Purandar Assembly constituency: राज्यातील अनेक विधानसभा मतदारसंघामध्ये तिरंगी लढतीचं चित्र आहे. त्याचप्रमाणे पुंरदर विधानसभा निवडणुकीमध्ये देखील तिरंगी लढत होत आहे. महाविकास आघाडीमध्ये ही जागा काँग्रेसला मिळाली आहे. या मतदारसंघामध्ये अधिकृत उमेदवार म्हणून विद्यमान आमदार संजय जगताप यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे. तर महायुतीकडून शिवसेना शिंदेंच्या पक्षाचे नेते विजय शिवतारे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसने अजित पवार यांच्या पक्षाचे उमेदवार माजी प्रशासकीय अधिकारी संभाजी झेंडे देखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाने संभाजी झेंडे यांना ऐनवेळी एबी फॉर्म दिल्याने महायुतीत मैत्रीपुर्ण लढत होत आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून आमदारकीच्या प्रतिक्षेत असलेले संभाजी झेंडे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. महायुतीतून बंडखोरी राष्ट्रवादी काँग्रेसकडून एबी फॉर्म घेऊन झेंडे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांच्या उमेदवारीमुळे महायुतीचे अधिकृच उमेदवार विजय शिवतारे यांचं मतांचं गणित बिघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता नेमकी आमदारकीची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
महायुतीकडून माजी मंत्री राहिलेले विजय शिवतारे हे आमदार संजय जगताप यांना आव्हान देणार आहेत. 2019 च्या निवडणुकीच्या निकालाच्या आधारे या भागात काँग्रेसचे संजय जगताप यांचा प्रभाव मजबूत असल्याचे मानले जात असले तरी शिवसेनाही या जागेवर आपली गमावलेली पकड पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे. यावेळी निवडणुकीत सर्व समीकरणे बदलली आहेत. एकेकाळी काँग्रेसला कडाडून विरोध करणाऱ्या शिवसेनेत दोन गट पडले आहेत. यामध्ये एक गट भाजपच्या बाजूने आहे, तर दुसरा गट काँग्रेससोबत निवडणूक लढवत आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही दोन गट पडले आहेत. एक गट महायुतीचा तर दुसरा शरद पवार गट महाविकास आघाडीचा भाग आहे. मात्र, पुरंदरमधून विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसचे नेते आणि विद्यमान आमदार संजय जगताप यांना उमेदवारी दिली आहे, तर महायुतीकडून शिवसेना शिंदेंच्या पक्षाचे नेते विजय शिवतारे आणि अजित पवारांच्या पक्षाचे संभाजी झेंडे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे.
या मतदारसंघात 1962 मध्ये पहिल्यांदा निवडणूक झाली, ज्यामध्ये काँग्रेसचे उमेदवार ज्ञानेश्वर खैरे विजयी झाले. त्यानंतर 1967 मध्येही ज्ञानेश्वर खैरे यांनी काँग्रेसच्या तिकिटावर सलग दुसरा विजय मिळवला. यानंतर 1972 मध्ये समाजवादी पक्षाचे जाधवराव ज्योतियाजी विजयी झाले त्यांनी काँग्रेसचे वर्चस्व खोडून काढले आणि पुरंदरच्या राजकारणात बदल घडवला. 1978 मध्ये जनता पक्षाचे दादा जाधवराव विजयी झाले आणि 1980 मध्ये संभाजीराव कुंजीर यांनी काँग्रेसचे प्रतिनिधित्व करत पुन्हा काँग्रेसची जागा जिंकली. त्यानंतर 1985 मध्ये पुन्हा दादा जाधवराव जनता पक्षाचे उमेदवार म्हणून विजयी झाले. 1990 मध्ये ते जनता दलाच्या तिकिटावर विजयी झाले आणि ही जागा पुन्हा एकदा त्यांच्या नावावर झाली. 1995 आणि 1999 मध्येही जनता दलाकडून निवडणूक जिंकून दादा जाधवरावांनी ही जागा कायम राखली.
पुरंदरच्या राजकारणात 2004 साली राष्ट्रवादी काँग्रेसचे अशोक टेकवडे विजयी झाल्याने मोठे बदल झाले. 2009 मध्ये शिवसेनेचे विजय शिवतारे यांनी राष्ट्रवादीचे वर्चस्व संपुष्टात आणून विजय मिळवला आणि 2014 मध्येही शिवतारे यांनी विजयाची पुनरावृत्ती केली, या मतदारसंघात शिवसेनेचा प्रभाव आणखी मजबूत झाला.
2019 च्या निवडणुकीत काँग्रेसचे संजय जगताप यांनी शिवसेनेच्या विजय शिवतारे यांचा पराभव करताना पुन्हा एकदा काँग्रेसचा प्रभाव दाखवला. या निवडणुकीत संजय जगताप यांना 1,30,710 मते मिळाली, तर विजय शिवतारे यांना 99,306 मते मिळाली. या निकालाने पुरंदरमध्ये काँग्रेसच्या पुनरागमनाचे संकेत दिले आणि शिवसेनेविरुद्ध काँग्रेसची मजबूत पकड म्हणून या निकालाकडे पाहिले गेले.