गेल्या दोन वर्षात राज्यात 67,381 महिलांवर अत्याचार, 64 हजार महिला बेपत्ता आहेत : शरद पवार
जयदीप भगत, बारामती November 17, 2024 02:13 AM

Sharad Pawar, सातारा : "भाजपचे राज्य आल्यावर  स्त्रियांवर अत्याचार झाले आहेत. राज्यात भाजपचे सरकार आल्यावर 67,381 दोन वर्षात महिलांना अत्याचार झाले. रोज पाच स्त्रियांवर अत्याचार होत होता. महिला बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढलं होतं.  राज्यात 64 हजार महिला बेपत्ता झाल्या", अशी आकडेवारी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी फलटण येथील प्रचार सभेत सांगितली. ते दीपक चव्हाण यांच्यासाठी घेण्यात आलेल्या प्रचार सभेत बोलत होते. 

शरद पवार म्हणाले, लाडक्या बहिणींना अर्थसहाय्याची नाही तर संरक्षणाची आवश्यकता आहे. दर तासाला पाच महिलांच्या अत्याचाराच्या घटना आज पोलीस स्टेशनमध्ये येत आहेत. या सरकारच्या कालखंडामध्ये २० हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. महिला, शेतकरी आणि तरुणांमध्ये अस्वस्थता आहे. विद्यार्थ्यांनी शिकल्यानंतर नोकरीसारखा प्रश्न आज गंभीर झालेला आहे. चित्र असं दिसतंय की मुलांना नोकरी मिळत नाही, त्यांच्यामध्ये निराशा होत आहे.

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, मध्यंतरी देशाच्या लोकसभेची निवडणूक झाली, आता विधानसभेची निवडणूक आहे. या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राचा कारभार कोणाच्या हातामध्ये द्यायचा? याचा निकाल आपल्या सगळ्यांना घ्यायचा आहे. ज्यांच्या हातामध्ये आपण महाराष्ट्राची सत्ता दिली त्यांचा पाच वर्षांचा अनुभव बघितला तर आज इथे सत्तेमध्ये बदल केल्याशिवाय पर्याय आपल्या सगळ्यांसमोर नाही. सत्तेमध्ये बदल करायचा असेल तर महाविकास आघाडीचे उमेदवार मोठ्या मतांनी विजयी करणे आणि महाराष्ट्राच्या राजकारणात बदल करणे हे ऐतिहासिक काम उद्याच्या 20 तारखेला तुम्हा सर्वांना करायचे आहे. म्हणून महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मोठ्या मतांनी तुम्ही विजयी करा. माझी खात्री आहे की, महाराष्ट्र घडल्याशिवाय राहणार नाही. 

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी राज्याला एक दिशा दिली, त्यांच्या नंतरच्या काळामध्ये वसंतराव नाईक यांनी दिली, अनेकांनी दिली. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी जी पावलं टाकण्यात आली होती तोच महाराष्ट्र आज आपल्याला बघायला मिळतंय त्याची अधोगती होत आहे. चहुबाजूंनी राज्याचे जे नुकसान करत आहेत, लोकांचे जीवन उध्वस्त करत आहेत, महत्त्वाच्या प्रश्नांची सोडवणूक करत नाहीत. त्यांच्या हातामध्ये सत्ता द्यायची का? हा निकाल आपल्याला घ्यायचा आहे. महाराष्ट्राच्या हिताची जपणूक करायची असेल तर वाटेल ती किंमत देऊ पण भाजप आणि त्यांच्या सहकाऱ्यांना यत्कींचीतही पाठिंबा देणार नाही आणि पुन्हा एकदा चव्हाण साहेबांच्या काळातला गौरवशाली महाराष्ट्र ही महाराष्ट्राची स्थिती तयार कशी होईल? याची आम्ही काळजी घेऊ, असं आवाहनही शरद पवार यांनी केलं. 

इतर महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime : स्वत:च्या गुन्हेगारीची दहशत बसावी म्हणून माजी सरपंच असणाऱ्या कंत्राटदाराला अपहरण करुन संपवलं, मृतदेहाचे तुकडे खडकवासला धरणात सापडले!

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.