Thackeray group criticizes BJP over Batenge toh Katenge slogan msj
Marathi November 16, 2024 07:25 PM


भाजपाच्या मित्रपक्षांना आणि स्वपक्षातील काहींना हा ‘मिजाज’ लक्षात आला आहे. त्यामुळेच ते या घोषणाबाजीवरून अस्वस्थ आहेत आणि या घोषणेपासून स्वतःला अलिप्त ठेवण्याचा आटापिटा ते करीत आहेत, असे ठाकरे गटाने म्हटले आहे.

(Maharashtra Election 2024) मुंबई : ‘बटेंगे तो कटेंगे’च्या फोडणीचा ठसका भाजपाच्या मित्रपक्षांनाच नाही, तर स्वपक्षातील काही मंडळींनाही लागला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तर या घोषणेला थेटच विरोध दाखवला आहे. एवढेच नव्हे तर, ‘‘हा उत्तर प्रदेश नाही, महाराष्ट्र आहे. महाराष्ट्र हा शिवाजी महाराज, फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारधारांवर चालतो. ‘बटेंगे तो कटेंगे’ हे आपल्याला मान्य नाही,’’ असे उपदेशामृत पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाजपाला पाजले आहे, असे ठाकरे गटाने सुनावले आहे. (Thackeray group criticizes BJP over Batenge toh Katenge slogan)

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिलेली ‘बटेंगे तो कटेंगे’ ही आणि पंतप्रधान मोदी वाजवीत असलेली ‘एक हैं तो सेफ है’ ही पिपाणी सर्वत्र वाजवली जात आहे. सोशल मीडियावर भाजपा आणि परिवारातील सायबर धाडी या घोषणांना पूरक पोस्ट्स व्हायरल करून भाजपाचा हिंदू-मुस्लिम ध्रुवीकरणाचा अजेंडा राबवीत आहेत, असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सामना दैनिकातील अग्रलेखातून केला आहे.

– Advertisement –

हेही वाचा – Maharashtra Election 2024 : हिंदू-मुस्लिम मुद्द्याला उठता-बसता ‘फोडणी’… ठाकरे गटाचा भाजपावर निशाणा

सध्या भाजपाचे राज्यसभेचे खासदार असलेले आणि मुलीला ‘कमळ’ चिन्हावर विधानसभा निवडणुकीत उतरविलेले राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीही स्वतःला भाजपाच्या ‘बटेंगे-कटेंगे’च्या ‘आदर्शा’पासून दूर ठेवले आहे. ‘‘आपण सेक्युलर हिंदू असून सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा आपला अजेंडा आहे,’’ असे मूळ सूरच अशोक चव्हाण यांच्या पोटातून ओठात आले आहेत, असे ठाकरे गटाने नमूद केले आहे.

– Advertisement –

अहमदनगरच्या राधाकृष्ण विखे-पाटील यांनीही या घोषणेला विरोधच केला आहे. तिकडे भाजपाच्या पंकजा मुंडे यांनी या घोषणेला जाहीर नापसंती दर्शवली. नंतर त्यांनी घूमजाव केले असले तरी सत्य बाहेर येऊन गेलेच. महायुतीमधील एक घटक पक्ष आणि स्वपक्षातील काही घटक यांच्या या ‘सत्य’ कथनाला आता फडणवीस महाशय ‘व्हाइट वॉश’ करण्याचा प्रयत्न करीत आहेत. म्हणे, ‘‘जनतेचा मिजाज म्हणजे कल समजण्यास या मंडळींना वेळ लागेल.’’ अहो फडणवीस, आधी तुमचे आणि तुमच्या पक्षाचे बघा. तुमच्या पायाखाली काय जळते आहे ते पहा, असे ठाकरे गटाने सुनावले आहे.

भाजपाच्या मित्रपक्षांना आणि स्वपक्षातील काहींना हा ‘मिजाज’ लक्षात आला आहे. त्यामुळेच ते या घोषणाबाजीवरून अस्वस्थ आहेत आणि या घोषणेपासून स्वतःला अलिप्त ठेवण्याचा आटापिटा ते करीत आहेत. मोदी यांच्या जाहीर सभांपासूनही स्वतःला दूर ठेवत आहेत. ‘बटेंगे-कटेंगेचा तडका, अंग अंग भडका’ अशी महायुतीतील आणि भाजपामधील काही मंडळींची अवस्था झाली आहे. तीच अस्वस्थता या घोषणांना होणाऱ्या त्यांच्या जाहीर विरोधातून दिसून येत आहे, असे ठाकरे गटाने म्हटले आहे. (Maharashtra Election 2024: Thackeray group criticizes BJP over Batenge toh Katenge slogan)

हेही वाचा – Favorite CM : अजित पवार यांनी सांगितले सर्वात चांगले मुख्यमंत्री, त्यांनीच शिकवले आघाडीचे राजकारण…


Edited by Manoj S. Joshi



Source link

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.