Maharashtra Board Time Table : विद्यार्थ्यांनो! अभ्यासाला लागा! दहावी-बारावी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; तीन महिने तयारीचे
esakal November 16, 2024 07:45 PM

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून यंदा दहावी, बारावीची परीक्षा दहा दिवस आगोदर घेतली जाणार आहे. बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारीपासून, तर इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. त्यानुसार आगामी तीन महिन्यांचा कालावधी विद्यार्थ्यांसाठी नियोजनबद्ध अभ्यासाचा आसणार आहे.

दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेबाबत विद्यार्थ्यांच्या मनात भीती असते. अशावेळी परीक्षेदरम्यान येणाऱ्या अडचणी आणि स्मरणशक्तीचे गणित आताच जुळवावे लागणार आहे. इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी या तीन महिन्यांचा कालावधी नियोजनबद्ध अभ्यासक्रमाचा असणार आहे. त्यासाठी पालकांनी विशेष लक्ष ठेवण्याची गरज आहे. इयत्ता दहावीचा पहिला पेपर मराठी, हिंदी व इतर प्रथम भाषा या विषयांचा राहील. दरम्यानच्या काळात वेळापत्रकानुसार कला, वाणिज्य, विज्ञान, एमसीव्हीसी आदी शाखांची परीक्षा होणार आहेत.

परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही

कॉपीमुक्त परीक्षेसाठी सर्वच केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे व सरमिसळ पद्धत अवलंबली जाणार आहे. दरम्यान, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने तात्पुरते परीक्षा वेळापत्रक जाहीर केल्यावर त्यावर राज्यभरातून हरकती मागविल्या होत्या. त्यासंदर्भात केवळ ४० हरकती प्राप्त झाल्या होत्या, त्याही किरकोळ स्वरूपाच्या होत्या. त्यामुळे बोर्डाने नियोजित वेळापत्रक अंतिम केले आहे.

परीक्षा १० दिवस अगोदर का?

  • परीक्षा दहा दिवस अगोदर घेतल्यास विद्यार्थ्यांना जेईई, नीट परीक्षेच्या तयारीसाठी वेळ मिळेल

  • परीक्षांचा निकाल नेहमीपेक्षा १५ ते २० दिवस अगोदर लागू शकतो

  • पुरवणी परीक्षा वेळेत घेऊन त्यातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांनाही पुढील प्रवेशास अडचणी येणार नाहीत

असे बघा वेळापत्रक

इयत्ता दहावी, बारावीचे वेळापत्रक ऑनलाइन जाहीर करण्यात आले आहे. ऑनलाइन वेळापत्रक पाहाण्यासाठी www.mahahsscboard.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.

परीक्षेचे असे आहे वेळापत्रक

(इयत्ता बारावी)

  • प्रात्यक्षिक परीक्षा : २४ जानेवारी ते १० फेब्रुवारी

  • लेखी परीक्षा : ११ फेब्रुवारी ते १८ मार्च

(इयत्ता दहावी)

  • प्रात्यक्षिक परीक्षा : ३ ते २० फेब्रुवारीपर्यंत

  • लेखी परीक्षा : २१ फेब्रुवारी ते १७ मार्च

या गोष्टी टाळा

  • विद्यार्थ्यांनी मोबाइलपासून दूर राहावे.

  • रात्री जागरण करू नये

  • शिळे अन्न ग्रहण करू नये

  • तासनतास एकाच ठिकाणी बसू नये

  • हे आवश्यक अभ्यासाचे वेळापत्रक

  • नियमित पेपर सोडवून पाहा

  • पोषक आहार घ्या

  • अभ्यासासोबत थोडे मनोरंजनही करा

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.