Disha Patni : दिशा पटनीच्या वडिलांची झाली फसवणूक ; अध्यक्ष बनवण्यासाठी तब्बल 25 लाखांचा गंडा
esakal November 16, 2024 07:45 PM

Bollywood Entertainment News : बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटनी सध्या तिच्या नुकत्याच कंगुवा सिनेमामुळे चर्चेत आहे. तिचा हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिस गाजवत असला तरीही तिच्या वैयक्तिक आयुष्यात धक्कादायक घटना घडली आहे. दिशाचे वडील आणि निवृत्त पोलीस अधिकारी जगदीश पटनी यांची फसवणूक झाली आहे. याबद्दल त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या एफआयआरवर पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, दिशा पटनी यांचे वडील जगदीश पटनी यांची तब्बल 25 लाख रुपयांना फसवणूक झालीये. दिशा पटनी हे निवृत्त पोलीस अधिकारी असून त्यांना सरकारी आयोगात उच्च पद दिलं जाईल असं वचन देण्यात आलं होत. या बाबत एका गटाने त्यांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. याबद्दल 5 जणांना आरोपी करण्यात आलं आहे. शिवेंद्र प्रताप सिंह, जुना आखाड्याचे आचार्य जयप्रकाश, दिवाकर गर्ग, प्रीती गर्ग आणि एक अनोळखी व्यक्ती अशा पाच जणांची नाव तक्रारीत आरोपी म्हणून दाखल करण्यात आली आहे. या सगळ्यांविरोधात बरेली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

दिशाचे वडील जगदीश पटनी हे त्यांच्या कुटूंबाबरोबर सिव्हिल लाईन्स बरेली इथे राहतात. त्यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, जगदीश यांनी आरोप केला आहे कि, शिवेंद्र प्रताप सिंह यांच्याशी त्यांची ओळख आहे. शिवेंद्र यांनी त्यांची ओळख दिवाकर गर्ग आणि आचार्य जयप्रकार यांच्याशी करून दिली. या दोघांनीही त्यांची राजकीय ओळख असल्याचा दावा करून जगदीश पाटील यांना सरकारी आयोगात अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि अन्य उच्च पद देण्याचं वचन केलं दिलं होतं.

पीटीआय वृत्तानुसार, घोटाळेबाजांच्या एका गटाने जगदीश पटनी यांना आमिष दाखवून 25 लाख रुपये घेतले. ही रक्कम 5 लाख रुपये रोख आणि 20 लाख रुपये 3 वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये ट्रान्सफर करून घेण्यात आली आहे. तर 25 लाख रुपये देऊनही 3 महिन्यांत कोणतीही प्रगती होत नसताना व्याजासह पैसे परत करण्याचे आश्वासन देण्यात आलं होतं. पोलिसांच्या माहितीनुसार, जगदीश यांनी त्यांच्याकडे पैसे परत मागितले तेव्हा त्यांना धमकावण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

सध्या याबाबत पोलीस अधिक तपास करत असून याबाबत अजून कोणालाही अटक करण्यात आली नाहीये. आता या प्रकरणात पोलीस नेमकं काय सत्य शोधून काढणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.