Jhansi NICU Fire: हळहळ! सरकारी रुग्णालयात मोठी आग, 10 नवजात बालकांचा मृत्यू... 35 हून अधिक जणांची सुटका
esakal November 16, 2024 05:45 PM

उत्तर प्रदेशातील झांसी येथे शुक्रवारी रात्री महारानी लक्ष्मीबाई वैद्यकीय महाविद्यालयाच्या नवजात अतिदक्षता विभागात (NICU) लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण प्रदेशात हळहळ व्यक्त केली जात आहे.रुग्णालयातील आगीचे मुख्य कारण शॉर्ट सर्किट असल्याचे सांगितले जात आहे.

रात्री 10.45 वाजता आग लागली. त्यानंतर काही क्षणांतच NICU विभागात ऑक्सिजनच्या भरमसाठ प्रमाणामुळे आग वेगाने पसरली. त्यामुळे संपूर्ण विभाग धुराने भरून गेला आणि अनेक बालकांचा श्वास गुदमरल्यामुळे मृत्यू झाला.

रुग्णालयातील सुविधांची मर्यादा

उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी शनिवारी सकाळी घटनास्थळाला भेट दिली. त्यांनी माहिती दिली की, या वॉर्डमध्ये फक्त 18 खाटांची क्षमता असतानाही 49 बालकांना ठेवण्यात आले होते. या सुविधेच्या अपुऱ्या व्यवस्थापनामुळे या दुर्घटनेला हातभार लागल्याचे दिसून येत आहे.

बालकांची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू

ब्रजेश पाठक यांनी सांगितले की, या घटनेत मृत झालेल्या 10 बालकांपैकी 7 बालकांची ओळख पटली आहे, तर 3 बालकांची ओळख अद्याप पटलेली नाही. प्रशासन त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न करत आहे.

जखमी बालकांची स्थिती

या 17 बालके गंभीर जखमी झाली असून त्यांना वैद्यकीय महाविद्यालयाच्या आपत्कालीन विभागात व खाजगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यातील सात बालके खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.

प्रशासनाची कारवाई आणि तपासणी

घटनेनंतर जिल्हाधिकारी अविनाश कुमार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यांनी सांगितले की, आग लागण्याच्या घटनेची सखोल चौकशी केली जात आहे. रुग्णालयाच्या व्यवस्थापनातील त्रुटींसाठी जबाबदार असलेल्या व्यक्तींवर कठोर कारवाई केली जाणार आहे. या घटनेनंतर सरकारकडून पीडित कुटुंबीयांना मदतीचे आश्वासन देण्यात आले आहे. याशिवाय, रुग्णालयात सुरक्षेची उपाययोजना आणि सुविधांच्या पुनरावलोकनासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे.

या घटनेने सरकारी रुग्णालयातील सुरक्षेच्या उपाययोजनेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. NICU सारख्या संवेदनशील विभागात सुरक्षेच्या कठोर नियमांची अंमलबजावणी आणि सुविधांची पूर्तता गरजेची आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.