महाराष्ट्राच्या राजकारणात अडीच वर्षांपूर्वी शिवसेनेमध्ये पडलेली उभी फूट हा राज्याच्या राजकारणातला मोठा भूकंप होता. या प्रकरणाला ३० महिने उलटून गेल्यानंतरही यामुळे निर्माण झालेला राजकीय ताण पुरता निवळलेला नाही.
शिवसेनेतून ४० आमदारांना बाहेर घेऊन पडणारे एकनाथ शिंदे यांच्या भोवती त्यानंतरचे राजकारण फिरत आहे. महायुतीने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले, केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह शिंदे यांना दिले. शिवसेना ज्या परिस्थितीत मिळवली त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या प्रतिमेला गेलेला ‘तडा’ प्रतिमा संवर्धनासाठी मोठा अडसर होता.
लोकसभेच्या निकालाने कलाटणी शिंदे यांच्या शिवसेनेच्या ‘वॉर रूम’समोर हा मोठा अडसर होता. शिवाय पक्षाकडे एकनाथ शिंदेंव्यतिरिक्त दुसरा चेहरा नव्हता. त्यामुळे पक्षाची आणि किंबहुना त्यांची स्वत:ची प्रतिमा सुधारण्याशिवाय दुसरा काही मार्गही नव्हता.
त्यासाठी जाणीवपूर्वकप्रयत्न करावा लागला. मागील अडीच वर्षांत एकनाथ शिंदे स्वीकारले जातायत का याविषयी साशंकता व्यक्त केली जात होती. पण लोकसभा निवडणुकीच्या निकालाने शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांनाही आत्मविश्वास दिला. लोकसभा निवडणुकीत शिंदे यांच्या शिवसेनेला सात ७ जागा तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला नऊ जागा जिंकता आल्या. लोकसभा निवडणुकीतील हे यश शिंदे यांच्यासाठी कलाटणी देणारे ठरले.
चार पातळ्यांवर काम : शिवसेनेच्या ‘वॉर रूम’चे काम चार पातळ्यांवर चालते. त्यापैकी पहिले सोशल मीडिया, सर्व्हेचे काम हे बाहेरून केले जाते. ‘शो टाइम’ कंपनीकडून हे काम केले जाते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दौरे निश्चित करणे ही दुसरी, तर मुख्यमंत्र्यांचे भाषण तयार करणे आणि प्रचाराचे मुद्दे ठरवणे ही तिसरी पातळी असते. ‘वॉर रूम’चे प्रमुख म्हणून कोणाचीच नियुक्ती करण्यात आलेली नसल्याचे शिंदे यांच्या जवळचे कार्यकर्ते सांगतात.
सुधारणा करण्याची सूचना
उमेदवारी जाहीर करण्यापूर्वी सर्व्हे कंपनीच्या माध्यमातून उमेदवारांविषयीचा कल शिंदे यांनी जाणून घेतला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याबरोबर बाहेर पडलेल्या ४० आमदारांपैकी काही जणांविषयी नकारात्मक सूर उमटला होता. मात्र शिंदे यांनी त्यांची उमेदवारी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला.
कारण त्यांच्याबरोबर आलेल्या सर्व आमदारांना पुन्हा उमेदवारी देण्याचा शब्द शिंदे यांनी दिला होता. त्यांच्याबरोबर राहिलेल्यांविषयी सर्व्हे किंवा ‘वॉर रूम’मधून नकारात्मक मत आले तरी त्याकडे दुर्लक्ष करून परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना शिंदे देतात.
पहिल्या चारात स्थान
मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेमध्ये सुधारणा होत असल्याचा दावा शिंदे यांच्या ‘वॉर रूम’ने केला आहे. त्यासाठी त्यांनी गेल्या दहा महिन्यांत केलेल्या विविध संस्थांच्या अहवालाचा संदर्भ दिला. प्रतिमा संवर्धनात सुधारणा होऊन ते पहिल्या चारमध्ये आले आहेत. शिंदे यांच्याकडे पक्षाचे चिन्ह, नाव आले असले तरी शिवसेनेच्या वर्षानुवर्षे तयार झालेल्या प्रचार यंत्रणेचा त्यांच्याकडे अभाव होता. त्यानंतर प्रचार सामग्री मिळतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे, असे सांगण्यात आले.
योजनांमुळे जनसामान्यांमध्ये लोकप्रिय
लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वीचे आणि त्यानंतरचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याकडे स्वतंत्रपणे पाहावे लागेल, असे मुख्यमंत्र्यांचे प्रसिद्धीप्रमुख विनायक पात्रुडकर सांगतात. मुख्यमंत्र्यांची प्रतिमा तयार करण्यासाठी कृत्रिम प्रयत्न करावे लागले नाहीत. ‘फिल्ड’वर जाणारा मुख्यमंत्री अशी त्यांची प्रतिमा त्यांच्या कामातून तयार झाली.
इर्शाळवाडी दुर्घटनेच्या वेळी बचाव कामात ते स्वत: उतरले. मुंबईची नालेसफाई पाहण्यासाठी ते गेले. त्यांच्याकडे येणारी एकही व्यक्ती त्यांना न भेटता जात नाही. सात दिवस २४ तास काम करणारे मुख्यमंत्री अशी त्यांची ओळख आहे. शिवाय ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण, टोल माफी या योजनांमुळे जनसामान्यांमध्ये ते लोकप्रिय झाले आहेत, असे पात्रुडकर सांगतात.