Women’s Asian Champions Trophy 2024: महिला आशियाई अजिंक्यपद करंडक हॉकी स्पर्धेत आपली हुकुमत सिद्ध करताना भारताने बलाढ्य चीनचा ३-० असा पराभव केला. या विजयासह भारताने गटात अव्वल स्थान कायम ठेवले आहे.
शनिवारी झालेल्या या सामन्यात भारताकडून संगीता कुमारी (३२ वे मिनिट), सलिमा टेटे (३७) आणि दीपिका (६०) यांनी गोल केले. दीपिका या स्पर्धेत सर्वाधिक आठ गोल करून आघाडीवर आहे.
चीनविरुद्धच्या या सामन्यात भारताने सुरुवातीपासून आक्रमक खेळ केला. पहिल्या काही सेकंदातच भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला. दीपिकाने जोरदार फटका मारून गोल करण्याचा प्रयत्न केला; परंतु चीनची गोलरक्षक सुराँग वू हिने भक्कमपणे चेंडू अडवला.
भारताच्या या आक्रमक खेळाविरुद्ध चीनला मधूनच प्रतिआक्रमण करता येत होते; मात्र वर्चस्व मिळवणाऱ्या भारताकडून पहिल्या अर्धाला पाच मिनिटे शिल्लक असताना शर्मिलाने मध्य रेषेवरून चेंडू घेत सुनेलिताकडे पास दिला. तिने लगेचच दीपिकाकडे चेंडू दिला; पण गोल थोडक्यात हुकला.
पहिल्या अर्धात गोल शून्य बरोबरी होता. दुसऱ्या अर्धात चीनने आक्रमण केले. त्यांच्या चेंगचेंग लिऊ हिने मारलेला चेंडू भारताची गोलरक्षक बिछूच्या हातून निसटला; परंतु रिबाँड झालेला चेंडू मारण्यासाठी तेथे चीनची दुसरी खेळाडू नव्हती. आक्रमण-प्रतिआक्रमणाच्या खेळात दुसऱ्या अर्धातही गोल झाला नाही.
तिसऱ्या अर्धात मात्र भारताने आपल्या खेळात अधिक सुसूत्रता आणली. सुशीलाच्या पासवर आक्रमण करणाऱ्या संगीता कुमारीने पहिला गोल केला. पाच मिनिटानंतर प्रीती दुबे हिने अनमार्क असलेल्या सलिमा टेटेकडे चेंडू दिला आणि तिने कोणतीही चूक न करता चेंडू गोलजाळ्यात मारला. पाच मिनिटांत दोन गोल झाल्यामुळे भारतीयांचा आत्मविश्वास वाढला.
अंतिम अर्धात चेंडूवर ताबा मिळवणाऱ्या चीनने आपला पहिला गोल करण्याचा प्रयत्न केला; परंतु भारतीयांचा बचाव त्यांना भेदणे सोपे होत नव्हते. सामना संपायला पाच मिनिचे असताना सुनेलिता टोप्पो हिने मारलेला जोरदार फटका गोलजाळ्याच्या बाहेर गेला.
त्यानंतर अखेरच्या मिनिटाला मिळालेला पेनल्टी कॉर्नर दीपिकाने सत्कारणी लावला आणि भारताच्या ३-० विजयावर शिक्कामोर्तब केले.