Butter chicken : प्रेशर कुकरमध्ये बटर चिकन बनवण्यासाठी टिप्स
Marathi November 16, 2024 09:25 PM

चमचमीत बटर चिकन अनेक जणांची आवडती डिश असते. पण, अनेकांचा असा समज असतो की, बटर चिकन केवळ हॉटेलमध्येच परफेक्ट बनतो. अनेकजण घरी बटर चिकन ट्राय करतात. पण, बेतच फसतो. एकतर चव वेगळी येते अथवा कुकरमध्ये शिजवताना पाण्याचा अंदाज न आल्याने पाणी जास्त होते. बटर चिकन कुकरमध्ये शिजवल्याने त्याची चवही उत्तम येते आणि वेळही वाचतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला प्रेशर कुकरमध्ये परफेक्ट बटर चिकन कसे शिजवायचे याबद्दल काही टिप्स सांगणार आहोत.

  • बटर चिकन बनवताना तुम्ही योग्य प्रकारचे चिकनपीस निवडायला हवेत. यासाठी सर्वात सोपा पर्याय म्हणजे बोनलेस चिकन पीस. बोनलेस चिकन पीस बटर चिकनमध्ये वापरल्याने ते मऊ तर असतातच शिवाय ग्रेव्हीही परफेक्ट तयार होते. याशिवाय तुम्ही बोनलेस चिकन मेरीनेट केल्याने त्याची चव आणखीन वाढते. बोनलेस चिकन मॅरीनेट करण्यासाठी दही, मीठ, आले-लसूण, लाल तिखट, हळदीचा वापर करावा, या पदार्थांमुळे चिकनला उत्तम चव येते. मॅरीनेट करण्यासाठी 30 मिनिटे चिकन ठेवून द्या. यानंतर बटर चिकन बनवण्यास सुरूवात करावी.
  • प्रेशर कुकरमध्ये बटर चिकन तयार करताना त्यात खडे मसाले भाजून घ्यावेत. खडे मसाले भाजताना दालचिनी, वेलची, तमालपत्र यांचा वापर आवर्जून करावा. मसाले भाजल्यावर त्यात आले-लसूण पेस्ट टाकावी. या मसाल्यांच्या सुगंधामुळे बटर चिकन एकदम चविष्ट तयार होते.
  • बटर चिकनमध्ये सर्वात महत्त्वाची ग्रेव्ही असते. ग्रेव्ही बनवण्यासाठी कांदा आणि टोमॅटोची प्युरी बनवावी लागते. परफ्केट ग्रेव्हीमुळेच बटर चिकनची चव वाढते. यासाठी बटर चिकनची ग्रेव्ही उत्तम होण्यासाठी कांदा आणि टोमॅटोची प्युरी व्यवस्थित शिजणे आवश्यक आहे. चुकूनही कांदा आणि टोमॅटोची प्यूरी कच्ची ठेवू नये, नाहीतर संपूर्ण बटर चिकनची चव बदलू शकते.
  • बटर चिकन क्रिमी होण्यासाठी काजूची पेस्ट अवश्य वापरावी. काजूच्या पेस्टमुळे ग्रेव्ही जाडसर तयार होते आणि चिकनची चवही वाढते. पण, असे असले तरी काजूची पेस्ट प्रमाणातच वापरावी.
  • प्रेशर कुकरमध्ये चिकन जास्त वेळ शिजवू नका, नाही तर चिकन पीस कडक होऊ शकतात. कमीत कमी तीन शिट्यांमध्ये चिकन शिजते. त्यामुळे प्रेशर कुकरच्या शिट्यांवर लक्ष ठेवावे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कुकरचे झाकण गरम असताना उघडू नये, कुकर थंड झाल्यावरचं उघडावे.

– जाहिरात –

हेही पाहा –

– जाहिरात –


संपादन – चैताली शिंदे

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.