जो बायडेन यांनी उडवली स्पेस स्टेशनवर अडकलेल्या सुनीता विल्यम्सची खिल्ली? म्हणाले, ''माझी पत्नी मला अंतराळात...''
Times Now Marathi November 16, 2024 11:45 PM

Return: गेल्या अनेक दिवसांपासून लोकप्रिय अंतराळवीर सुनीता विल्यम्स या अंतराळात अडकून आहेत. आता फेब्रुवारी 2025 पर्यंत त्या पृथ्वीवर परतू शकतात, अशा माहिती नासानेही दिली आहे. नासाचे त्यांच्यावर लक्ष असून आता अनेक दिवस अंतराळात राहिल्याने त्यांची तब्येतही बिघडत जाते आहे असे कळते आहे. अमेरिकेत नुकत्याच निवडणुका पार पडल्या. यावेळी बहुमत हे रिपब्लिकन पार्टी म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांना मिळाले. त्यामुळे अमेरिकेत त्यांच्या समर्थकांनी उत्साह साजरा केला. त्यातून जो बायडेनही चर्चेत आले. तेही नागरिकांशी विविध माध्यमांतून संवाद साधत आहेत.

नुकत्याच एक परिसंवादात त्यांनी सुनीता विल्यम्स यांच्या परतण्यावर भाष्य केले आहे. अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांच्यावर अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनी आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचे बोललं जातं आहे. यामुळे नेटकरी संतापले असून ते आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) अडकलेल्या अंतराळवीरांचा यातून अपमान झाला असल्याचे सर्वांचे मत आहे. पेरूचे राष्ट्राध्यक्ष दिना बोलुअर्टे यांच्याशी चर्चा करताना बायडेन यांनी नासाचे प्रशासक बिल नेल्सन यांची खिल्ली उडवल्याचे बोललं जातं आहे. यावेळी बायडेन म्हणाले, ''ज्या वेळी माझ्या पत्नीला वाटते की, मी नियंत्रणाबाहेर जात आहे, तेव्हा ती म्हणते की मी नेल्सनला कॉल करेन आणि तुला अंतराळात पाठवायला सांगेन.''

त्यांच्या या विधानावरून गदारोळ माजल्याचे समजते आहे. जो बायडेन म्हणाले की, ''त्यांनाही याची चिंता आहे. हे शक्य आहे की, ती पत्नी खरोखरच मला अंतराळात पाठवण्यास सांगेल. तेही अशावेळी जेव्हा अंतराळवीरांना परत आणण्याचे काम सुरू आहे.'' बायडेन यांनी हे वक्तव्य केल्यावर पेरूच्या राष्ट्राध्यक्षांना हसू फुटले.

सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना नासाकडून बोईंगच्या स्टारलाइनरसह 8 दिवसांच्या मोहिमेवर पाठवण्यात आले होते. पण, तांत्रिक अडचणींमुळे ते जवळपास 7 महिन्यांपासून त्याच जागेतच अडकले आहेत. आता त्याच्या परतीची प्रतीक्षा फेब्रुवारीपर्यंत वाढली आहे. इलॉन मस्कची कंपनी स्पेसएक्स आपल्या क्रू ड्रॅगन कॅप्सूलसह त्यांना पृथ्वीवर आण्याची तयारी सुरू झाल्याचे कळते आहे.

काही दिवसांसाठी सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे अंतराळात गेले होते. स्पेस स्टेशनवर पोहोचल्यानंतर तिथला सुनीता विल्यम्सचा डान्स करतानाचा व्हिडीओही व्हायरल झाला होता. पोहोचतानाही काही अडचणी आल्या होत्या. यावेळी सुनीता विल्यम्स यांनी आपला वाढदिवस अंतराळातच साजरा केला होता. त्याचसोबतच त्यांनी दिवाळीच्या शुभेच्छाही दिल्या होत्या. एक पत्रकार परिषद घेऊन त्यांनी नागरिकांशीही संवाद साधला.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.