पुसद (जि. यवतमाळ) : लोकसभा निवडणुकीत संविधान बदलणाऱ्यांना मतदारांनी दणका दिला. शरद पवार यांच्यासारखा ८४ वर्षांचा योद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडल्यानंतरही दिल्लीपुढे झुकला नाही. हा नेता झुकणारा नाही तर लढणारा आहे.
विधानसभा निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात महाविकास आघाडीची त्सुनामी आली आहे, असे प्रतिपादन महाविकास आघाडीचे स्टार प्रचारक खासदार अमोल कोल्हे यांनी केले. पुसद येथे महाविकास आघाडीचे उमेदवार शरद मैंद यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत खासदार कोल्हे शुक्रवारी बोलत होते.
पक्ष फोडण्याचा गद्दारीचा काळा डाग गुलाबी रंगाने झाकल्या जात नाही, अशी टीका खासदार कोल्हे यांनी अजित पवारांवर केली. ७० हजार कोटी भ्रष्टाचाराचा आरोप करताच दादा त्यांच्या मांडीवर जाऊन बसले. त्यांच्यासोबत विकासासाठी गेलो असे सांगणाऱ्या स्थानिक आमदाराने एक तरी विकास अथवा रोजगाराचा प्रकल्प आणला का ते सांगावे, असा कोल्हे यांनी प्रश्न केला.