Maharashtra Election : टपाली मतपत्रिकेचा फोटो व्हॅट्सअॅपवर पाठवला, पोलिसावर गुन्हा दाखल
Saam TV November 16, 2024 06:45 PM

Maharashtra vidhan sabha election : टपाली मतदान प्रक्रियेची गोपनियता भंग केल्या प्रकरणी मुंबई पोलिस दलातील शिपायावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. टपाली मतदानाचा फोटो गावाकडे व्हॉट्स अॅप पाठवल्याचा प्रकार उघड झालाय. गावदेवी पोलिस ठाण्यात पोलिस शिपायाविरोधात कलम २२३ सह लोकप्रतिनिधी अधिनियम कलम १२८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. (Maharashtra Assembly Election)

ताडदेवच्या सशस्त्र पोलिस मुख्यालयात कार्यरत असलेला शिपाई हा मूळचा बीडमधील आष्ठीचा आहे. १४ नोव्हेंबर रोजी २३१ आष्ठी विधानसभा मतदार संघ बीडसाठी पोलिस कर्मचार्यांचे गावदेवी येथे टपाली मतदान घेण्यात आले. यावेळी टपली मतदान केल्यानंतर पोलिस कर्मचार्याने मतपत्रिकेचा फोटो काढून गावी नातेवाईक आणि मित्र परिवाराला पाठवला. या वायरल झालेल्या टपाली मतपत्रिकेची चौकशी केल्यानंतर ही टपाली मत पत्रिका मलबार हिल -185 येथून प्राप्त झाल्याचे समोर आले.

पोलीस शिपाई गणेश अशोक शिंदे यांनी 231-आष्टी विधानसभा मतदार संघ, जिल्हा बीड या मतदार संघासाठी टपाली मतपत्रिकेव्दारे मत नोंदविल्यानंतर, त्यांच्या मतपत्रीकेचा फोटो काढून सोशल मीडियावर वायरल केला. टपाली मतपत्रिकेचा फोटो सोशल मीडियावर वायरल केल्यामुळे कायदेशीर आदेशाची अवज्ञा केली, तसेच मतदानाची गोपनियता भंग केल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती 185 मलबार हिल विधानसभा मतदार संघाचे निवडणुक निर्णय अधिकारी बाळासाहेब वाकचौरे यांनी दिली.

मलबार हिल मतदार संघात विल्सन महाविद्यालय, नेताजी सुभाषचंद्र रोड, गिरगाव चौपाटी, चर्नीरोड मुंबई येथे पोलीस विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी टपाली मतदानासाठी फॅसिलिटेशन सेंटर तयार करण्यात आले आहे. या सेंटर मधील मतदान केंद्र क्रमांक 3 वर सदर घटना घडली आहे. सर्व मतदारांना मतदान केंद्रावर भ्रमणध्वनी वापरण्यास पुर्णपणे बंदी असल्याबाबत तसेच मतदारांनी त्यांचे मतदान करीत असताना पुर्णतः गोपनियता बाळगून, मतदान करावे व मतदान पुर्ण केल्यानंतर, बॅलेट मतपत्रिका व 13ए फॉर्म हा त्यासोबत असलेल्या लिफाफ्यात भरुन सदरचा लिफाफा बंद अवस्थेत केवळ मतदान कक्षात ठेवलेल्या मतदान पेटीत टाकण्याबाबत सुचित केले होते.अशी माहिती मतदान केंद्राध्यक्ष प्रसन्न मधुसुदन तांबे यांनी दिली. पोलीस शिपाई गणेश अशोक शिंदे यांनी मतपत्रिकेची गोपनीयता भंग केल्याप्रकरणी गावदेवी पोलीस ठाणे, मुंबई येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.