Mumbai High Court : १८ वर्षाखालील पत्नीशी संबंधही बलात्काराच, उच्च न्यायालयाचे निरीक्षण
esakal November 16, 2024 07:45 PM

नागपूर : पतीने १८ वर्षांखालील वयाच्या पत्नीसोबत ठेवलेले शरीरसंबंधही बलात्कारच ठरतात, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणात नोंदविले आहे. वैभव गजानन टेकाम (वय २४, रा. सेवाग्राम, जि. वर्धा) असे आरोपीचे नाव असून त्याने सत्र न्यायालयाच्या आदेशाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

न्यायमूर्ती गोविंद सानप यांनी हा निर्णय दिला. विशेष सत्र न्यायालयाने वैभवला ९ सप्टेंबर २०२१ रोजी कमाल दहा वर्षे सश्रम कारावास व एकूण ३ हजार ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. त्या निर्णयाविरुद्ध त्याने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. आरोपीने पीडित मुलीला प्रेमाच्या जाळ्यात फसविले होते. एक दिवस त्याने नागपूर रोडवरील फार्महाऊसमध्ये मुलीसोबत शरीरसंबंध ठेवले. त्यामुळे, तिला गर्भधारणा झाली. त्यानंतर आरोपीने मुलीला हार घालून लग्नाचा बनाव केला.

काही दिवसांनी तो गर्भपाताकरिता दबाव टाकू लागला. त्याने गर्भाची जबाबदारीही नाकारली. तो मुलीला मारहाण करीत होता. मुलीने २५ मे २०१९ रोजी सेवाग्राम पोलिस ठाण्यात तक्रार केली. या विरोधात त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाने ठोस पुरावे व कायदेशीर तरतुदी लक्षात घेता अर्ज फेटाळला.

मुलीच्या सहमतीला अर्थ नाही

या प्रकरणातील आरोपीने स्वत:चा बचाव करताना, १८ वर्षांखालील वयाची पीडित मुलगी त्याची पत्नी असून तिच्यासोबत तिच्या सहमतीने शरीरसंबंध ठेवले, त्यामुळे त्याला बलात्काराच्या गुन्ह्यासाठी दोषी ठरवता येणार नाही, असा दावा केला होता. उच्च न्यायालयाने हा दावा गुणवत्ताहीन ठरवून १८ वर्षांखालील वयाची मुलगी विवाहित असो किंवा नसो, तिच्यासोबत शरीरसंबंध ठेवणे बलात्कारच आहे, तसेच या मुलीने शरीरसंबंधासाठी दिलेल्या सहमतीलाही कायद्यात काहीच अर्थ नाही, असे नमूद केले.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.