नाना पटोले पाचव्यांदा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात, तिहेरी लढतीमध्ये कोण मारणार बाजी?
प्रशांत देसाई November 16, 2024 03:13 PM

Sakoli Vidhan Sabha constituency:  महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष असलेल्या नाना पटोलेंचा (Nana Patole) साकोली विधानसभा हा गड मानला जातो.  अवघा महाराष्ट्र पिंजून काढणाऱ्या नाना पटोलेंच्या साकोलीत त्यांचं कुटुंब प्रचार करीत आहे. साकोली विधानसभेसाठी (Sakoli Vidhansabha Constituency) 13 उमेदवार निवडणूक रिंगणात असले तरी खरी लढत ही काँग्रेसचे नाना पटोले, भाजपचे अविनाश ब्राह्मणकर आणि भाजपचे बंडखोर डॉ सोमदत्त करंजेकर या तिघांमध्ये होत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंमुळे साकोलीची निवडणूक हाय प्रोफाईल मानली जात आहे.

साकोली, लाखांदूर आणि लाखनी या तीन तालुक्यात मिळून साकोली विधानसभा मतदारसंघ निर्माण झाला आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीनं भंडाऱ्यातील हा सर्वात मोठा मतदार संघ आहे. काँग्रेसचे नाना पटोले हे साकोलीतून आता पाचव्यांदा निवडणूक रिंगणात उभे आहेत. यापूर्वी ते खासदारही राहिलेले आहेत. नाना पटोलेंसमोर महायुतीच्या वतीने तगड आव्हान देण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य असलेले ओबीसी चेहरा म्हणून अविनाश ब्राह्मणकर यांना भाजपने उमेदवारी घोषित होण्याच्या एक दिवसापूर्वी भाजपात प्रवेश दिला.

त्यानंतर त्यांना महायुतीच्या वतीने भाजपकडून उमेदवारी घोषित करण्यात आली. भाजपने अविनाश ब्राह्मणकरांना उमेदवारी दिल्याने भाजप आणि संघ परिवाराशी जुळलेल्या डॉ सोमदत्त करंजेकरांनी साकोलीत भाजपा विरोधात बंडखोरी केली. डॉ करंजेकरांना भाजपचे माजी आमदार बाळा काशीवार यांचा पूर्ण पाठिंबा असून करंजेकरांच्या बंडखोरीमुळे साकोलीत चांगलीचं चुरस निर्माण झाली आहे. 

साकोलीमध्ये तिहेरी लढत

डॉक्टर करंजेकरांनी बंडखोरी केल्याने भाजप पक्षश्रेष्ठींनी करंजेकर यांच्यासह माजी आमदार बाळा काशीवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांवर सहा वर्षाची निलंबनाची कारवाई केली आहे. अशाही स्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपात आलेल्या अविनाश ब्राह्मणकरांसोबत भाजपचे मोठे नेते असले तरी सर्वसामान्य कार्यकर्ता आणि पदाधिकारी हे करंजेकरांसोबत प्रचारात फिरताना बघायला मिळत आहे.

एकंदरीतच भाजपाच्या कार्यकर्त्यांची ताकद ही करंजेकरांच्या पाठीशी असल्याचे चित्र साकोली विधानसभेत बघायला मिळत आहे. भाजपाचे ब्राह्मणकर आणि भाजप बंडखोर करंजेकरांच्या मत विभाजनाचा लाभ सहाजिकच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना मिळेल आणि मोठी लीड घेऊन ते विजय संपादित करतील असे चित्र सध्यातरी बघायला मिळत आहे. 

साकोली विधानसभेत तीन लाख 28 हजार 476 मतदार त्यांचा आमदार निवडून आणणार आहेत. यात एक लाख 64 हजार 102 पुरुष मतदारांची तर, एक लाख 64 हजार 373 स्त्री मतदारांची संख्या आहे. साकोली विधानसभेत 379 मतदान केंद्रावर 20 तारखेला मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार आहेत. 2019 च्या निवडणुकीत काँग्रेसचे नाना पटोले यांनी भाजपचे परीणय फुकेंचा 6 हजार 240 मतांनी पराभव केला होता. त्यावेळी नाना पटोले यांना 95 हजार 208 मतं मिळाली होती. तर, भाजपचे परिणय फुके यांना 88 हजार 968 मतं मिळाली होती.

ही बातमी वाचा : 

Bhandara Assembly Election : भंडारा जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोणाची बाजी? 3 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.