Amit Shah : छत्रपतींच्या गडसंवर्धनासाठी दोन हजार कोटींची तरतूद...अमित शहा : उमरखेड येथील प्रचारसभेत काँग्रेसवर साधला निशाणा
esakal November 16, 2024 07:45 PM

उमरखेड (जि. यवतमाळ) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी दोन हजार कोटी रुपयांचे प्रावधान केले जाईल. लाडकी बहीण, शेतकरी व युवकांसाठी सुरू असलेल्या सर्व योजनांचा निधी वाढवणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले.

ते शुक्रवारी (ता. १५) उमरखेड येथे भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी आयोजित सभेत बोलत होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ‘जय शिवाजी जय भवानी‘ नारा देत भाषणाला सुरवात केली. काँग्रेसवर घणाघात करताना ते म्हणाले, या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने महाभारतातील कौरव पांडव समोरासमोर उभे आहेत. मोदींच्या नेतृत्वातील उमेदवार सत्याच्या बाजूने आहेत.

तर काँग्रेस आघाडी ही असत्याच्या बाजूने आहे. सोनिया गांधींनी राहुल बाबाचे विमान लँड करण्यासाठी २० वेळा प्रयत्न केले. आता २१ वा प्रयत्न सुरू आहे. परंतु राहुल बाबाचे विमान नागपूरच्या विमानतळावर क्रॅश होणार आहे. काँग्रेसच्या ७० वर्षाच्या कार्यकाळात त्यांना जे जमले नाही ते मोदी सरकारने करून दाखवले. राज्यात महायुतीचे सरकार आल्याबरोबर वर्धा यवतमाळ रेल्वे लाईनला गती दिली.

येत्या या पाच वर्षात योजना पूर्ण करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. उमरखेडसह यवतमाळ जिल्ह्यातील गावांना समृद्धी महामार्गाशी जोडण्याचे अभिवचन देत असताना ११८ किलोमीटरचे रस्ते करण्याचे उद्दिष्ट असल्याचेही ते म्हणाले.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही असली शिवसेना नसून फक्त उद्धवसेना राहिल्याची कोपरखळी त्यांनी लगावली. जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेस ३७० कलम परत लागू करण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु त्यांच्या चार पिढ्या जरी आल्या तरी ३७० कलम लागू होणार नाही. काश्मीर भारताचे अविभाज्य अंग असून कोणतीही ताकद काश्मीरला अलग करू शकणार नाही, असे शहा म्हणाले. उमरखेड येथे शुक्रवारी झालेल्या या प्रचारसभेत भाजपचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.

पाच मिनिटांत आटोपली सभा

चंद्रपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशात चौफेर विकास होत आहे. मोदींनी महाराष्ट्राला देखील काही कमी पडू दिले नाही. त्यामुळे मोदींच्या नेतृत्वात राज्यात महायुती सरकारची सत्ता येणे आवश्यक आहे.

आपल्याला शिवाजी महाराज यांच्या मार्गावर चालणारी महायुतीची सरकार हवी की औरंगजेब फॅन क्लब असलेली महाविकास आघाडी सरकार हवी असा सवाल करत गृहमंत्री अमित शहा यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला.

महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ शुक्रवार (ता. १५) चांदा क्लब ग्राऊंडवर सभा पार पडली. त्याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार, किशोर जोरगेवार, बंटी भांगडिया, देवराव भोंगळे, करण देवतळे, कृष्णा सहारे यांची उपस्थिती होती. अमित शाह यांची चंद्रपुरात साडेतीन वाजता सभा आयोजित करण्यात आली होती. यासाठी मोठया संख्येने भाजप कार्यकर्ते जमलेले होते.

मात्र, त्यांना चंद्रपुरात पोचायला उशीर झाला. त्यामुळे या लगबगीत अवघ्या पाच मिनिटांत शहा यांना सभा आटोपावी लागली. आपण फक्त चंद्रपूरची भेट घेण्यासाठी आलो आहोत. महायुतीच्या सर्व उमेदवारांना विजयी करा असे आवाहन करत त्यांनी आपले भाषण थांबविले.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.