भारताचा दिमाखात मालिका विजय
esakal November 16, 2024 01:45 PM

भारताचा दिमाखात मालिका विजय
दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा ः तिलक वर्मा, सॅमसनची नाबाद शतके

जोहान्सबर्ग, ता. १५ ः संजू सॅमसन (१०९) आणि तिलक वर्मा (१२०) यांनी केलेल्या नाबाद आणि विक्रमी २१० धावांच्या भागीदारीच्या जोरावर २८३ धावांचा हिमालय उभा करणाऱ्या भारताने दक्षिण आफ्रिकेचा १३५ धावांनी धुव्वा उडवला आणि चौथ्या सामन्यासह ट्वेन्टी-२० मालिका ३-१ अशी जिंकली.

प्रथम फलंदाजी स्वीकारणाऱ्या भारतीयाकडून अभिषेक शर्मा, संजू सॅमसन आणि तिलक वर्मा या तिघांनीच फलंदाजी केली. चौकार-षटकारांची तुफान टोलेबाजी केली. भारतीयांनी या सामन्यात २३ षटकार आणि १७ चौकार मारले. चौकार-षटकारांनी मिळून २०६ धावा झाल्या. मुळात भारताची सुरुवातच झंझावाती होती. अभिषेक शर्मा सॅमसनपेक्षा आक्रमक होता. त्याने १८ चेंडूंतच ३६ धावा केल्या. संघाच्या ७३ धावांवर तो बाद झाला. त्यावेळी ५.५ षटकांचा खेळ झाला होता. त्यानंतर २० व्या षटकापर्यंत आफ्रिकन गोलंदाजांची सॅमसन आणि तिलक वर्मा यांनी पुरती धुलाई केली.
या मालिकेत कमालीची प्रभावी गोलंदाजी करणाऱ्या अर्शदीपने स्वतःच्या पहिल्या तीन षटकांत हेन्रिक्स, मार्करम आणि क्लासेन यांना बाद करून आफ्रिकेचे कंबरडे मोडले. त्यांची ४ बाद १० अशी अवस्था झाली तेथेच भारताचा मोठा विजय निश्चित झाला.

संक्षिप्त धावफलक
भारत ः २० षटकांत १ बाद २८३ (संजू सॅमसन नाबाद १०९ - ५६ चेंडू ६ चौकार, ९ षटकार, अभिषेक शर्मा ३६ - १८ चेंडू, २ चौकार, ४ षटकार, तिलक वर्मा नाबाद १२० - ४७ चेंडू, ९ चौकार, १० षटकार, सिम्पाला ४-०-५८-१) वि. वि. द. आफ्रिका ः १८.२ षटकांत सर्वबाद १४८ (त्रिस्टन स्टब्स ४३ -२९ चेंडू, ३ चौकार, २ षटकार, डेव्हिड मिलर ३६, अर्शदीप सिंग ३-०-२०-३, हार्दिक पंड्या ३-१-८-१, वरुण चक्रवर्ती ४-०-४२-२, अक्षर पटेल २-०-६-२)

सॅमसन-तिलकची विक्रमी २१०* धावांची भागीदारी
- भारताकडून कोणत्याही विकेटसाठी सर्वोच्च
- आफ्रिकेत कोणत्याही विकेटसाठी सर्वोच्च
-------
पूर्ण सदस्यत्व असलेल्या संघांमधली सर्वोच्च धावा
२९७/६ भारत वि. बांगलादेश (हैदराबाद २०२४)
२८३/१ भारत वि. आफ्रिका (जोहान्सबर्ग २०२४)
२७८/३ अफगाणिस्तान वि. आयर्लंड (डेहरादून २०१९)
२६७/३ इंग्लंड वि. विंडीज (जमैका २०२३)
--------
ट्वेन्टी-२० सलग शतके
- गुस्ताव मॅकॉन
- रिली रॉसो
- फिल साल्ट
- संजू सॅमसन
- तिलक वर्मा

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.