मुंबई : शार्क टँकचे जज आणि हेडफोन तसेच इअरफोन तयार करणाऱ्या बोट या कंनीचे मालक अमन गुप्ता यांच्यामुळे शेअर बाजारात लवकरच मोठ्या घडामोडी घडू शकतात. मिळालेल्या ताज्या माहितीनुसार डेली वियर वॉच तसेच ऑडियो प्रोडक्ट्स तयार करणाऱ्या बोट या ब्रँडचा पुढच्या वर्षी आयपीओ येण्याची शक्यता आहे. हा आयपीओ एकूण 4000 कोटी रुपयांचा असण्याची शक्यता आहे. या आयपीओसाठी बोट कंपनीने ICICI सिक्योरिटीज, गोल्डमॅन सॅक्स आणि नोमुरा यांची बँकर म्हणून नियुक्ती केली आहे.
बोट या कंपनीच्या आयपीओसाठी 2022 मध्ये सेबीकडे ट्राफ्ट पेपर दाखल करण्यात आले होते. मात्र बाजाराची स्थिती लक्षात घेऊन हा आयपीओ थांबवण्यात आला होता. वित्त वर्ष 24 मध्ये बोट या कंपनीचा महसूल 5 टक्क्यांनी घसरून 3285 कोटी रुपयांवर राहिलेला आहे. असे असतानाच आता बोट या कंपनीचा आयपीओ येणार असल्याची चर्चा आहे. वित्त वर्ष 24 मध्ये कंपनीने आपला तोटा 50 टक्क्यांनी कमी करून 70.8 कोटी रुपयांवर आणला आहे. आयपीओ येण्याआधी सणासुदीच्या काळातही बोट या कंपनीच्या ऑडिओ सेगमेंटमधील प्रोडक्टसची विक्री वाढली होती.
मार्केट ट्रॅकर आयडीसीनुसार जूनच्या तिमाहीत या कंपनीच्या वियरेबल्स सेगमेंटच्या शिपमेंटमध्ये 10 टक्क्यांची घसरण झालेली आहे. वियरेबल्स सेगमेंटमध्ये वायरलेस ऑडियो डिव्हाईस आणि स्मार्टवॉच यांचा समावेश आहे. अमन गुप्ता आणि समीर मेहता या दोघांनी मिळून 2014 रोजी बोट या कंपनीची सुरुवात केली होती. बोट या कंपनीने आतापर्यंत 171 मिलियन डॉलर्सचा फंड उभा केलेला आहे. या कंपनीची भारतात वियरेबल्स सेगमेंटमध्ये बाजारात एकूण 26.7 टक्के हिस्सेदारी आहे.
अमन गुप्ता यांनी समीर मेहता यांना सोबत घेऊन 2014 साली बोट या कंपनीची सुरुवात केली होती. या काळात अमन गुप्ता यांच्याकडे जास्त पैसे नव्हते. त्यांनी आपल्या या व्यवसायाच सुरुवात 30 लाख रुपयांच्या भांडवलापासून केली होती. आज ही कंपनी 11500 कोटी रुपयांची आहे.
दरम्यान, बोट कंपनीचा आयपीओ नेमका कधी येणार? हा आयपीओ आलाच तर त्याचा किंमत पट्टा किती असेल? याबाबत सध्या कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
हेही वाचा :
आनंदी आनंद गडे, सोनं-चांदी स्वस्त झालं चोहीकडे! पंधरा दिवसांत तब्बल ‘इतक्या’ रुपयांनी भाव घसरला!
अधिक पाहा..