मुंबई : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला भरभरुन यश मिळालं असलं तरी, शिवसेना (shivsena) युबीटी पक्षाच्या जागा तुलनेनं कमी आल्याने काही पराभवाचं दु:ख पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकारे यांना आजही कायम आहे. त्यामुळेच, लोकसभेतील पराभवाचा वचपा विधानसभेत काढण्याचा निर्धार उद्धव ठाकरेंनी केला असून ते कोकण आणि मराठवाड्यात झपाटून सभा घेत आहेत. कोकणच्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात झालेला पराभव जिव्हारी लागल्याचं उद्धव ठाकरेंनी एबीपी माझाच्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत बोलताना सांगितलं. त्यामध्ये, विशेषत: छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेला पराभव जिव्हारी लागल्याचे सांगताना उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणी जागवल्या. तसेच, छत्रपती संभाजीनगरबद्दल असेललं भावनिक नातंही सांगितलं.
लोकसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीनगरचा पराभव मला जिव्हारी लागला आहे, मी तुम्हाला हवा की नको हे तुम्ही ठरवायचं आहे. तिथे गद्दार निवडून आला ते मला खटकलं, म्हणून तिथे विचारलं मी तुम्हाला हवा आहे का, असे उद्धव ठाकरेंनी म्हटलं. तसेच, बाळासाहेबांचं संभाजीनगरसोबत वेगळंच नातं होतं, औरंगाबदचा संभाजीनगर असा पहिल्यांदा उल्लेख बाळासाहेबांनी केला, त्याचं नामकरण मी केलं. तो मतदारसंघ हा शिवसेनाचा बालेकिल्ला राहिल्याची आठवणही त्यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितली. तसेच, कोकणातीतल पराभवही जिव्हारी लागल्याचं त्यांनी म्हटलं. कोकण आणि संभाजीनगरमधीप पराभव जिव्हारी लागला, पण कोकणातील हत्यांची मालिका आम्ही थांबवली असे म्हणत नाव न घेता उद्धव ठाकरेंनी भाजप नेते आणि खासदार नारायण राणेंवर हल्लाबोल केला. दरम्यान, आजपर्यंत कधी नव्हतं असं नीच पद्धत्तीचे राजकारण झालं आहे, या दरोडेखोरांना हद्दपार करण्याची वेळ आली आहे. कुटुंबियांना बदनाम करणं, ईडीचा वापर करुन धमकावलं गेलं असे म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना दरोडेखोर म्हटलं.
नरेंद्र मोदी हे 2019 मध्ये देखील प्रचार करत होते, मग मोदींच्या भाषणावर तुमचा आक्षेप का, असा प्रश्न उद्धव ठाकरेंना विचारण्यात आला होता. त्यावर, दिवंगत नेते अटल वाजपेयी यांच्या वेळी बाळासाहेबांनी मत मांडलं होतं, प्रचार करायचा तर पंतप्रधान पद सोडा आणि मग प्रचार करा,असं बाळासाहेब म्हणायचे. मोदींचा अतिरेक होत होता म्हणून मी बोललो, असे उत्तर उद्धव ठाकरेंनी दिलं.
माझी बॅग तपासली त्याचा व्हिडीओ केला, तर सगळे माझी तपासा म्हणत आहेत. ज्यांच्यासोबत आम्ही गेलो, त्यांची वापरा आणि फेकून द्या अशी निती आहे. त्यामुळेच, त्यांनी काही मिंद्यांनी एप्रोच केला. पण, जिवाला जीव देणाऱ्यांनी मला साथ दिली, असे म्हणत शिवसेनेतील एकनाथ शिंदेंच्या बंडावरही ठाकरेंनी भाष्य केलं. तसेच, पक्ष कोणाचा हे ठरवण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नाही. शिवसेना हे माझ्या आजोबांनी नाव ठेवलं आहे. आयोगाचा निकाल मी मानूच शकत नाही, अशा शब्दात निवडणूक आयोगावरही हल्लाबोल केला. तर, मर्दाची अवलाद असेल तर त्यांनी त्यांच्या वडिलांचा फोटो लावून निवडणूक लढवावी, असेही आव्हान ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना दिले.
नरेंद्र मोदींनी 2014 ला पंतप्रधान झाल्यानंतर माझा वापर करुन घेतला, 2019 मध्ये मी त्यांचा प्रचार केला. तेच आता मला नकली संतान म्हणत आहेत. माझी आणि प्रमोदजी यांची ताणाताणी व्हायची, मात्र वाद मिटायचे, अशी आठवण सांगत तेव्हाच्या आणि आत्ताच्या भाजपात फरक असल्याचंही ते म्हणाले. भाजप हा संकरीत पक्ष झाला आहे, भाजपच्या अधोगतीला भाजपच्या नेतृत्व करणाऱ्यांची जबाबदारी आहे. जसं शिवसेनेनं काय केलं तर पक्षप्रमुख म्हणून माझी जबाबदारी अगदी तसं, असेही ठाकरेंनी म्हटलं. माझ्या हातात ही बाळासाहेबांची रुद्राक्ष आहेत, मी माझ्या आवडीने घातलेली रुद्राक्ष आहेत. माझं ऑपरेशन झालं तेव्हा शिवबंधन काढावं लागलं, अशी भावनिक आठवणही उद्धव ठाकरेंनी सांगितली.
सज्जाद नोमानी यांच्या व्हिडिओ संदर्भातील प्रश्नावर बोलताना, माझ्या डोळ्यासमोर हे आलं नाही, बटेंगे तो कटेंगे आलं. काल अनेक मुस्लीम लोक मला भेटले. कोरोनाच्या काळात तुम्ही जो जीव वाचवला, ते विसरणार नाही असं ते म्हणाले. अमित शाहा यांनी चुल्लूभर पाणी मे डुब जाओ असं म्हटलंय. त्यावरही ठाकरेंनी मिश्कील टोला लगावला. अमित शहांना किती पाणी लागेल, शाहांना नवरत्न तेल दिलं पाहिजे, अशी बोचरी टीका केली. तर, चंद्राबाबू नायडू देश संघमुक्त करणार म्हणाले होते, मोदींचे हात रक्ताने माखलेत असे पासवान म्हणाले, पण मोदींनी त्यांना सोबत घेतलं. मोहन भागवत जामा मशिदीत जाऊ आले, त्यांना का नाही म्हणत, मोदी देखील पण मशिदीत गेले आहेत, असेही ठाकरेंनी सांगितले.
ज्या शंकराचार्यांना गुरु मानतात, राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला त्यांना का बाजूला बसवलं नाही. त्यांनी सोयाबिनला भाव का नाही दिला. राज्यातील महिला सुरक्षित का नाहीत, महाराष्ट्राचा घात का करत आहात. सोयाबिनच्या पिकाला आमच्या काळात 6 ते 7 हजार दर होता, आता तर कापूस खरेदी पण होत नाही, असे म्हणत शेतकरी प्रश्नावरूनही मोदी व महायुती सरकारवर हल्लाबोल केला. तसेच, गेल्या आठवड्यात ओडीशात महिलेवर अत्याचार झाला, पंतप्रधान तिथे का गेले नाहीत, असा सवाल ठाकरेंनी विचारला.
भाजपवाले बटेंगे तो कटेंगे म्हणतात, पण मी मुख्यमंत्री असताना किती लोक कापले गेले त्यांनी सांगावां. आता त्यांची फटेंगे झाली आहे. तेव्हा दिल्ली तेव्हा पेटली होती, मात्र इथे काही झालं नाही. मुंबईतून अनेक उद्योग गुजरातला घेऊन जात आहेत.निवडणूक आम्ही युतीत लढलो, त्यांनी विश्वासघात केला म्हणून आघाडीत आलो.पाच वर्षात तुमचा मुख्यमंत्री झाला असता, त्यांची जी बदनामी झाली ते झालं नसतं. आधी कुटुंब उध्वस्त करायची नंतर त्यांनाच सोबत घ्यायचं
चार पावलं पुढे जाण्यासाठी दोन पावलं मागे घ्यावी लागतात असे म्हणत महाविकास आघाडीत कमी जागा लढविण्याबाबत ठाकरेंनी बाजू मांडली. भाजपसोबत असताना 124 जागा मी स्वीकारल्या होत्या, तेव्हा बंडखोरी करुन काही जागा पाडल्या. मी कोल्हापुरला गेलो तेव्हा तिथे सांगितलं पाणी अदानीला विकलं, चंद्रपुरातील शाळा अदानीला दिली. महाराष्ट्र लुटला जातोय. महाराष्ट्र भिकारी झाला पाहिजे, असेच यांना वाटते. महाराष्ट्र झुकत नाही म्हणून भाजपकडून हा प्रयत्न सुरु आहे. तुम्ही माझ्या आई वडिलांचा अपमान कसा करु शकता, हे त्यांचे संस्कार बोलतायत
उद्धव ठाकरेंनी सिल्लोडमधील भाषणातून भाजपला साद घातली होती, त्यावरुनही स्पष्टीकरण दिलं आहे. मी पूर्ण महाराष्ट्रासाठी ही साद घालतोय. महाराष्ट्र लुटणाऱ्यांना मत देऊ नका, असं माझं आवाहन आहे. मला गुजरातबद्दल राग नाही. इथे कधी गुजराती मराठी वाद झाला नाही. मात्र, हे लोक तशी भिंत बांधत आहेत. भाजप आणि संघाच्या तमाम कार्यकर्त्यांना ही साद घालतो. भाजप हा संकरीत पक्ष तुम्हाला मान्य आहे का. भ्रष्टाचाऱ्यांची बिजं संकरीत केलेला पक्ष मान्य आहे का? प्रमोदजी, गोपीनाथजी, अडवाणींवेळी नितिमत्ता पाळणारा पक्ष होता. मोदी-शाहा आधी आवडत होते. मात्र, त्यांना मी आवडेनासा झालो आहे, असे उत्तर उद्धव ठाकरेंनी दिले.
महाराजांचा पुतळा कोसळला, तिथे शिविगाळ करणारी लोकं तुम्हाला चालतात. मोदींच्या हस्ते अनावरण झालं तो पुतळा कोसळला. पुतळ्याच्या दर्जाचा प्रश्न विनायक राऊतांनी आधीच लोकसभेत उपस्थित केला होता.
शरद पवारांना जर जितेंद्र आव्हाडांना मुख्यमंत्री करायचं असेल, जयंत पाटील असतील, राजेश टोपे असतील तर त्यांनी ते जाहीर करावं. मला लुटारू नको, इतकाच माझा आग्रह आहे, असे उद्धव ठाकरेंनी म्हटलं. तसेच मुख्यमंत्री व्हायला आवडेला का, या प्रश्नावर आधी निवडून तर येऊ दे नंतर ठरवू असे उत्तर उद्धव ठाकरेंनी दिले.
राज ठाकरेंसोबत युती का केली नाही, या प्रश्नावरही उद्धव ठाकरेंनी उत्तर दिले. त्यांना महाराष्ट्राचा लुटारू मुख्यमंत्री व्हावा वाटत असेल तर त्यांच्यासोबत युती होऊ शकत नाही. लुटारुंना मदत करणाऱ्यांना मदत केली तर तो विश्वासघात होईल. महाराष्ट्रद्रोह्यांना मदत करणार नाही असं जर त्यांनी जाहीर केलं असतं तर वाट्टेल ते केलं असतं. मात्र, नात्यांची गफलत करु नका, जनतेशी द्रोह करणाऱ्याला मदत करु शकत नाही, असे उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणातून स्पष्ट केले.
वरळी मतदारसंघात आदित्य ठाकरेंविरुद्ध शिवसेना शिंदे गटाकडून मिलिंद देवरा विरोधात का उभे राहिले हे त्यांनीच सांगावे. मी काँग्रेस सोबत गेलो म्हणून मिंदे गेले. पण, मुरली देवरांना ज्यांनी महापौर केला त्यांचाच मुलगा आज शिवसेनेवर वार करतोय, असा टोला ठाकरेंनी लगावला.
मी कोणाशी विश्वासघात करत नाही, मी 2014 ते 2019 पर्यंत काँग्रेससोबत एकसुद्धा गुप्त बैठक केली नाही. शरद पवार साहेब घरी यायचे, पण राजकीय चर्चा जी झाली ती 2019 मध्येच झाली, असे म्हणत महाविकास आघाडीचं 2019 मध्येच ठरलं, तत्पूर्वी कुठलंही चा खुलासाही उद्धव ठाकरेंनी केला.