मोहोळ : युती शासनाने शेतकऱ्यां साठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यात कांदा निर्यात बंदी उठविणे, विज बिल माफी, दिवसा विज पुरवठा यासह अन्य निर्णय झाले आहेत. मोहोळ विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी गेल्या पाच वर्षात 300 कोटींचा निधी दिला, मात्र पुढील पाच वर्षात 400 कोटींचा निधी देऊ.
आमदार यशवंत माने यांनी पाच वर्ष चांगले काम केले आहे. उर्वरित विकासासाठी त्यांना पुन्हा विधानसभेत पाठवा. आष्टी उपसा सिंचन योजना व अन्य कामासाठी 772 कोटी रुपये दिले तर सिना व भीमा नद्यावर बॅरेज बांधावयाचे आहेत. येत्या 20 तारखेला चुकीचा निर्णय घेऊ नका. असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
मोहोळ विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार आमदार यशवंत माने यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री पवार यांच्या टाकळी सिकंदर येथे जाहीर सभेचे आयोजन केले होते त्यावेळी ते बोलत होते. उपमुख्यमंत्री पवार पुढे म्हणाले, शेतकऱ्यांची अडचण पाहून विज बिल माफी केली, आम्ही काम करणारे आहोत. लाडक्या बहिणीसाठी महिन्याला पंधराशे रुपये दिले आहेत.भविष्यात त्यात वाढ होईल.
संविधानाचा मुद्दा संदर्भात फेक नरेटिव्ह सेट केल्याने लोकसभेला फटका बसला. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी अगोदर व नंतर तालुका स्तरावर संविधान भवन बांधण्यात येणार आहे. परदेशातून परत येण्यासाठी "सीएए" हा कायदा लागू केला आहे. राष्ट्रवादी हा बहुजनांचा पक्ष आहे शेवटच्या घटका पर्यंत न्याय देणारा आहे. राष्ट्रवादी स्थापन झाल्यापासून सोलापूर जिल्ह्याने पक्षावर प्रेम केले आहे. "राज्याच्या सर्वांगीण विकास हाच महायुतीचा अजेंडा आहे". युती शासनाने सुरू केलेल्या योजना कायम सुरू ठेवायच्या असतील तर येत्या 20 तारखेला विचार करून निर्णय घ्या.
आमदार माने हे मतदार संघाच्या विकासासाठी तळमळीने काम करणारा नेता आहे. त्यांच्या पाठीशी खंबीर उभे राहा. व्यापाऱ्यांच्या व इतरांच्या सोयीसाठी मुंबई- हैदराबाद ची बुलेट ट्रेन लवकरच सुरू होणार आहे. मराठा आरक्षणासाठी एक समिती नेमली आहे, अद्याप त्यांचा अहवाल आला नाही, अहवाल आल्यानंतर त्याबाबत सकारात्मक तोडगा निघेल.
यावेळी माजी आमदार प्रशांत परिचारक म्हणाले, भविष्यात महाराष्ट्राच्या पायाभरणी साठी महायुतीचे उमेदवार जास्तीत जास्त निवडून देणे गरजेचे आहे. आम्ही आमच्या पंढरपूर तालुक्यातील 17 गावातून मताधिक्य देऊ. आमदार माने यांनी गेल्या पाच वर्षात गट तट बाजूला ठेवून चांगले काम केले आहे.
यावेळी आमदार यशवंत माने म्हणाले, उपमुख्यमंत्री पवार यांनी मला दुसऱ्यांदा उमेदवारी देऊन माझ्यावर पुन्हा विकासाची जबाबदारी टाकली आहे. केवळ उपमुख्यमंत्री पवार यांच्या मुळेच मोहोळ विधानसभा मतदारसंघात विकासाची गंगा आली आहे. तालुक्याच्या विकासात भर घालण्याच्या योजनांना दादांनी आचारसंहिता लागायच्या अगोदर मंजुरी दिली. भीमा नदीला कालव्याचा दर्जा द्यावा, सिना नदीवर बॅरेज बंधारे बांधावेत अशी मागणी माने यांनी यावेळी केली. अजितदादांनी पुन्हा मोहोळला येताना मुख्यमंत्री म्हणून यावे अशीही भावना त्यांनी व्यक्त केली.
यावेळी माजी आमदार राजन पाटील म्हणाले, उपमुख्यमंत्री पवार यांनी बारामती पेक्षाही मोहोळ वर जादा लक्ष दिले आहे. त्यामुळे आपण दिलेली ताकद व आमदार माने यांचे विकासकाम या माध्यमातून यावेळी जादा मताधिक्य देऊ.
यावेळी माजी आमदार रमेश कदम युथ फाउंडेशन च्या वतीने सिद्धी कदम हिची उमेदवारी कापल्याच्या नाराजीतून कार्यकर्त्यांनी आमदार माने यांना पाठिंबा जाहिर केला तसे लेखी पत्र आमदार माने यांना दिले.
यावेळी लोकनेते कारखान्याचे अध्यक्ष विक्रांत पाटील, सिनेट सदस्य अजिंक्यराणा पाटील, माजी आमदार प्रशांत परिचारक,दिनकर मोरे, शिरोमणी कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे, पुणे जिल्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रदीप गारटकर, भिमाचे माजी उपाध्यक्ष कल्याणराव पाटील, सतीश काळे, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष प्रकाश चवरे,अनिल कादे, माऊली चव्हाण, शिवाजी चव्हाण, भारत सुतकर, प्रमोद डोके, नागनाथ साठे, जोशना पाटील, राजाभाऊ गुंड, बाळासाहेब पाटील, सचिन पाटील, सुनील चव्हाण, रमेश माने, विकास वाघमारे, दादा पवार, प्रशांत बचुटे, प्रकाश बचुटे, कल्पना खंदारे, यशोदा कांबळे, रत्नमाला पोतदार, संजीव खिलारे, गफूर सय्यद, राजू गावडे, सज्जन पाटील, नाना डोंगरे,दीपक माळी उपस्थीत होते.
#ElectionWithSakal