पुणे - राज्य परिवहन महामंडळाच्या पुणे विभागात मागील तीन वर्षात प्रवाशांची संख्या सुमारे ५० हजारांनी वाढली. मात्र, एसटी गाड्यांच्या संख्येत कोणतीच वाढ झालेली नाही. तर तीन वर्षात १७० एसटी बस भंगारात गेल्या तर तेवढ्याच नवीन बस विभागात दाखल झाल्या.
एकही अतिरिक्त बसची संख्या वाढली नाही. बसची संख्या कमी असल्याने प्रवाशांना व एसटी प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. प्रवाशांना उभे राहून प्रवास करावा लागतो तर प्रशासनाला कमी प्रतिसादाच्या मार्गावरच्या फेऱ्या रद्द कराव्या लागतात. दोन्ही बाबतीत नुकसान प्रवाशांचे होत आहे.
एसटी प्रशासनाने महिलांसाठी प्रवासात ५० टक्के सवलत दिली. तर ज्येष्ठांना प्रवास मोफत केला. त्यामुळे एसटीला अच्छे दिन आले. प्रवासी संख्येत मोठी वाढ झाली, मात्र एसटी बसच्या संख्येत मात्र वाढ न होताच उलट घटच झाली आहे.
फेऱ्या रद्दचे प्रमाण १० टक्के
पुणे विभागाचे दैनंदिन एसटीच्या फेऱ्या रद्द होण्याचे प्रमाण सुमारे १० ते १२ टक्के आहे. प्रवासात बस नादुरुस्त होणे, तर कमी प्रतिसाद असलेल्या मार्गावरील फेऱ्या रद्द करणे या प्रमुख कारणांमुळे बसच्या फेऱ्या रद्द होत आहेत. बस नादुरुस्त झाल्यावर प्रवासी सेवेत धावणाऱ्या बसची संख्या कमी होते. त्याचाही फटका प्रवाशांना बसत आहे.
सुमारे १ लाख १० हजार - पुणे विभागातील तीन वर्षांपूर्वीची दैनंदिन प्रवासी संख्या
१ लाख ६० हजार - सध्याची दैनंदिन प्रवासी संख्या
५० हजार - तीन वर्षातील प्रवासी वाढ
८९० - पुणे विभागात उपलब्ध एसटी बस
१६० - एवढ्या बसची आवश्यकता
एसटी प्रवाशांची संख्या वाढत आहे. त्या तुलनेत बसची उपलब्धता नाही. पुणे विभागाला आणखी १६० बसची आवश्यकता आहे. येत्या काही दिवसांत पुणे विभागाला नवीन बस मिळणार आहेत. त्यामुळे प्रवाशांची काही प्रमाणात तरी सोय होईल.
- प्रमोद नेहूल, विभाग नियंत्रक, एसटी विभाग, पुणे.