे लक्ष वेधून घेतात. नर बेडूक एखाद्या पाण्यातील खडकावर बसून आपले मागचे पाय हवेत ताणून धरतात. कधी एक पाय वर; तर कधी दोन्ही पाय, हे ‘नर्तन’ बराच वेळ सुरू राहते. या नर्तनातून इतर नरांना इशारा देण्याचाही उद्देश साध्य होतो. नर एकमेकांचे पाय उंचावून शीतयुद्ध पुकारतात. काही वेळाने त्यातील एक नर अजिंक्य ठरतो णि आसपास असणाऱ्या मादीबरोबर त्याचे मिलन होते. एका इवल्याशा जीवाचे अशा प्रकारचे नर्तन गमतीशीर व मंत्रमुग्ध करणारे होते.
डॉ. मधुश्री आणि श्रीकांथ यांच्या मदतीने पाण्यातील दगडांखाली व सभोवतालच्या उथळ पाण्यात माती अन् दगडांशी जवळजवळ एकरूप झालेले एलिगंट नर्तक बेडूक आणि कोट्टीगेहर नर्तक बेडूक आम्हाला दिसले. नर्तक बेडूक आपली अंडी उथळ पाण्यातील मातीत पायाने खड्डा करून घालतात. अंड्यातून बाहेर आलेले बेडूकमासे (पिल्ले) मातीखालीच राहतात व पूर्ण वाढ झाल्यावर जमनीतून बाहेर येतात. नर्तक बेडकांच्या व्यतिरिक्त सोनेरी पाठीचा बेडूक, रात्रीचर बेडूक असे इतरही बेडूक पाहण्यास मिळाले. हे बेडकांचे जग खरोखरीच अद्भुत आणि पुन्हा पुन्हा अनुभवावे असे होते.
या बेडकांच्या अस्तित्वासाठी अधिवासातील हवामान, आर्द्रता, पाण्याचे तापमान आणि शुद्धता अतिशय महत्त्वाचे असते. तापमानातील दोन-तीन अंश सेल्सिअस फरकही त्यांच्या अस्तित्वासाठी घातक ठरू शकतो. म्हणूनच बहुसंख्य ठिकाणी मानवी हस्तक्षेपामुळे नर्तक बेडकांसाठी आवश्यक असणारे अधिवास नष्ट झाल्याने, पश्चिम घाटात मोजक्याच ठिकाणी हे बेडूक दिसून येतात. या बेडकांचे बरेच अधिवास हे खासगी जमिनींवर आणि पारंपरिक जपलेल्या देवरायांमध्ये आढळतात. आपल्या पूर्वजांनी अतिशय विचारपूर्वक देवराई संकल्पना प्रचलित करून वृक्षतोड आणि शिकार यांच्यावर पूर्णपणे बंदी घालत निसर्ग संवर्धनाचे बीज आपल्या संस्कृतीत रोवले, परंतु आधुनिकतेला गवसणी घालण्याच्या नादात या अलिखित नियमांचे उल्लंघन झालेले दुर्दैवाने अनेक ठिकाणी दिसून आले आहे आणि म्हणूनच पश्चिम घाटातील अनेक देवरायांची व्याप्ती कमी झाल्याचे अभ्यासकांचे मत आहे.
बेडूक किंवा इतर उभयचर प्राणी हे परिसंस्थेच्या आरोग्याचे उत्तम द्योतक असतात. परिसंस्थेतील मानवी हस्तक्षेप वाढला की बेडकांच्या अस्तित्वावर विपरीत परिणाम होतो. बेडूक कीटकभक्षी असल्यामुळे त्यांचे निसर्गातील अन्नसाखळीत अनन्यसाधारण महत्त्व आहे. गेल्या काही वर्षांत रबर, निलगिरीसारख्या मोनोकल्चर लागवडींनाही नैसर्गिक वनांच्या श्रेणीत समावेश करण्याची घोडचूक सरकारी पातळीवर दिसून येत आहे. याचा नकारात्मक प्रभाव येत्या काही वर्षांत पश्चिम घाटातील अनेक महत्त्वाच्या परिसंस्थांवर झाल्याशिवाय राहणार नाही.
नर्तक बेडूकच काय; पण या विशिष्ट प्रकारच्या वनांवर अवलंबून असलेल्या; परंतु प्रसिद्धीचे वलय पाठीशी नसलेले अनेक सस्तन प्राणी, पक्षी, सरीसृप, कीटक, मृदुकाय प्राणी इत्यादींच्या जीवावर बेतू शकते. वाघ, सिंह, हत्ती, गेंडे अशा मोठ्या सस्तन प्राण्यांच्या पलीकडे जाऊन भारताला संवर्धनाचे आराखडे बनवायची गरज आहे. भारतातील एक हजारच्या वर असलेल्या संरक्षित क्षेत्रांमध्ये बेडूक, गोगलगाय, फुलपाखरे, साप यांच्या नावाने राखलेले एकही संरक्षित क्षेत्र सापडणार नाही. असा सर्वव्यापी दृष्टिकोन ठेवल्यासच अन्नसाखळीतील प्रत्येक कडीच्या संवर्धनासाठी प्रयत्नशील राहून भारताला एक नवा अध्याय लिहिता येईल आणि आतापर्यंत दुर्लक्षित राहिलेल्या नर्तक बेडकांना भारतात वाघासारखेच महत्त्व येईल.
(लेखक प्रसिद्ध वन्यजीव अभ्यासक, निसर्ग संवर्धक आणि ‘द कॉर्बेट फाउंडेशन’चे संचालक आहेत.)