Mumbai : विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी सर्व राजकीय पक्ष, नेते व उमेदवारांची लगबग सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार दररोज तीन-चार प्रचारसभा घेत आहे. आता त्यांनी शनिवारी महाराष्ट्रातील मतदारांना उद्देशून खुले पत्र लिहिले आहे. यामध्ये त्यांनी महायुतीवर जोरदार प्रहार केले आहेत.
नी लिहिलेले पत्र पक्षाच्या माध्यमातून राज्यातील अनेक वृत्तपत्रांतूनही प्रसिध्द करण्यात आले आहे. माझ्या स्वाभीमानी मतदार बंधू-भगिनींनो, अशी पत्राची सुरूवात आहे. महाराष्ट्र देशातील एक सुसंस्कृत, पुरोगामी, कणखर आणि स्वाभिमानी राज्य. पण महायुती सरकार दिल्लीच्या इशाऱ्यावर बाहूल्यांप्रमाणे नाचत आहे. धर्माच्या नावाखाली मनुवादाला जवळ करून जाती-पातींमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण करणे हाच सरकारचा उद्योग असल्याची टीका पत्रात करण्यात आली आहे.
सरकारने पुरोगामी विचारांच्या महापुरुषांचा अपमान करण्याचा विडा उचलला आहे. या सरकारने महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची सुध्दा विटंबना केली. महायुतील सत्तास्थानापासून खाली खेचून याचा जाब विचारायचा आहे. त्यासाठी मला आपली साथ हवी, अशी साद पवारांनी मतदारांना घातली आहे. केंद्र सरकार देश पोसणाऱ्या महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम करीत असल्याचे सांगत पवारांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
बेरोजगारी, पेपरफुटीसारखे मुद्दे उपस्थित करत पवारांनी सरकारने विद्यार्थ्यांचे-तरुणांचे भवितव्य देशोधडीला लावल्याची टीका केली आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न, हमीभाव, दुधाचे भाव, कांदा निर्यात, महागाई या मुद्द्यांवरूनही पवारांनी खडेबोल सुनावले आहेत. राज्यात कायदा-सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचा आरोप करताना पवारांनी उल्हासनगर पोलिस ठाण्यात आमदाराने केलेला गोळीबार, बाबा सिद्दीकींची हत्या, बलात्काराच्या घटना, अंमली पदार्थांची तस्करी यावरून महायुती सरकारला झोडपले आहे.
महायुती सरकारच्या काळात भ्रष्टाचार बोकाळला आहे. मंत्रालयाच्या अवतीभवती आलिशान इमारतीत भ्रष्टाचाराची सुविधा केंद्रे सुरू आहेत. शिवछत्रपतींच्या पुतळ्यात भ्रष्टाचार करणारे सरकार मुटभर दलाल मंडळींच्या माध्यमातून मंत्रालयाचा कारभार पाहत आहेत. राज्याच्या विकासासाठी कोणतेही दूरगामी धोरण नाही, नवीन योजना नाहीत. आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय, अशी अवस्था राज्य कारभाराची झाल्याचा हल्लाबोल पवारांनी केला आहे.
मतदारांना आवाहन करताना पवारांनी म्हटले आहे की, ज्यांनी सत्तेचा वापर करून सुसंस्कृत राजकारण नासवले, दूसरे पक्ष फोडले, घरे फोडली, नाती-गोती तोडली, जाती-पातींमध्ये वैर पसरवले, आरक्षण देण्याऐवजी कोर्टात याचिकाकर्ते उभे केले, त्यांना आता धडा शिकवायचा आहे. 105 हुतात्म्यांच्या रक्तातून, शेतकरी-कामगार-कष्टकऱ्यांच्या घामातून उभा राहिलेला महाराष्ट्र कुणापुढे झुकणारा नाही, हे आपल्याला पुन्हा एकदा दाखवून द्यायचे आहे.