Hingoli Vidhansabha Election : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी, महायुती, तिसरी आघाडी, मनसे, वंचित बहुजन आघाडी असे अनेक राजकीय पक्ष मैदानात आहेत. त्यामुळे बऱ्याच मतदारसंघात तिरंगी किंवा चौरंगी लढती होणार आहेत. हिंगोली जिल्ह्यात एकूण तीन विधानसभा मतदारसंघ आहेत, या तिन्ही विधानसभा मतदारसंघात काटे की टक्कर होणार असल्याचे बोलले जात आहे.
हिंगोली विधानसभा मतदारसंघात भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये लढत असणार आहे. भाजपकडून तानाजी मुटकुळे यांना पुन्हा एकदा मैदानात उतरवण्यात आलं आहे. तर उद्धव ठाकरेंनी हिंगोलीत रुपाली पाटील यांना उमेदवारी दिली आहे. प्रस्थापित नेते उद्धव ठाकरेंना सोडून गेल्यानंतर त्यांनी अनेक नव्या चेहऱ्यांना मैदानात उतरवले आहे.
जिल्ह्यात विधानसभेचे तीन मतदारसंघ असून तिन्ही ठिकाणी चुरस आहे. विशेष म्हणजे सरळ लढत कुठेही होताना नाही. त्यामुळे तिन्ही मतदारसंघांत निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे. हिंगोली मतदारसंघात आतापर्यंत भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढत झाली. यावेळी मात्र काँग्रेसला जागा सुटली नाही. त्यामुळे काँग्रेस वगळून येथील लढत होत आहे. या मतदारसंघात महायुतीकडून भाजपचे आमदार तान्हाजी मुटकुळे, महाविकास आघाडीकडून ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवार रूपाली गोरेगावकर निवडणूक रिंगणात आहेत. हिंगोलीच्या जागेवर काँग्रेसचा दावा असतानाही उद्धवसेनेने उमेदवार दिल्याने काँग्रेसकडून तयारी करीत असलेले माजी आमदार भाऊराव गोरेगावकर अपक्ष निवडणूक लढवीत आहेत. येथे आजी, माजी आमदारांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.
हिंगोली जिल्ह्यात भाजप, शरद पवारांची राष्ट्रवादी, अजित पवारांची राष्ट्रवादी, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंची शिवसेना या पक्षांनी वेगवेगळ्या मतदारसंघात आपले उमेदवार जाहीर केलेले आहेत. यामध्ये एका मतदारसंघात शिंदेंची शिवसेना विरुद्ध ठाकरेंची शिवसेना असा सामना पाहायला मिळणार आहे. तर एका मतदारसंघात अजित पवारांची राष्ट्रवादी विरुद्ध शरद पवारांच्या राष्ट्रवादी आमने सामने आली आहे. तर एका मतदार संघात उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि भाजपमध्ये लढत होणार आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या